चक्री भजनातून विठ्ठलभक्ती

Ringan

शैव आणि वैष्णवांना एकत्र आणलं वारकरी विचारांनी. हे महान कार्य करणार्याए वारकरी परंपरेत महत्त्वाचं नाव आहे, औसेकर फड! आजच्या काळातही लिंगायत आणि वारकरी विचारधारा एकत्र वाहती दिसते, ती औसेकर फडावर.

भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा मागासलेला असेल, परंतु अध्यात्मिक, वैचारिक दृष्ट्या संपन्न आहे, याची खात्री औसेकर फडाकडं पाहिल्यावर पटते. वारकरी संप्रदायातील हा मानाचा फड आहे, लातूर जिल्ह्यातील औसा येथील. या फडाची परंपरा आहे, तब्बल २४६ वर्षांची.

२४६ वर्षापूर्वी निलंगा येथील श्री मल्लपा सावकार या कडक वीरशैवांच्या कुळात जन्मलेले वीरनाथ वयाच्या चौथ्या वर्षी अंगणातील दोन दगड उचलून वाजवत ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणू लागले. श्री मल्लपा सावकार आणि आई शिवम्माबाईंनी आपण वीरशैव कुळातील आहोत हे त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. पण

‘शिवम् हृदयम विष्णू ! विष्णूम हृदयम शिवम्’

या हरीहराच्या भेदापालीकडची अद्वैत एकात्म भक्ती वीरनाथांनी आपल्यामधून प्रकट केली आणि जगाला सुख शांती, समाधानी जीवन मुक्तीचा सिद्धांत सांगितला.

वीरनाथांनी सद्गुरू गुंडा महाराज देगलुरकर यांच्या सान्निध्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रामपूरच्या अभयारण्यात रामलिंगेश्वर महादेवाच्या मंदिरात १४ वर्ष सलग लिंबाचा पाला खाऊन खडतर अशी जप-ध्यान-भजन-चक्रीभजनाची साधना केली. गुरु सेवेत खडतर तपसाधनेनंतर गुंडा महाराजांनी वीरनाथांना आशीर्वाद देत आपल्या गळ्यातील वीणा आणि चिपळ्या दिल्या. अद्वैत धर्म प्रचार, प्रसाराचा अनुग्रह देऊन भारत भ्रमणाचा उपदेश केला.

या परंपरेतील वीरनाथ महाराजानंतर द्वितीय संत पुरुष श्री मल्लप्पा महाराज, तिसरे संत पुरुष श्री दासवीरनाथ महाराज उर्फ गुरुबाबा महाराज, चौथे समर्थ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आणि पाचवे पीठाधीपती म्हणून विद्यमान सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज अशी पावन परंपरा चालत आलेली आहे.

औसा येथील श्री नाथ संस्थानाच्या माध्यमातून ही थोर परंपरा चालवली जाते. श्री सच्चीदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान या अद्वैत धर्म प्रसारक पीठाच्या धर्म कार्याचा श्रीगणेशा शके १६९२ मध्ये आद्यपुरुष श्री वीरनाथ महाराज यांनी केला.

नाथ संस्थानचे चौथे पीठाधीपती समर्थ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी नाथ संप्रदायाच्या या भागवत धर्माचा प्रचार, प्रसार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेनं, परिश्रमानं केला. भजन, प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती, ज्ञानप्रदानाचं कार्य केलं.

या ज्ञानप्रसाराच्या कार्यात मोठा हातभार लागला आहे, तो चक्री भजनाचा! लिंबाचा पाला खाऊन वीरनाथांनी जी साधना केली तीच चक्री भजन म्हणून प्रसिद्ध पावली. प्रसाद म्हणून गुंडा महाराजांनी दिलेला वीणा आणि चिपळ्या घेऊन गोल, चक्राकार नाचत हे भजन केलं जातं.

गुरूबाबा यांनी हे भजन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका या देशांतही करून भागवत धर्माची पताका सातासमुद्रापलीकडे नेली. अध्यात्माचा गंध नसलेल्या माणसालाही मुखानं अनाहूतपणे विठ्ठल, विठ्ठल, हरिहर विठ्ठल म्हणवून चक्राकार फिरत भजनात तल्लीन करण्याची किमया या चक्री भजनात आहे. अवघड, बोजड, क्लिष्ट, विद्वताप्रचुर शास्त्र वचनं टाळून अत्यंत सरळ, सोप्या, मधुर अशा संत वचनांच्या, चरित्राच्या आधारे संस्कार घडवण्याचं काम या चक्रीभजनातून केलं जातं.

गुरूबाबा चक्री भजनासाठी प्रवेशतात तेव्हा लगेच आपल्या गळ्यात परंपरेचा गुरू प्रासादिक वीणा घेतात. हाती चिपळ्या, डोक्यावर धाटा, हिरवा रुमाल परिधान करून, पायात चाळ बांधून श्री विठ्ठल चरणी, वीरनाथ, मल्लनाथांच्या समाधीला साष्टांग दंडवत घालून चक्री भजनाचा आरंभ करतात. १४ अभंगांचा समावेश असलेले हे चक्राकार भजन सुमारे अडीच तास चालतं. या भजनात डोक्यावर बांधण्यात येणारा हिरवा फेटा समत्त्वाचा आहे. ती सूफी पिरपाच्छा वलींची स्मृती आहे. चक्री भजनासाठी जात, धर्म, पंथ, वर्ण असा अडसर नाही.

जो चक्री भजन साधना नित्य करतो तो सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचा अनुयायी शिष्य म्हणून ओळखला जातो. या भजनात सर्व संतांची नावं घेत हे संत विठ्ठलस्वरूप असल्याचं सूचित केलं जातं.

केशव विठ्ठल, माधव विठ्ठल,
गोरा विठ्ठल, चोखा विठ्ठल,
कमाल विठ्ठल, कबीर विठ्ठल,
हरिहर विठ्ठल, वीरा विठ्ठल,
मल्ला विठ्ठल…

असा लयीत नामोल्लेख केला जातो.

श्रावण मासात महिनाभर नाथ मंदिरात ही चक्री भजनाची उपासना केली जाते.

नाथ संस्थानातर्फे वर्षभरात प्रतीवर्षी एकूण नऊ मोठे उत्सव होतात. नाथ पीठाच्या पीठाधीशांच्या अधिपत्याखाली गुरू भक्तांच्या सहभागानं ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ शुध्द द्वादशीला वीरनाथ महाराज, मल्लप्पा महाराजांचा उत्सव होतो. या काळात सुरू असणार्‍या पावसातही महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातून हजारो शिष्य उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात.

या नंतर गुरुपौर्णिमेला आंध्र प्रदेशातील हैद्राबादमध्ये मोठा उत्सव साजरा होतो. देश, परदेशातील भक्त त्यात हजेरी लावतात. संस्थानात गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. नाथ संस्थानचे सद्गुरू गुरूबाबांचे ज्येष्ठ बंधू सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठण होतं.

याशिवाय गुरुगुंडा महाराज उत्सव, नवरात्रोत्सव, निलंग्याचा उत्सव, दत्त जयंती आदी उत्सव साजरे होतात. औसेकरांची ‘माघवारी’ वारकर्‍यांमध्ये प्रसिद्ध आहे. माघ शुध्द प्रतिपदेला औसा येथून सद्गुरू वीरनाथ मल्लनाथांची पालखी गोपाळपूर नाथ मंदिरातून पंढरपूरकडे निघते. सोबत सुमारे दहा हजार वारकरी असतात. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘मल्लनाथ गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी..’ असं भजन म्हणत वारकरी पंढरीची वाट चालतात. माघ नवमीला चंद्रभागेच्या ऐलतिरी पालखी-दिंडी पोचते. दशमीला चंद्रभागेच्या पैलतीरावर चंद्रभागेमधून चालत जाऊन ती स्थिरावते. तिथं चंद्रभागेच्या तीरी औसेकरांचा मोठा फड उभारतो. दशमी, एकादशी, द्वादशीला पालखीसोबत चालत आलेले नंतर फडावर पंढरपुरात सहभागी होणारे जवळपास ४० ते ५० हजार वारकरी भजन-कीर्तनाचा लाभ घेतात. त्रयोदशीला श्री विठ्ठल मंदिरात चक्रीभजन होतं. चतुर्दशीला पालखी पुन्हा औसाकडे निघते.

औसेकर फड परंपरेत नाथषष्ठी उत्सवालाही महत्त्व आहे.

दत्तात्रय आज्ञा जनार्दनासी|
जनार्धन आज्ञानाथासी|
गुंडा आज्ञा विरासी नाथषष्टी कराया||

अशी गुरुपरंपरा या उत्सवात अधोरेखित होते.

जवळपास २११ वर्षांपासून हा नाथषष्टी महोत्सव श्रद्धेनं वेगवेगळ्या राज्यांत साजरा होतो. पहिला नाथषष्टी महोत्सव संत वीरनाथांनी पुण्यातील लोहगाव येथे केला. आजवर काशी, हैद्राबाद, मराठवाड्यातील विविध शहरांत, गावांत तेथील वारकरी, शिष्य, भाविकांच्या निमंत्रनुसार नाथषष्टी उत्सव होतो म्हणून याला ‘फिरता उत्सव’ असंही म्हटलं जातं. असे एकूण नऊ उत्सव वर्षभरात साजरे होतात.

लातूर जिल्ह्यातील औसा येथील मठासोबतच पंढरपुरातही औसेकरांचा मठ आहे. १६९२मध्ये उभारलेल्या या मठात स्वयंभू श्री विठ्ठल ही मुख्य देवता आहे. मठातर्फे जवळपास सव्वाशे गावांमध्ये नाथ आणि विठ्ठल मंदिरं उभारण्यात आली आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रात लाखोंच्या संख्येनं औसेकर फडाचे अनुयायी पसरले आहेत. धार्मिक, पारंपरिक कार्यक्रमांसोबतच श्रीनाथ संस्थानतर्फे वारकरी संप्रदाय शिक्षण, होतकरू विद्यार्थांना शिष्यवृत्ती देणं, आरोग्य शिबिरं, सामूहिक विवाह, स्त्री भ्रूणहत्या बंदी, व्यसनमुक्ती, साक्षरता प्रचार, अंधश्रद्धा निर्मूलन, भूकंप, पूरग्रस्तांना मदत आदी सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

शिष्यांना गुरुपदेश देताना संस्थानातर्फे एकेक रोपटं दिलं जातं आणि ते जोपासण्याची हमी घेतली जाते. श्री वीरनाथांनी लावलेल्या या औसेकर फडरूपी समन्वय रोपट्याचा आता विशाल वटवृक्ष झाला आहे. जो लाखो भक्तांना विसावा देऊन सन्मार्ग दाखवतो आहे.

0 Shares
विसोबा सिनेमातले विसोबा टोपणनावातलेही