विसोबा सिनेमातले

अमेय गोगटे

शाहरूख खानचा ‘स्वदेस’ पाहिलाय ना! त्यातला मोहन भार्गव आणि पंच मुनिश्वर यांच्यातला वैचारिक संघर्ष आठवतोय? तो संदर्भ घेऊन बघायचं तर विसोबा खेचर संत ज्ञानेश्वरांच्या काळातले मुनिश्वर होते. कर्मठ, तिरसट, कोपिष्ट वृत्तीचे विसोबा ज्ञानेश्वरांवरील अनेक चित्रपटांतून आपल्याला भेटतात.

१९४० सालच्या प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’ या अजरामर चित्रपटात विसोबा खेचर यांची मोठी भूमिका आहे. त्यातून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू समोर येतात. संन्याशाचं पोर, शेंबडं पोर म्हणून ज्ञानदेवांची हेटाळणी करणारे विसोबा ते ज्ञानेश्वरांच्या समाधीवेळी गदगदणारे विसोबा, हा संपूर्ण प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट काका भागवत यांनी आपल्या अभिनयक्षमतेनं या भूमिकेला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. काका भागवत यांनी ‘संत तुकाराम’मधील खलनायकाची – सालोमालो ही भूमिका अजरामर केली आहे.

१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या सिनेमातील विसोबांची व्यक्तिरेखाही लक्षवेधी आहे. ज्ञानेश्वरांनी योगविज्ञेने पाठीवरच मांडे शेकल्याचा प्रसंग आणि हा चमत्कार पाहून त्यांच्यापुढे नतमस्तक झालेले, सबंध ज्ञानेश्वरी वाचून काढणारे आणि भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारे विसोबा या सिनेमात भेटतात.  रंगभूमीवर ‘आग्र्याहून सुटका’मधील उमर खान, ‘बेबंदशाही’मधील खंडोजी, ‘पंडितराज जगन्नाथ’मधील शहाजहान अशा एकापेक्षा एक भूमिका साकारणारे मामा पेंडसे यांनी हे विसोबा रंगवलेत. ठाणेकर मामा पेंडसे यांना दिल्लीच्या संगीत अकादमीनं ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान केला होता, यातून त्यांची थोरवी सहज लक्षात येईल. संत नामदेवांच्या जीवनावरही दोन सिनेमे आजवर येऊन गेले. त्यातील विसोबांच्या भूमिकेविषयी तपशील मात्र मिळत नाहीत.

0 Shares
धर्म विठ्ठल, जात विठ्ठल चक्री भजनातून विठ्ठलभक्ती