धर्म विठ्ठल, जात विठ्ठल

विठोबा सावंत

शैवपंथी लिंगायत असूनही वैष्णवांचा देव विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होण्याची परंपरा वासकरांनी निष्ठेनं चालवलीय. वारकरी संप्रदायातील सर्वात मोठ्या आणि जुन्या फडांपैकी असणार्यां वासकर फडाकडे निष्ठेचा वारसाही मोठा आहे.

मल्लाप्पा वासकर या नावाशिवाय वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिता येणार नाही. संत तुकारामांनी स्वप्नात येऊन संत निळोबाराय पिंपळनेरकर यांना उपदेश दिला. त्यांच्याकडून शंकरस्वामी शिऊरकर यांनी अनुग्रह घेतला. तुकोबांचा हा विद्यावंश शंकरस्वामींकडून पुढे मल्लाप्पा वासकरांकडे आला आणि सध्या मल्लाप्पांची अकरावी पिढी वासकर फडाच्या माध्यमातून ही परंपरा जपत आहे.

आश्चर्य म्हणजे ही वासकर मंडळी लिंगायत आहेत. ‘मल्लाप्पा कर्मठ वाणी होते. ते आधी पांडुरंगाला मानतच नव्हते. शंकरस्वामींबरोबर ते पंढरपूरला गेले आणि त्यांना पांडुरंगाचा आत्मानुभव जाणवला. पुढे ते कर्मठ वैष्णव झाले,’ मल्लाप्पांच्या अकराव्या पिढीचे प्रतिनिधी राणामहाराज वासकर सांगतात. लिंगायत लोक गळ्यात शिवलिंग धारण करतात. पण वासकरांच्या घराण्यात बाळ जन्मलं, की पाचव्या दिवशी तुळशीमाळ घातली जाते. अर्थात त्यांनी लिंगायत पंथ सोडला आहे असं नाही. दीक्षा घेतात तेव्हा ते गळ्यात लिंग धारण करतात. पण त्यांना जसं शक्य होतं तशी पूजाअर्चा करतात. गळयातील लिंग ते काढून ठेवतील; पण माळ मात्र कायम गळ्यातच असते. ‘वारकर्‍याचा एकच पंथ. वारकरी सर्व जातीतील असतात. मुस्लिमही असतात. जेव्हा माळ घालतो तेव्हा वारकर्‍याचा जात, धर्म, पंथ, कूळ एकच. विठ्ठल!’ अशा शब्दात राणामहाराज वासकर शैवपंथीय लिंगायतांच्या वैष्णवपंथीय विठ्ठलाच्या भक्तीचं कोडं उलगडतात.

चरितार्थाकडून परमार्थाकडे वळलेल्या मल्लाप्पा वासकरांनी दर महिन्याला शुद्ध एकादशीला पंढरपूरची वारी आणि दर पंधरा दिवसांनी आळंदीची वारी सुरू केली. मल्लाप्पांची विठ्ठलभक्ती आणि सांप्रदायिक कार्य पाहून बडवे मंडळींनी त्यांना मंदिरात सन्मानानं प्रवेश दिला. फडाच्या माध्यमातून मल्लाप्पांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. ज्ञानेश्वर माऊलींचा वेगळा पालखी सोहळा पुन्हा सुरू करण्यात वासकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं पालखीत वीणा आरफळकरांची, भजन वासकरांचं आणि तंबू, घोडे, जरीपटका शितोळे सरकारांचा हे पहिल्यापासून ठरलेलं आहे. पालखी वाखरी येथे पोचली की पादुका पालखीतून काढून शितोळे सरकारांच्या वंशजांच्या गळ्यात घातल्या जातात. त्यांच्या उजव्या हाताला वासकर आणि डाव्या हाताला आरफळकर चालतात. वाखरीपासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी जातात. मंदिरात समाज आरती झाली की वारी पूर्ण होते.

मल्लाप्पा वासकरांना तुकोबांनी दृष्टांताद्वारे प्रसाद दिल्याची एक कथा सांगितली जाते. आपल्याकडे तुकोबांचा प्रसाद असावा, असं मल्लाप्पांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी ४२ दिवस अनुष्ठान केलं. तुकोबांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की, मंचर गावी शेट्ये महाजनांकडे माझ्या काही वह्या आहेत. त्यांच्याकडे जाऊन एक वही प्रसाद म्हणून घ्या. मल्लाप्पा मंचर गावी गेले; पण शेट्ये महाजन वही द्यायला तयार होईनात. तिथं आपली तुकारामनिष्ठा सिद्ध करून मल्लाप्पांनी ही वही मिळवली. या वहीत ५३७ अभंग आहेत. ही वही मल्लाप्पांच्या वंशजांच्या वाशी येथील घरी आहे. हे अभंग छापायचे नाहीत अशी प्रथा आहे. बाहेरचं अन्नपाणी न घेता हस्तलिखित लिहून घेतलं जातं. मंचरमध्ये ही वही मिळाल्यानं ‘मंचरी’ या नावानं ती ओळखली जाते. हा फक्त वासकर घराण्याचाच नाही तर महाराष्ट्राचा महत्त्वाचा ठेवा आहे.

मल्लाप्पांचा जन्म १७०७चा तर मृत्यू १७९९चा. त्यांची आळंदीत समाधी आहे. पालखी सोहळ्यात चालताना दिवेघाटाजवळ वडकीनाला येथे त्यांनी देह ठेवला. अठराव्या फलटणच्या अलीकडं देह ठेवला तर पंढरपुरात समाधी करा आणि फलटणच्या पुढं देह ठेवला तर आळंदीत समाधी बांधा, असं मल्लाप्पांनी सांगून ठेवलं होतं. वासकर मूळचे कर्नाटकातील बिदरमधील भालकीचे. चेट्टे असं त्यांचं मूळ आडनाव सांगितलं जातं. मराठवाड्यातील वाशीमध्ये त्यांचं आडनाव कोरे असंही होतं. पुढे काही वर्ष त्यांना टाळकुटे म्हणूनही ओळखलं गेलं. पुढे वाशीत राहणारे म्हणून वाशीकर आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश वासकर असा झाला. आताचे वासकर आळंदी आणि पंढरपुरात राहतात.

आषाढीला १८ दिवस आणि कार्तिकीला ७ दिवस अशा दोन वार्‍या वासकर फडामार्फत केल्या जातात. वासकरांच्या फडाचं एक वैशिष्ट्यं म्हणजे साधेपणा. फडावर कार्यक्रमाच्या स्थळी लाईट्स, लाऊड स्पीकर लावले जात नाहीत. फडावर पंगत नसते. वारकरी आपली सोय स्वतःच करतात. वासकर फडातील आठवे वंशज आप्पासाहेब वकील होऊनही सांप्रदायिक कार्यात होते. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामातही भाग घेतला. महात्मा गांधींनी केलेल्या आवाहनानंतर ते खादीचे कपडे वापरत. भगवानशास्त्री धारुरकरांकडे त्यांनी वेदांताचं शिक्षण घेतलं. संस्कृतवर प्रभुत्व असलेल्या आप्पासाहेबांनी वृत्तीप्रभाकर, अद्वैतसिद्ध अशा अकरा वेदांती ग्रंथांचं मराठीत भाषांतर केलं. ३६ वर्ष फडप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटकात मोठ्या प्रमाणात अनुयायी वाढवले. मागास जाती-जमातींना विठ्ठल भक्तीनं जवळ करण्याचं काम त्यांनी केलं. सोलापूरच्या लक्ष्मण महाराजांनी वासकर फडाकडून दीक्षा घेऊन वडार समाजात वारकरी संप्रदायाच्या प्रसाराचं मोठं काम केलं.

आप्पासाहेबांनी कीर्तनं केली नाहीत; पण ४७ कीर्तनं लिहून ठेवली. ‘दोन मने, दोन पाने’ ही त्यांची घोषणा प्रसिद्ध होती. जिथं कार्यक्रम होईल, तिथं दोन व्यक्तींना निर्व्यसनी करायचं आणि दोन झाडं लावायची, असा या घोषणेमागचा निर्धार होता. पुढच्या पिढीनंही हा वसा पुढं कायम ठेवला आहे. १९ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचं पंढरपुरात निधन झालं. आप्पासाहेब फडाधिपती असतानाच १९६९ साली त्यांचे पुतणे तात्यासाहेब यांनी सोळाव्या वर्षापासूनच फडाचा कारभार पाहायला सुरुवात केली, तेव्हा वासकरांच्या एका फडाचे दोन फड झाले. तुकोबादादांनंतर बंद झालेली वासकर घराण्याची कीर्तनाची परंपरा त्यांनी पुन्हा सुरू केली. ही परंपरा सुरू करण्यावरून मतभेद झाल्यानंच वासकर फडाचे दोन फड झाले. दोन फड असले तरी मानपानावरून त्यांच्यात वाद नसल्याचं वासकरांचे वंशज सांगतात. १९५७ साली तात्यासाहेबांनी ज्ञानेश्वरीचं सामूहिक पारायण सुरू केलं. म्हणून त्यांचा ‘सामूहिक पारायणाचे जनक’ असा उल्लेख केला जातो. ‘ज्ञानदीप’ या ग्रंथाची निर्मितीही त्यांनी केली. १९९७ साली त्यांचं निधन झालं. त्यांच्या नावाण उत्तम कीर्तन-प्रवचनकारास वारकरी पुरस्कारही दिला जातो.

आप्पासाहेबांनंतर अॅड. विवेकानंद वासकर यांनी त्यांचं सांप्रदायिक कार्य सुरू ठेवलं. हरियानातील कुरुक्षेत्र इथं २००० जणांना घेऊन ज्ञानेश्वर पारायण, संत तुकोबांच्या वैकुंठगमनाला ३५० वर्ष झाल्याच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संत साहित्य संमेलनाचं आयोजन, वारकरी-फडकरी संघटनेची स्थापना असं कार्य त्यांनी केलं. भजनी मालिका आणि ज्ञानेश्वरीचं कन्नड भाषेत प्रकाशनही त्यांनी केलं. ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष असताना त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. तसंच ते विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असल्यामुळं त्यांची परंपरावादी मतंही चर्चेचा विषय ठरली. गेल्याच वर्षी २०१६ साली त्यांचं निधन झालं.

विवेकानंद यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र राणा महाराज आणि कौस्तुभ हे शेती सांभाळून फडाच्या माध्यमातून परमार्थाचा वसा पुढं चालवत आहेत. तर मोठे चिरंजीव प्रसाद वकिली करून परमार्थ सांभाळत आहेत. धर्मनाथ, ऋषिकेश आणि तेजस ही त्यांची मुलं अकराव्या पिढीच्या रूपानं वारीत चालत आहेत. दुसरीकडे तात्यासाहेबांनंतर विठ्ठलराव वासकर दुसर्‍या फडाचे फडाधिपती बनले आहेत. न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर विठ्ठलरावांनी फडाच्या परंपरा जपतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम सुरू ठेवलं. आध्यात्मिक ग्रंथलेखनाकडे त्यांचं विशेष लक्ष आहे.

समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता दूर करण्याचे प्रयत्न वासकर फडाच्या गेल्या तीन पिढ्या करत आहेत. वारकरी संप्रदायाचा प्रसार करतानाच निर्व्यसनी समाजाची निर्मिती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मल्लाप्पा वासकरांचे वंशज पुढे चालले आहेत. वारकरी परंपरा जपताना त्यांनी काळानुरूप केलेले बदल संप्रदायाच्या नव्या दृष्टिकोनाची साक्ष देत आहेत.

0 Shares
सकस संकराचा प्रदेश विसोबा सिनेमातले