सकस संकराचा प्रदेश

संपत देसाई

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाची नेहमी सीमावादासाठी चर्चा होती. पण तेच महाराष्ट्राचा वारकरी आणि कर्नाटकचा लिंगायत या दोन संप्रदायांच्या संगमाचंही ठिकाण आहे. या सांस्कृतिक संकरानं इथली जमीन सकस बनवलीय.

वळवाच्या दमदार पावसानं कानडी मराठी मुलुख सुखावून गेलेला. काळ्याभोर मातीतून हिरवे कोंब तरारून आलेले. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ सर्वदूर पसरलेली. मी आणि माझे पत्रकार मित्र सुनील कोंडुसकर बाईकवरून शेकीन हासूरच्या दिशेनं निघालो. शेकीन हासूर हे मराठी मुलखाशी नाळ सांगणार कर्नाटकातलं गावं. भाषावार प्रांतरचना झाली. मराठी मुलखाशी नाळ सांगणारी अशी अनेक गावं कर्नाटकात गेली. तर काही बहुसंख्य लिंगायत असलेली गावं महाराष्ट्रात आली. त्यांनी इथेही आपली कानडी भाषा जपली. मंदिरात रोज रात्री होणार्‍या भजनात कन्नड वचनं आणि मराठी अभंगांचा सुरेल संगम घडू लागला. बसवण्णांच्या मंदिरात संतांचे अभंग आळवले जाऊ लागले. तर विठोबाच्या मंदिरात बसवण्णांची वचनं गायली जाऊ लागली. भाषेच्या पलीकडे जात शरणांच्या वचनांशी संतांच्या अभंगांची सांगड घालत इथल्या माणसांनी ती अधिक जीवनदायी बनवली. इथली समाजभूमी सकस आणि सृजनशील बनवली.

सीमांचा प्रदेश हा सर्जकांना नेहमीच भुरळ घालत असतो. तिथली भाषा, तिथली संस्कृती नेहमीच सृजनशील असते. कारण ती कधीच एकसुरी असू शकत नाही. तिच्यात विविधता असते. परस्पर देवाण घेवाणीतून ती अधिक सकस आणि समृध्द बनलेली असते. भारतीय समाज तर अशा विविध भाषा आणि संस्कृतीच्या आदानप्रदानातून स्वतःला समृध्द करत शतकानुशतकं उभा आहे. बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता हा भारतीय समाजजीवनाचा गाभा आहे. त्यामुळं दोन प्रादेशिक भाषांना जोडणारा सीमावर्ती भाग हा तर इतरांच्या तुलनेत सांस्कृतिकदृष्ट्या अधिक संपन्न असतो. थोडीशी वाट वाकडी केली आणि डोळसपणे पाहिलं तर लोकजीवन संपन्न करणार्‍या परंपरांच्या असंख्य खुणा इथे आपल्याला जागोजागी भेटतात.

शेकीन हासुर ह.भ.प. भाऊसाहेब पाटील या लिंगायत कीर्तनकारांच गावं. जन्मानं लिंगायत पण मनानं, कर्तृत्वानं वारकरी. भाऊसाहेब महाराज म्हणजे कानडी मराठी मुलुखातील वारकर्‍यांचा आवाज. लिंगायत आणि वारकर्‍यांचा समन्वयक. कर्नाटकातल्या चिकोडी, गोकाक, सौंदत्ती, बेळगाव, हुबळी, धारवाडपासून महाराष्ट्रातल्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड ते पार गोव्यापर्यंतच्या वारकर्‍यांशी भाऊसाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महारष्ट्रात वारकरी तत्त्वज्ञान आपल्या ओघवत्या वाणीनं त्यांनी तळागाळापर्यंत पोचववं. त्यांनी संत परंपरेतल्या कीर्तन या माध्यमाची ताकद ओळखली. त्यांनी ती कला जाणीवपूर्वक आत्मसात केलेली. एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून भाऊसाहेबांची ख्याती सर्वदूर पसरली. आपल्या कर्तृत्वानं ते पुरोगामी विचारांच्या कीर्तनकारांची संघटना असणार्‍या विश्व वारकरी सेनेच्या अध्यक्षपदापर्यंत पोचले. कानडी मराठी मुलुखातील वारकरी महासंघाचे ते संस्थापक ठरले.

आधी फोनवर बोलणं झालेलं. आम्ही पोचलो तर महाराज वाटच पाहत होते. त्यांनी प्रसन्नपणे आमचं स्वागत केलं. भाऊसाहेब बोलत होते आणि आम्ही ऐकत होते. शेकीन हासूर हे माझं गावं. मी लिंगायत. लिंगायतांची मोजकीच घरं गावात. पण पाटीलकी लिंगायतांच्याकडे. देवाचे सगळे मान पाटील म्हणून लिंगायतांच्याकडे. पालखीचा मान मराठ्यांना तर आरतीचा मान जैनांना. शेखबाबा या सुफी संतानं फार पूर्वी हे गावं वसवलं. म्हणून शेकीन हासुर. अशी आपल्या गावाची ऐतिहासिक ओळख सांगताना त्यांनी गावाची सामाजिक ओळखही सांगितली. जैन, मुसलमान, लिंगायत आणि वारकरी परंपरांनी माझा गावं जोडला गेलेला आहे, हे सांगताना त्यांचा चेहरा अभिमानानं फुलला.

भाऊसाहेब पुढं म्हणाले, मी जन्मानं लिंगायत. शिवानंद स्वामी या लिंगायत स्वामींकडून लिंगायत धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा घेतली पण संतांच्या अभंगांची ओढ काही कमी होत नव्हती. बसवण्णांची वचनं आणि संतांचे अभंग यांच्यातलं साम्य मी शोधू लागलो. यात मला काहीच वेगळं दिसेना. लहानपणापासून मी ग्रामदेवतेच्या मंदिरात होणार्‍या भजनांनी आधीच वेडा झालो होतो. संतांच्या अभंगांची मोहिनी मला वारकरी परंपरेकडे घेऊन आली. भक्तीपरंपरेची ती ओढ माझ्या आतल्या आवाजाला साद घालू लागली. आणि मी ठरवलं. आपण वारकरी व्हायचं. मी वारकरी झालो. पुढे कीर्तनकार बनलो. वारकर्‍यांनीही मला लिंगायत असलो, तरी स्वीकारलं. लिंगायतांनीही मी वारकरी म्हणून कधी दुस्वास केला नाही. पण आज इतक्या वर्षांनंतर कुठंतरी कायतरी बिघडत चाललंय, असं वाटलाय. काय घडतंय कळत नाही. पण माणसा माणसातलं अंतर वाढत चाललंय. हे चांगलं लक्षण नव्हं. भाऊसाहेबांचं निरीक्षण आपल्याला विचार करायला लावतं.

आम्ही उठलो. उठता उठता महाराज म्हणाले, मी लिंगायत, घरी कानडी भाषा. पण मराठीच्या अधिक प्रेमात पडलो ते संतांच्या अभंगांमुळं. कानडी बोलतो पण लिहिता वाचता येत नाही. आता थोडाफार कन्नड वाचायला शिकलो.

‘हा कोणाचा, हा कोणाचा,

हा कोणाचा असे नच म्हणावे|

हा अमुचा, हा आमुचा,

आशेची वदवावे| कुडलसंगमदेवा|’

असा कोणताही भेद न मानणार्‍या लिंगायत धर्मानं आणि ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ असं सांगणारी वारकरी परंपरा मला नेहमीच भेदांच्या पलीकडे जाऊन माणसावर प्रेम करायला शिकवते.

भाऊसाहेबांचा निरोप घेऊन आम्ही उठलो. शेकीन हासूर सोडलं आणि पुढं भैरापूरला पावसानं आम्हाला गाठलं. रस्त्याकडेला गाडी लावून एका छोट्याशा घराच्या पडवीत आम्ही आडोशाला उभे राहिलो. आमची चाहूल लागताच एक मध्यमवयीन बाई बाहेर आल्या. म्हणाल्या, बाहर क्यूं खडे हो भैजान, अंदर आव ना. आम्ही दोघंही आत गेलो. आम्हाला बसायला खुर्ची देऊन बाई आतमध्ये गेल्या. घर मुसलमानाचं आहे, हे आमच्या लक्षात आलेलं. बटनाचा शर्ट आणि आखूड पायजमा घातलेले एक चाचा बाहेर आले. कुठून आलाय? कुठं चाललाय? विचारपूस झाली. चाचा आमची विचारपूस करत असतानाच चाची चहा घेऊन बाहेर आली.

चहाबरोबर आमच्या गप्पा सुरू झाल्या. हसन नदाफ हे चाचाचं नाव. गावातलं एकमेव मुसलमानाचं घर. गावानं एक तरी मुसलमान गावात असावा म्हणून हसन नदाफांच्या पूर्वजांना गावात आणलं. त्यांना जगण्यासाठी पुरेशी जमीन दिली. गावाच्या सगळ्या प्रथापरंपरेत नदाफ कुटुंबाला मान दिला. गावच्या यात्रेत बकरी कापायचं काम नदाफांच. बदल्यात गावं बलुतं घालायचं. नदाफ म्हणजे गावचा बलुत्याचा मुसलमान. आतापर्यंत बलुत्याचा परीट, सुतार, लोहार, कुंभार पाहिलेला. पण पहिल्यांदाच बलुत्याचा मुसलमान पाहत होतो. वारकरी आणि लिंगायत तत्त्वज्ञानानं इथल्या समाजजीवनावर केलेला हा खोल परिणाम. हिंदू, मुसलमान, लिंगायत, जैन, ख्रिश्चन अशा सर्वच समाज घटकांची अशी वीण इथं घट्ट. गावातली आणि परिसरातली लिंगायत मराठ्यांची बरीच लग्न नदाफांनी जमवलेली. शेतीतून येणारं थोडफार उत्पन्न, बांगड्या भरण्याचा पारंपरिक व्यवसाय आणि बलुत्याचं धान्य यावर कुटुंबाची गुजराण. या तुटपुंज्या मिळकतीतही हे कुटुंब समाधानी होतं.

आम्ही उठता उठता चाचा म्हणाले, आमच्या चार पाच पिढ्या या मातीत गेल्या. गावानं कधीच आम्हाला परकं वाटू दिलं नाही. पण आता आजूबाजूचा माहोल पहिला की थोडी चिंता लगती है. उदासीची एक हलकी लहर त्यांच्या चेहर्‍यावर उमटली. कुठंतरी, काहीतरी आतमध्ये सलत होतं. एक अनामिक भीती त्यांच्या मनात दाटून आली होती. इतकी वर्ष या परिसरातील वारकरी, लिंगायत, जैन आणि मुसलमानांनी जपलेली सहिष्णुतेची वीण कुठंतरी उसवते की काय याची खंत चाचाला लागून राहिलेली दिसली. कोसळलेला गावगाडा पाहून चाचा आतून हबकलेला होता.

पाऊस थांबला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. भैरापूर सोडलं आणि महाराष्ट्राच्या हद्दीतल हनिमनाळ हे गाव आलं. रस्त्यापासून थोडं आतल्या बाजूला असलेल्या घरावर काऊत रंगवलेली मातकट रंगाची वारकरी पताका डोलताना दिसली. चौकशी केली असता ते वारकरी असलेल्या ह.भ.प. परीट गुरुजींचं घर असल्याचं समजलं. गुरुजींना भेटलो. त्यांना आमच्या फिरण्याचा विषय सांगितला. गुरुजींनी त्यांचाच अनुभव सांगितला. परीट गुरुजींची वारकरी परंपरेवर अपार श्रद्धा. गदगच्या एका लिंगायत स्वामींशी गुरुजींची भेट झाली. स्वामींचं येणंजाण वाढलं. लिंगायत आणि वारकरी परंपरेवर दोघांची चर्चा झडू लागली. दोघंही एकमेकाच्या प्रेमात पडले. वारकरी आणि लिंगायत विचारांचा समन्वय घडून आला. बघता बघता गुरुजी लिंगायत झाले आणि स्वामी वारकरी बनले. शरणांची वचनं आणि संतांचे अभंग टाळ चिपळ्यांत एकरूप झाले. ज्ञानोबा तुकारामांच्या बरोबर बसवण्णांचे बोल पखवाजातून उमटू लागले.

गुरुजींचा निरोप घेतला. आम्ही हासूरचंपू गावी पोचलो. दिवेलागणीची वेळ झालेली. अंधार पडू लागलेला. रानातून माणसं घरी परतू लागलेली. सतीश तेली या शिक्षक मित्राच्या घरी पोचलो. तेलींच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी. वडील भाऊ जिल्हा परिषद सदस्य. गावच्या लोकांची घरी कायम उठबस. सतीश व्यवसायानं शिक्षक, त्यात लिंगायत. पण वारकरी भजनाचा नाद लागलेला. गावातल्या वारकर्‍यांशी त्याचा दोस्ताना. आम्ही येणार म्हटल्यावर त्यांनी चार-पाच वारकर्‍यांना घरी आधीच बोलावून घेतलेलं. त्यात एक ब्राह्मण, एक मराठा, एक दलित आणि एक लिंगायत. गावात लिंगायत, जैनांबरोबर ब्राह्मण, मराठा, महार, मांग अशा अठरापगड जाती. गावात बसवण्णांच्या मंदिराबरोबरच विठ्ठलाचंही मंदिर. गावात वारकरी आणि शिव अशी दोन्ही प्रकारची भजनं. इकडे वारकरी भजनात संतांच्या अभंगांच्या जोडीला वचनं असायची तर तिकडे शिवभजनाची सुरुवातच माऊलीच्या अलंकापुरीनं व्हायची. शिवभजनात शंकराचे अभंग गायले जायचे. वारकर्‍यांच्या हरिपाठासारखे इकडे शिवपाठही आहेत. त्याचेही सत्तावीसच अभंग.

लिंगायत धर्माच्या प्रभावातून ही गुरुभजनाची परंपरा कर्नाटकात नागरहळीला सुरू झाली. शिवमूर्ती स्वामींनी सुरू केलेल्या परंपरेला पुढं इंचगिरी सांप्रदाय असं नाव पडलं. भद्रया स्वामी या लिंगायत स्वामींनी ही शिवभजनाची परंपरा सर्वदूर नेली. त्यांच्या अनुयायांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तिचा विस्तार केला. वारकरी भजनात वीणेच्या जोडीला पखवाज असतो, तर इथं शिवभजनात दिमडी असते. भद्रया स्वामींचे शिष्य जानकीदास यांनी शिवभजनाची ही परंपरा या परिसरात आणली. कानडी-मराठी मुलखात ते गावोगावी फिरायचे. त्यांच्या प्रेरणेतून हसुर चंपू या गावी ही शिवभजनं सुरू झाली.

घोरपडे इनामदार कापशिकर इथले जमीनदार. त्यांचे नातेवाईक अंकालिकार शितोळे. ते या गावचे मानकरी. त्यांचा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत मोठा मान असतो. गावात गावदेवतेची यात्रा भरते. तीही शाकाहारी. लिंगायत आणि वारकर्‍यांच्या देवाणघेवाणीतून इथली संस्कृतीही अधिक मानवीय आणि समृध्द बनलीय. माऊलींच्या पालखी सोहळ्यात शितोळे अंकलीकरांच्या दिंडीत लिंगायतांसह गावातले सर्वच जातींचे वारकरी दरवर्षी सहभागी होतात. भेदाभेद अमंगळ मानणार्‍या वारकरी आणि इष्टलिंग गळ्यात घातलं की सर्व समान असं मानणार्‍या लिंगायत धर्माच्या तत्त्वज्ञानानं इथली भूमी अशी कसदार बनली आहे. त्यामुळं इथं कुठल्याच वादाला थारा नाही. ना इथं कधी भाषिक अस्मितेचा मुद्दा आला, ना कधी जात अस्मितेचा. माणुसकी हीच इथली अस्मिता. या अस्मितेचं भरणपोषण वारकरी आणि लिंगायत धर्म पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच मी हिटणी या गावी निघालो. हिरण्यकेशी नदीच्या काठावरच महाराष्ट्राच्या हद्दीतलं हे शेवटच गावं. सीमाभागातलं बसवण्णांचं सर्वात मोठं मंदिर याच गावात. दोन-तीन मैलांवर संकेश्वर. कर्नाटकातलं एक मोठं गावं. तिथं शंकराचार्यांचा प्रसिद्ध मठ. संकेश्वरच्या बाजूलाच लिंगायतांचा निडसोसी मठ. नदीच्या पलीकडं महाराष्ट्राच्या हद्दीतील पण बहुसंख्येनं लिंगायत असलेली निलजी, नूल, खणदाळ ही गावं. हिटणी हे दीड-दोनहजार लोकवस्तीचं गाव. गावात साठ टक्क्यांहून अधिक लिंगायत समाज. मुसलमानांची दहा-वीस घरं. उरलेला अल्पसंख्य मराठा, महार आणि मातंग असा मराठी भाषिक समाज. आजर्‍यात चित्री नदीवर झालेल्या धरणानं हिरण्यकेशी बारमाही वाहू लागली आणि हिटणीचा शिवारही फुलला. लिंगायत, मराठा शेतकर्‍यांच्या दारात चार दोन गाड्या दिसू लागल्या.

हिटणी गावात ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत चाललेली. वरदशंकर वरदापगोळ तिथं भेटले. ते गावातलं बडं प्रस्थ. लिंगायत समाजातलं. काँग्रेसचे पुढारी. सुसंस्कृत आणि सुशील व्यक्तिमत्व. गावात आदरानं अण्णा म्हणूनच ओळख. आरक्षणाची सोडत संपली आणि वरदापगोळ अण्णांसोबत मी निघालो. अण्णांचं घर दूर मळ्यात असल्यानं विकास सोसायटीच्या इमारतीत आलो. सोसायटीची इमारत बंद म्हणून आम्ही सुरेश बिद्रेवाडीच्या घरी आलो. अण्णा लिंगायत आणि घर मराठ्यांचं. पण अण्णांचा वावर मात्र एकदम मोकळेपणानं. धर्म वेगळा, भाषा वेगळी, पण नातं मात्र त्याच्या पलीकडच. आपुलकीचं आणि माणुसपणावर ठाम विश्वास असणारं.

घरी ताई आणि तिची कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी. दोघीच. घरचा मालक सुरेश बिद्रेवादी रानात गेलेला. तरीही अण्णा बिनधास्तपणे स्वतःचच घर असल्यासारखे बैठक मारून बसलेले. परकेपणा अजिबात नाही. मला जरा अवघडल्यासारख झालेलं. परक्या माणसाबरोबर कोणीतरी अनोळखी माणूस घरी आलेला. त्यात घरात दोघीचं. पण अण्णांच्या गावी हा विषयच नव्हता. त्यांच्यासाठी गावातलं कोणतंच घर परकं नव्हतं. ताईनं चहा दिला. आमची थोडी फार चर्चा झाली. आम्ही बसवण्णांच्या प्रसिद्ध मंदिराकडे निघालो. जाता जाता घरातल्या ताईला त्यांनी हाक मारली, सुमन, कायतरी खायला करून ठेव. देसाई साहेब सकाळी लवकर घरातून निघाल्यात. आम्ही तवर मंदिराकडे जाऊन येतो.

मंदिर गावच्या दक्षिण टोकाला. या मंदिराविषयी एक आख्यायिका चालत आलेली. गावातल्या पचंडी कुटुंबातल्या सातव्या-आठव्या पिढीतल्या पूर्वजांच्या स्वप्नात महादेवाचं लिंग आलं. नदीच्या पात्रात जिथं वाहत्या प्रवाहातही फूल तरंगताना दिसेल, तिथं मी आहे, असा दृष्टांत दिला. या दृष्टांताच्या आधारे शोध घेतला आणि ही स्वयंभू मूर्ती सापडली. या मूर्तीची इथं प्रतिष्ठापना केली. मंदिर उभं केलं. मंदिर खूपच जुनं आहे. मंदिराच्या बांधणीवरून आणि त्याच्या सुबक दगडी बांधकामावरून ते सहज लक्षात येतं. जिथं या मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्याच्या मागंच मंदिरात मोहरमचा ताबूत बसवला जायचा. मंदिराच्या आतमध्येच पूर्वी खाई असायची. अनवाणी पायानं या खाईतून पीर चालत जायचे. ताबूत विसर्जनाची मिरवणूक मंदिरातून निघायची. अलीकडे काही वर्षात मोहरमचा ताबूत मंदिराच्या बाहेर बसतो. मुसलमानांनी स्वतंत्र जागा घेऊन ताबूत मंदिराच्या मागं बसवायला सुरुवात केली आहे.

या मंदिरात सेवेचा मान सर्व जाती धर्मातल्या लोकांना दिला जातो. चैत्रात भरणार्‍या यात्रेत मात्र पहिला मान मुस्लिमांना. मंदिराच्या मालकीची ४६ एकर जमीन गावातल्या सर्व जातीतल्या कुटुंबांना सेवेसाठी समान वाटून दिली आहे. बसवण्णांच्या मंदिरात वचनांसोबत वारकरी संतांचे अभंग गायले जातात. आषाढीला गावात विठोबाची मूर्ती आणली जाते. रात्रभर जागर करताना कीर्तन, भजन, प्रवचन केलं जातं. लिंगायत आणि मराठा समाज दोन्हीकडेही त्याच श्रध्देनं सहभागी होतात.

आता मंदिर सर्वांसाठीच खुलं आहे. पण दहा-पंधरा वर्षांपूर्वी इथल्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा खूपच गाजला होता. इथल्या गावगाड्याची घट्ट वीण पार विस्कटून गेली होती. दलित आणि दलितेतर असा एक मोठं संघर्ष इथं उभा राहिला होता. त्या प्रसंगाची आठवण काढताच वरदापगोळ खूपच अस्वस्थ झाले. त्यांचा स्वर थोडा दुखरा झाला. हा गावं बसवण्णांच्या विचाराचा. जातीपातीच्या पलीकडे जावून माणूसपणाची शिकवण देणार्‍या महात्मा बसवेश्वरांचा. त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक. ज्यांनी जातीव्यवस्था नाकारली, ज्यांच्या धर्मात जात नाही, तिथं माणसांना मंदिरप्रवेश कसा नाकारला जाईल. कोणीतरी काहीतरी सांगतो आणि समाजामध्ये तेढ निर्माण होते. विनाकारण पोलीस, कोर्ट कचेर्‍यांनी गावात कलह निर्माण झालेला. जुन्या आठवणींनी ते अस्वस्थ झाले.

चला जाऊ द्या, झालं गेलं गंगार्पण… आम्ही सगळं विसरून गेलो. गाव पुन्हा पूर्वीसारखा गुण्यागोविंदानं नांदतोय. आम्ही बिद्रेवाडींच्या घरी परतलो. एव्हाना ताईंनी खायला गरम गरम उपमा करून ठेवलेला. ताईंच्या हातचा नाष्टा झाला. निघताना वरदापगोळअण्णा म्हणाले, हे आमचं गाव कोल्हापूर संस्थानातलं. गावची जमीन कोल्हापूरच्या छात्र जगत्गुरूपीठाची. आम्ही सारे खंडकरी शेतकरी. दरवर्षी पीठाला नित्यनेमानं खंड भरत आलो. अनेक पिढ्या या जमिनीवर खपल्या. त्याच्यावर नवीन आलेल्या या पीठाच्या जग्द्गुरूंचा डोळा आहे. त्यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी वकिलांमार्फत नोटीस दिलीय. न्यायालयात आमची लढाई सुरू हाय. बघू वेळ पडली तर आंदोलन उभं करू.

आणखी एक सांगतो तुम्हाला. गेल्या दहा-वीस वर्षांत माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत. त्यांच्यात धर्म-जातीच्या नावानं भिंत उभी केली जात आहे. माणुसकी संपत चालली आहे. हे असंच चालत राहीलं तर समाजाचं काय खरं नाही. अस्मितेचं राजकारण आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे, ते आता काळच ठरवील. कोण भाषेच्या अस्मितेचं राजकारण करतोय. कोण जातधर्माच्या अस्मितेशी खेळतोय. आम्हाला आमच्या धर्मानं कुणाविषयी वैर नाही शिकवलं. कोणताच धर्म माणसाला वैर करायला शिकवत नाही. जो वैर करायला शिकवतो तो धर्म कसला? अण्णा बोलत होते, अन् मी अवाक् होऊन ऐकत होतो. कुठून आलंय हे शहाणपण, या साध्या साध्या माणसांकडे. हे शहाणपण असं आकाशातून टपकलेलं नाही. ते इथल्या अनेक पिढ्यांनी जपलेलं संचित आहे. हे संचितच विद्वेषाच्या कुटील डावपेचांना गाडून उरणार आहे. गावगाड्यातल्या सर्व समूहांना सोबत घेऊन कारभारपण सांभाळणारी अण्णांसारखी माणसं भेटली की माणुसकीवरचा विश्वास गडद होत जातो. अशी कितीतरी गावं आणि गावाचं कारभारपण हाकणारे अण्णांसारखे कारभारी आजही मराठी-कानडी मुलुखात भेटतात.

वारकरी संतांच्या भजनांनी आणि शरणांच्या वचनांनी कसदार बनलेल्या या प्रदेशासारखे अनेक भाषिक आणि सांस्कृतिक सीमाप्रदेश भारताच्या एकात्मतेला बळ देणारे आहेत. पण आपणच करंटे आहोत. अनेक महात्म्यांनी भाषा आणि प्रदेशाच्या पलीकडं जात धर्म पंथाची शिकवण दिली. आम्ही त्यांना तिथंच अडकवून खुजं केलं. लिंगायत धर्माचे संस्थापक असलेल्या बसवण्णांना आम्ही कानडी अस्मितेचं प्रतीक बनवलं. ज्यांच्या आयुष्यातला बराच काळ मराठी भाषिक मंगळवेढ्यात गेला, त्या बसवण्णांना आम्ही कानडी बनवलं. उत्तर भारतात पार पंजाबपर्यंत जाणार्‍या संतशिरोमणी नामदेवांना मराठी केलं. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, सांगणारे सोहरोबानाथ गोव्याचे की महाराष्ट्राचे, या वादात त्यांना अडकवलं. धर्म, जात, प्रदेश, भाषेच्याही पलीकडं गेलेल्या महात्म्यांना खुजे करणारे आपण त्यांच्या लोकजीवनात खोलवर रुजलेल्या शिकवणीचा विचार करणार आहोत की केवळ त्यांना अस्मितेच्या नावाखाली एकमेकांसमोर उभे करणार आहोत? महात्म्यांनी, त्यांच्या विचारधारांनी सामान्य माणूस जोडलेला आहे, जातीधर्माच्या पलीकडं जाऊन सांगड घातली आहे. ही सांगड कोणी तोडतो म्हटलं तरी तुटणं शक्य नाही. कारण समतेच्या तत्त्वज्ञानाची मुळं समाजात खोलवर रुजलेली आहेत. लोकधारा बनून समाजाला घट्ट बांधून ठेवण्याचं काम निरंतरपणे चालूच राहणार आहे.

0 Shares
हरिहरा नाही द्वैत धर्म विठ्ठल, जात विठ्ठल