हरिहरा नाही द्वैत

शे. दे. पसारकर

मराठीत लिंगायत-वीरशैव साहित्यनिर्मितीचा पहिला मान संत विसोबा खेचरांकडं जातो. त्यांनी इतर धर्म-पंथांशी समन्वयाचं नातं दृढ केलं. त्यामुळंच पुढं वीरशैव साहित्यावर वारकरी संत साहित्याचा मोठा प्रभाव पडला.

अलिकडच्या उपलब्धीप्रमाणं विसोबा खेचर यांचा ‘शडुस्थळी’ ग्रंथ वीरशैव साहित्याचा आद्य ग्रंथ मानला जातो. सोळाव्या शतकात मोठ्या प्रमाणात वीरशैव साहित्य निर्माण झालं. या काळात वारकरी विचारांचा प्रभाव वाढत होता. वीरशैव समाज वारकरी पंथाकडं ओढला जात होता. त्यातून अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती वाटून वीरशैव साहित्यिकांनी वीरशैवांची अस्मिता जागी करणारी काव्यरचना करण्यास सुरुवात केली. वीरशैव संप्रदायाचे प्रमुख प्रवक्ते श्री मन्मथ स्वामी यात आघाडीवर होते.

शिव शिव म्हणतां वाचें|
काय गेलें तुझ्या बाचे॥
सांडोनी स्वधर्म परधर्मीं रत|
पाप तें तयास आचरतां॥
छपवूनी लिंगा घाली तुळशीमाळ्|
जन्मला चांडाळ मातेगर्भी॥

अशी कठोर वचनं मन्मथवाणीतून प्रकटली. त्यांनी अशाच प्रकारच्या रचना असलेला परमरहस्य हा भाष्यग्रंथ रचला. परपंथप्रवेशासाठी उतावीळ झालेल्या स्वजनांना या साहित्यानं वीरशैव संप्रदायातच ठेवलं. या संतकवींनी हरिपाठाप्रमाणं ‘शिवपाठ’ आणला. सांप्रदायिक भजनं रचली. कीर्तन परंपरा निर्माण केली. ‘हरिभक्तपरायण’ मंडळींप्रमाणं ‘शिवभक्तपरायण’ माणसं तयार केली. भारूडाप्रमाणं गबाळरचना केली. एवढंच नव्हे तर लिंगरूपात पूजल्या जाणार्‍या शिवाला त्यांनी

भाळी भस्म चंद्रकळा|
गळां शोभे रुंडमाळा॥
गौरवपु शुभ्रकांती|
अंगी चर्चिली विभूती॥

अशा सगुण-साकार रूपात उभं केलं. वारकरी संप्रदायाशी समांतर अशीच ही वाटचाल होती. यावरून अस्मितेचं पोषण ही वीरशैव मराठी वाड्मयाची निर्मिति-प्रेरणा होती असं म्हणता येतं.

संप्रदाय-विचाराची ओळख करून देणं ही या वाड्मयाची दुसरी निर्मिति-प्रेरणा होय, हे परमरहस्य, विवेकचिंतामणी, शिवागम, सिद्धान्तसार, वीरशैवधर्मनिर्णयटीका, अष्टावरणमाहात्म्य, शिवागमोक्तसार, शिवरहस्य, वीरशैवतत्त्वसारामृत इत्यादी ओवीबद्ध ग्रंथांची निर्मिती पाहिल्यावर पटतं. शक्तिविशिष्टाद्वैत, षट्स्थल-सिद्धान्त, अष्टावरण आणि पंचाचार हे वीरशैव विचारविश्वाचे चार स्तंभ आहेत. ओवीग्रंथांमधून आणि अभंगादी स्फूट रचनांमधून वीरशैव संतकवींनी त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी संस्कृत आणि कन्नड ग्रंथांचा त्यांनी आधार घेतला आहे. केवळ विचाराचीच ओळख करून देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी संप्रदायाचं आचरण केलेल्या श्रेष्ठ पुरुषांची चरित्रंही ओवीबद्ध केली आहेत. त्यामध्ये अल्लमप्रभू, महात्मा बसवेश्वर, सिद्धरामेश्वर, मन्मथस्वामी, हावगीस्वामी आदी संतपुरुषांचा आणि शिवभक्तांचा समावेश आहे. शिवशरणांचा आत्मसंवाद असलेल्या कन्नड वचनांचेही मराठी अनुवाद याच प्रेरणेतून झालेले आहेत.

भक्तिभावनेचं प्रकटीकरण ही या वाड्मयाची आणखी एक निर्मिति-प्रेरणा आहे. त्यांची अभंगकविता आत्मसंवादाच्या पातळीवर वावरते. अभंगांतून शंकराचं रूपचित्र रेखाटताना त्यांच्या भक्तिभावनेला भरतं येतं. त्याच्याशी लडिवाळ सलगी करताना, त्याच्या नामामृतात चिंब होताना त्यांची आनंदविभोर अवस्था होते.

अंतरी बैसुन सुख द्यावे मज|
आनंदाची भूज नाचवीन॥
नाचवीन मन तुझिया चरणी|
गाईन कीर्तनी नाम तुझे॥

अशा शब्दरूपात त्यांच्या अंत:करणातली भक्तिभावना साकार होते. आत्मनिवेदन, प्रेमकलह, करुणा, शिवभक्ती, उपदेश, स्वानुभव, गुरुगौरव, शिवगौरव अशा अनेक पैलूंनी मंडित झालेल्या या अभंगवाणीमागे भक्तिभावनेला शब्दरूप देण्याची निखळ प्रेरणा आहे.

वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झालेल्या स्वजनांना थोपवणं हे जरी वीरशैव मराठी संतांचं उद्दिष्ट होतं तरी त्यांनी अन्य संप्रदायांशी कधी संघर्ष केल्याच्या खुणा त्यांच्या वाड्मयात आढळत नाहीत. उलट, वीरशैव संतकवींनी निर्मिती करताना मराठी संतसाहित्याशी सुसंवादी शैलीच उपयोजली असं दिसतं. जो वीरशैव वारकर्‍यांच्या कीर्तन-भजनांत शांतिसुख शोधत होता त्याच्यासाठी, त्याला परिचित असलेल्या भाषेतच संकल्पना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लिंग (शिव) आणि अंग (जीव) यांची समरसता म्हणजे ‘लिंगगांगसामरस्य’. परंतु हा पारिभाषिक शब्द न योजता मन्मथस्वामींनी मराठी संतसाहित्याशी सुसंवादी भाषेत मोक्षसंकल्पनेचं बहारदार वर्णन केलं आहे.

गंगा सागराशीं मिळाली|
ती पुन्हा न परते सागरुचि झाली|
तैसी चित्तवृति समरसली|
पूर्णानंदी शाश्वत॥

श्लोकानुवाद करताना मन्मथस्वामी सिद्धान्ताची परिभाषा योजतात आणि श्लोकार्थाचा विस्तार करताना वेदान्ताची परिभाषा योजतात, हे ‘परमरहस्या’चा सूक्ष्म अभ्यास करणार्‍या अभ्यासकांच्या लक्षात येईल. हे सर्वच वीरशैव संतकवींच्या वाड्मयात आढळून येतं. याचा अर्थ असा की, या संतकवींचं वाड्मय हे वीरशैव सांप्रदायिक वैशिष्ट्यं एका बाजूनं नोंदवतं तर दुसर्‍या बाजूनं ते वारकरी संतसाहित्याशी सुसंवादही करतं. कन्नड आणि संस्कृत भाषांतील ग्रंथांचा अनुवाद असलेल्या वीरशैव मराठी संतांच्या रचना अस्सल मराठी वळणाच्या आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे.

सुसंवादाप्रमाणेच विचारातील समन्वयशीलतेचा आढळ या वाड्मयात होतो. प्रारंभी मन्मथस्वामींच्या अभंगातील ‘हरि हर ऐसा नामी आहे भेद’ असा शिव आणि विष्णू यांच्यातील भेद स्पष्ट करणारा विचार पुढील काळात

हरिहरा नाही द्वैत| व्यर्थ वादकाचे मत॥
जैसी ब्रह्म आणि माया| तैसी पुरुषाअंगी छाया॥
मायपीठ पांडुरंग्| वरी ब्रह्म शिवलिंग्॥ (शिवदास)

असा समन्वयशील झाला. भांडणार्‍यांना भांडू द्या, पण आपण मात्र निरर्थक निंदेपासून अलिप्त राहावयास हवं, असं शिवदास तळमळीनं सांगतात –

शिव थोर विष्णू थोर ऐसे भांडो भांडणार॥
आम्हीं न लागूं त्या छंदा| व्यर्थ कोण करी निंदा॥

वीरशैव संतकवी लक्ष्मण महाराज तर पंढरीच्या पांडुरंगावर एक तुलसीदलही वाहतात-

भवनाशनी पंढरी| पाहू चला हो झडकरी॥
पूर्णब्रह्म तो श्रीहरी| भीमातटी शोभतसे॥

प्रत्येक पंथाचं तत्त्वज्ञान आणि उपासनापद्धती भिन्न असली तरी त्यांचं परमध्येय एकच असतं. नाम-रूपभेदानं उपास्य वेगळे भासले तरी भक्तितत्त्व समानच असतं, याची वीरशैव संतांना स्वच्छ जाणीव होती. म्हणूनच त्यांच्या वाड्मयातून उपासनेच्या कट्टरपणाबरोबरच हरिहरसमन्वयाचे बोलही घुमताना ऐकू येतात.

वीरशैव मराठी काव्याचं स्वरूप वैविध्यपूर्ण आहे. त्यातील ओवीग्रंथ प्रकारात संस्कृत ग्रंथांवरील टीकाग्रंथ, संस्कृत आणि कन्नड ग्रंथांचे अनुवाद, चरित्रपर ग्रंथ, स्वतंत्र ग्रंथ आदींचा समावेश होतो. अभंगरचनेत स्फूट अभंग, कथात्मक अभंग, चरित्रपर अभंग असे प्रकार पडतात. त्यातील स्फूट अभंगांत गुरुगौरव, शिवगौरव, आत्मनिवेदन, उपदेश, विरहिणी, प्रेमकलह, करुणा असे कितीतरी विभाग करता येतात. स्फूट रचनेत आणखी लोकसाहित्य, अन्य स्फूट रचनांचा समावेश होतो.

लोकसाहित्यात भारूडं, खापरी गीतं, डफगाणं, डोलोत्सव गीतं, लावणी, पोवाडा असे प्रकार आहेत.

भारूडांत जोहार, फुगडी, शरणार्थ, पिंगळा, बसवी, व्यभिचारिणी, ताकीदपत्र, नवरा, कोल्हाटीण, बाळसंतोष, भोळी, जागल्या, जोगवा, गोंधळ, वासुदेव, कापडी, सलाम, लखोटा, सौरी, मोहिनी, पाल, भूत, आग, चोर, सर्प, दरोडा, विंचू, फकीर, आंधळा, हलवाई, नटवा, पैलवान, पतिव्रता, उंदीर, घूस, तंटा, जोशी, होरा, पांगळा, चिरटे, जोकमार, म्हातारी अशी कित्येक भारूडं आहेत. अन्य स्फूट रचनेत स्तोत्रं, पद, आरती, भूपाळी, अष्टक, पाळणा, गीत, कटाव आदी प्रकार आहेत. पदांमध्ये मराठी, हिंदुस्थानी, हरदासी आणि कथात्मक पदांचा समावेश होतो. यावरून वीरशैव मराठी वाड्मयाचं वैविध्य आणि वैपुल्य लक्षात यावं.

वीरशैव मराठी संतकवींची आणि भक्तकवींची एक सुदीर्घ अशी परंपरा महाराष्ट्रात आढळते. सोळाव्या शतकात होऊन गेलेले संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामी आणि त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी विपुल वाड्मय निर्मिले. सोळाव्या शतकातच शिखरशिंगणापूर येथे शांतलिंगस्वामींनी मराठीत साहित्यनिर्मिती केली. जाणिवपूर्वक हे साहित्य समृद्ध करणार्‍या संतकवींच्या आणि भक्तकवींच्या नावांची नोंद येथे करणे आवश्यक वाटतं. मन्मथस्वामी, शांतलिंगस्वामी, लिंगेश्वर, बसवलिंग, सत्यात्मज, लक्ष्मण महाराज, शिवदास, महादेवप्रभू, काशीनाथ सुपेकर, वीरनाथ महाराज, गंगाधरस्वामी वडांगळीकर, शंकर मृगेंद्र स्वामी, मल्लनाथ महाराज, चन्नाप्पा वारद, बाळाबुवा कबाडी, विरूपाक्षप्पा शेटे, शिवगुरुदास, बसवदास, शंभू तुकाराम, आप्पा स्वामी, पंचाक्षरी स्वामी, गुरुदास आणि वीरशैव भक्तकवयित्री भावंडीबाई आदी कवींनी वीरशैव मराठी वाड्मयाची निर्मिती केली आहे.

वीरशैव मराठी साहित्याच्या निर्मितीला सोळाव्या शतकाच्या अखेरीस प्रारंभ झाला, ती निर्मिती आजही अव्याहत चालूच आहे. आजच्या पिढीतील अनेक लेखक-कवी आपापल्या परीनं वाड्मयनिर्मितीची ही परंपरा पुढे चालवत आहेत. ओवी-अभंग आजही लिहिले जात आहेत. कादंबरी, नाटक, कविता, कथा, चरित्र अशा ललित वाड्मयप्रकारांतही या वाड्मयाची निर्मिती होत आहे. संस्कृत ग्रंथ आणि कन्नड वचनांचे अनुवाद, वीरशैव सत्पुरुष आणि समाजातील कर्तृत्वसंपन्न पुरुष यांचं चरित्रलेखन, वीरशैव मराठी वाड्मयाची संपादनं, समीक्षा, प्रबंध यांची निर्मिती अजूनही होत आहे. मध्ययुगीन काळात उगम पावलेली ही साहित्यधारा अजूनही वाहते आहे. ती थांबली नाही, आटली नाही, साचलीही नाही. आपली निष्ठा न सोडता वाक-वळणं घेत ती वाहत राहिली.

ओवीग्रंथांचे जे तीन प्रकार पडतात, त्यामध्ये परमरहस्य, गुरुगीता, शिवानंदबोध, वीरशैवधर्मनिर्णयटीका, अष्टावरणमाहात्म्य, शिवरहस्य इत्यादी संस्कृत ग्रंथांवरील टीकाग्रंथ होत. विवेकचिंतामणी, कर्णहस्तकी, लीलाविश्वंभर आदी कन्नड ग्रंथांचे अनुवाद आहेत. शिवकथामृत, सिद्धान्तसार, शिवागमोक्त्तसार, लिंगानंदबोध, ब्रह्मोत्तरखंड, शिवागम, वीरशैवतत्त्वसारामृत, गुरुमाहात्म्य असे संस्कृत ग्रंथाधिष्ठित ग्रंथ आहेत. सिद्धेश्वरपुराण, बसवपुराण, वीरशैवलीलामृत, बसवेश्वराख्यान, हावगीलीलामृत, श्रीबसवचरित्रामृत, बसवगीतापुराण, श्रीमन्मथचरितामृत, श्रीरमतेरामकथामृत इत्यादी चरित्रपर ग्रंथ आहेत आणि षट्स्थल, शांतबोध, अनुभवानंद, स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, निजात्मसार असे स्वतंत्र ग्रंथही आहेत.

ओवीग्रंथांतील वाड्मयीन वैशिष्ट्यांची समीक्षा अभ्यासकांनी आपापल्या परीनं केली आहे. व्यक्तिदर्शन, संवादकौशल्य, प्रवाही निवेदन, विचार-भाव-कल्पना यांचं सौंदर्य, अलंकार आणि प्रतिमासृष्टी, त्यातील समाजदर्शन, प्रासादिकता या कसोट्यांवर यातील काही ग्रंथ नि:संशय उजवे ठरतात. सहजस्फूर्त आणि रसमय ओव्या वाचताना त्यातील अर्थ सहजपणे उलगडत जातो. नमुन्यादाखल काही ओव्यांचा उल्लेख करतो. ‘परमरहस्या’त आपल्या भक्तांचं कौतुक करताना शंकर म्हणतात त्या ओव्या ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्यांची आठवण करून देणार्‍या आहेत.

सीवकथा सीवगोष्टी| सांगतां उल्हास न माय पोटी|
तथापें मी धुर्जेटी| सदां तीष्ठतुसे॥
तें माझें अति जीवलग| तें आत्मा मी त्यांचे आंग|
तया मज वियोग्| कदां नाही॥

ओवीग्रंथांतील बहुतेक कवींची रचना प्रसाद-माधुर्यादी काव्यगुणांनी युक्त आहे. प्रतिपाद्य विषय श्रोत्यांच्या मनावर बिंबविण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आढळतं. समाजजीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणामुळं व्यभिचारिणी, कुलवधू, मोळीविक्या, भाटनागर, बहुरूपी, कैकाड्याचे माकड, बासरीवादक आदी प्रतिमांचा ते वापर करताना दिसतात. यातील निवडक ओवीग्रंथांचा स्वतंत्र अभ्यास करून त्यांची वाड्मयीन महत्ता स्पष्ट करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. वीरशैवांचं अभंगवाड्मय समृद्ध असून, ते वीस हजार पेक्षा अधिक संख्येनं उपलब्ध झालं आहे. मन्मथस्वामी हे पहिले अभंगकार. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक कवींनी अभंगरचना केली. वीरशैव संतांची अभंगवाणी ही वारकरी संतांच्या अभंगवाणीबरोबरच नांदण्याच्या योग्यतेची आहे, असा समीक्षकांचा अभिप्राय आहे. त्यामध्ये आत्मनिवेदन, गुरुगौरव, शिवगौरव, शिवपाठ, करुणा, प्रेमकलह, विरहिणी, अद्वैत, योग, पूजन-भजन-कीर्तन, मनोबोध, वाचेस बोध, स्वानुभव, उपदेश असे सर्व पैलू समाविष्ट आहेत. वीरशैव संतकवींची समाजविषयक कळकळ, दांभिकावर केलेले प्रहार, त्यांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची पारंपरिक परंतु समृद्ध प्रतिमासृष्टी यांचं दर्शन त्यांच्या अभंगवाणीत घडतं.

लक्ष्मण महाराजांनी स्कंदपुराण, शिवपुराण, बसवपुराण, शिवरहस्य आदी ग्रंथांतील भोळ्या शिवभक्तांच्या कथा अभंगबद्ध केल्या. या कथा अभंगबद्ध करताना त्यांनी मूळ कथांचा कोठे संक्षेप केला तर कोठे विस्तार केला. पुराणसंदर्भ असलेल्या कथांत आपल्या भोवतीच्या समाजजीवनाचे रंग भरले आणि संस्कृत-कन्नडमधील कथांवर मराठी साज चढवून त्या मराठी वाचकांपुढं ठेवल्या.

या सर्व कथांतून शिवभक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन केलेलं आहे. शिवपूजन नकळत घडलं तरी त्यामुळं पापात्म्याचा उद्धार होतो, हे भक्तिसूत्र लक्ष्मण महाराजांना सर्वांच्या मनावर बिंबवायचं आहे. वाल्ह्याचा वाल्मिकी होतो, या भारतीय परंपरेनं मान्य केलेल्या परिवर्तनाची नोंद या कथांतून ते पदोपदी करीत आहेत असं जाणवतं. त्यांच्या काही कथांची शीर्षकं वाचली तरी याची कल्पना येईल. जार पुरुष, पातकी ब्राह्मण, पातकी भिल्लीण, भ्रष्टाचारी ब्राह्मण, दुष्ट भिल्ल इत्यादी. दुष्कर्मरत स्त्री-पुरुषांचा देखील शिवभक्तीनं उद्धार होतो हे या कथांतून वर्णन करीत शिवभक्तीचं सर्वोत्तमत्व आणि सुलभता लक्ष्मण महाराज गर्जून सांगतात. याबरोबरच बिज्जमहादेवी, शिवभक्त बालिका, शिवभक्त धनगरपुत्र, महाशैव ब्राह्मण, शिवभक्त गोपबालक अशी शिवार्चनरत भक्तचरित्रंही त्यांनी रंगवून, रंगून सांगितली आहेत. काही कथांतून दुष्प्रवृत्त पुरुषांचं सच्छील शिवभक्तात परिवर्तन होतं, असा दिलासा ते देतात, तर काही कथांतून शिवभक्त पुरुषाचा आदर्श डोळ्यांसमोर उभा करतात.

स्फूट रचनेत लोकसाहित्य म्हणता येईल अशी भारूडं, वडप, डफगाणं, डोलोस्तव गीतं, लावणी, पोवाडा आदी प्रकार समाविष्ट आहेत. यातून लोकमानसाची विविध रूपं प्रकट होतात. लोकसाहित्य अधिकांशानं मौखिक असलं तरी थोड्या प्रमाणात ते लिखित स्वरूपातही उपलब्ध झालं आहे. ‘जोहार मायबाप जोहार्|’ या भारूडातून मन्मथस्वामींनी देहगावच्या पाटलाचा भोळा कारभार वर्णन केला आहे. शिवदासांनी देहनगरच्या मनाजीपंत कुलकर्ण्याला ताकीदपत्र दिलं आहे. त्यात गावाची खराबी केली, परमार्थाच्या वाटा बंद केल्या, म्हणून तुम्हाला धरणे येईल, अशी भीती घातली आहे. लक्ष्मण महाराजांचा ‘पिंगळा’ कलियुगात कोणते अनर्थ होतील याचं भविष्यकथन करतो-

काळ आला दुर्धर| धर्म बुडेल फार|
फार होतील जारचोर्| अल्पआयुष्यी नर॥
लेक मारील बापाला| स्त्री भ्रताराला|
शिष्य वधील गुरूला| मोठा दिसे हा घाला॥

या वर्णनातील सत्य आजही पटण्यासारखे आहे. चन्नांनी, शिवदासांनी अनेक भारूडं लिहिली आहेत. सदानंद जोडजवळेकरांचं एक जळजळीत भारूड असं आहे –

थूऽ रांड थूऽ तुझ्या तोंडावर थूऽ ॥
परधर्मअभिलाषी व्यभिचारिणी तू||धृ.॥
ज्याचे संगे लग्न केले, सुख नाही बोला|
बळे जशी लोकापाशी, घर देशी त्याला॥
दाणे नसता भांडून मागे आपल्या नवर्‍याला|
पलंगावरी सुख देई पहा आणिकाला॥

या लोकसाहित्याला ‘गबाळ’ अशीही एक संज्ञा आहे. वीरशैवांत विवाहप्रसंगी ‘खापरीची गीतं’ म्हटली जातात. त्याला गुग्गळ, धूप जाळणे असेही म्हणतात. त्यावेळी जी गीतं म्हणतात ती वडप होत. हा पथनाट्यासारखा एक प्रकार आहे. गीताच्या शेवटी ‘अहा रे वीरा’ असा घोष केला जातो. मन्मथस्वामींची ‘कराडच्या देवीवरील लावणी’ प्रसिद्ध आहे. ते महाराष्ट्रातील पहिले लावणीकार ठरले आहेत. अशा प्रकारे पोवाडे, पदं, पाळणे, गीतं, आरत्या, भूपाळ्या, अष्टकं, स्तोत्रं अशी कितीतरी वीरशैवांची स्फूट रचना उपलब्ध आहे.

असे हे वीरशैव मराठी वाड्मयाचे समृद्ध दालन आहे. या वाड्मयावर पंधरा शोधप्रबंध लिहिले गेले आणि प्रबंधलेखकांना पीएच. डी. पदव्याही मिळाल्या. परंतु अजूनही या हिमनगाचा पूर्ण अभ्यास झालेला नाही. वाड्मय उपलब्ध आहे, परंतु अप्रकाशित आहे. या वाड्मयाच्या साक्षेपी अभ्यासानंतरच महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि मराठी वाड्मयात वीरशैव मराठी वाड्मयाचं कोणतं आणि किती योगदान आहे हे समजू शकेल.

0 Shares
पांचाळ, चाटी की अन्य कोण? सकस संकराचा प्रदेश