पांचाळ, चाटी की अन्य कोण?

संजय सोनवणी

परस्परविरोधी माहिती देणार्याा आख्यायिकांमुळे संत विसोबा खेचरांची ओळख हरवलीय. त्यातून वाट काढत विसोबांचं मूळ पांचाळांमध्ये शोधता येतं. या कारागीर जातसमूहाचा इतिहास पुरोहितशाही विरुद्ध संघर्षाचा आहे.

महाराष्ट्राला संतांची उज्ज्वल परंपरा आहे, पण दुर्दैवानं त्यांची प्रामाणिक चरित्रं उपलब्ध नाहीत. पारंपरिक चरित्रं विसंगती, कालविपर्यास आणि दंतकथांनी भरलेली आहेत. त्यांना इतिहासाचं साधन मानण्यात मोठीच अडचण येते. नामदेव-ज्ञानेश्वरांपासून ते थेट तुकारामांपर्यंत प्रामाणिक चरित्रसाधनांची वानवा आहे. संतांच्या नावांवर उपलब्ध असलेल्या साहित्यातसुद्धा प्रक्षिप्ततेचा दोष आहे. त्यातून मूळ साहित्य निवडणंही कठीण जातं. महिपतींसारख्या उत्तरकालीन चरित्रकारांनी संतांचे परस्परसंबंध जोडण्याच्या नादात मोठ्या गफलती झाल्यात. या सार्‍या धुक्यातून विसोबा खेचरांसारख्या दुर्लक्षित संताच्या चरित्राची वाट काढणं हे एक दिव्य होऊन बसतं.

आपल्याकडचे जातींबद्दलचे समज अचाट आहेत. त्यातून निर्माण झालेल्या भ्रमित समाजवास्तवामुळे संतांच्याही जाती महत्त्वाच्या ठरतात. कारण आम्ही संतांनाही जातीत वाटून टाकलंय. विसोबांच्या ना जातीचा नीट उल्लेख आहे, ना मूळ गावाचा. त्यांच्या वेगवेगळ्या जातींचे उल्लेख निरनिराळ्या ठिकाणी सापडतात. काल्पनिक जन्मकथा रचून महापुरुषांचं अवैदिक बहुजनी मूळ लपवायचं. शेवटी त्यांना वैदिक ब्राह्मणच ठरवायचं, ही वृत्ती किमान गुप्तकाळापासून आपल्याकडं आहे. तेही नाही जमलं तर इतक्या भाकडकथा निर्माण केल्या जातात की, तो महापुरुष नेमक्या कोणत्या समाजाचा होता हे समजणंच दुरापास्त होऊन जातं. उदाहरणार्थ, चाणक्याची जात आणि गोत्र आपल्याला २४०० वर्षांनीही माहीत असतं, पण ज्यानं भारतातलं पहिलं साम्राज्य स्थापन केलं त्या चंद्रगुप्ताच्या एवढ्या दंतकथा बनवल्या जातात की, त्याचं मूळ शोधणं अशक्यप्राय आहे. विसोबांच्या काळात जातिव्यवस्था जन्माधारित बनली होती. वेदांपेक्षा जुन्या असणार्‍या आगमिक हिंदू धर्माला वेदांची दुय्यम का होईना; पण प्रतिष्ठा ठेवावी लागत असावी. असं बौद्धिक-सांस्कृतिक वातावरण तेव्हा असल्याचं आपल्याला विसोबांच्याच लेखनावरून स्पष्ट दिसतं.

विसोबांचं मूळ गाव नक्की केल्याशिवाय त्यांच्या जातीचा विचार करता येणार नाही. ते आळंदीचे असले तर चाटी या कापड व्यापारी समाजाचे, पैठणजवळच्या मुंगी गावचे असले तर खिस्ती म्हणजे सावकार, बार्शीचे असले तर लिंगायत जंगम किंवा सोनार आणि औंढ्याचे असले तर सराफीचा व्यवसाय करणारे शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण असावेत, असे उल्लेख निरनिराळ्या ग्रंथांमधून झालेले आहेत किंवा अभ्यासकांनी तसे निष्कर्ष काढले आहेत. हा विचित्र तिढा आहे. यातून विसोबांच्या समाजाचा नेमका शोध घेण्याचा प्रयत्न करावा लागतो.

महिपती ‘भक्तविजया’त ज्ञानेश्वरांची महती सांगताना विसोबा खेचरांचा उल्लेख येतो. ते ज्ञानेश्वरांनी योगबलाने पाठ गरम करून त्यावर मांडे शेकल्याची प्रसिद्ध कथा सांगतात. त्यात विसोबा चाटी हे ज्ञानेश्वरादी चार भावंडांना त्रास देणारे खलनायक सनातनी ब्राह्मण म्हणून येतात. हा चमत्कार पाहून त्यांना उपरती होते. खेचरासारखा का वागतोस, असं तेव्हा ज्ञानदेव विसोबांना विचारतात. तेव्हापासून त्यांना खेचर ही उपाधी चिकटली, असं महिपती सांगतात. हे विसोबा नामदेवांचे गुरू असण्याचा मुळीच संभव नाही. ते शडुस्थळी ग्रंथांचे लेखक असण्याची तर सुतराम शक्यता नाही. विसोबांच्या शडुस्थळी ग्रंथात ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा कसलाही उल्लेख नाही. हा ग्रंथ लिहिल्यानंतर विसोबांची ज्ञानेश्वरांशी भेट झाली असं म्हणावं तर विसोबा हे स्वत: तत्त्वज्ञ आणि योगीही असताना महिपती सांगतो तसं घडण्याचा यत्किंचितही संभव नाही. एक तर महिपती दुसर्‍याच कोणा विसोबाबाबत लिहीत असावेत किंवा येनकेनप्रकारे ज्ञानेश्वरकालीन सर्वच ज्ञात महात्म्यांना ज्ञानेश्वरांशी जोडण्याचा प्रयत्न महिपतींनी केला असावा.

‘महाराष्ट्र सारस्वत’कार वि. ल. भावेंनी दासो दिगंबरांच्या ‘संतविजय’मधील एका ओवीचा संदर्भ देत विसोबा पैठणजवळच्या मुंगी गावात खिस्ती म्हणजे सावकारीचा व्यवसाय करत असल्याचा दावा केलाय. या कथेत प्रमाण काहीच नाही, उलट त्यांच्या या बिनकामाच्या संदर्भामुळे गोंधळ वाढतो. त्यामुळं ती कथाही बाजूला ठेवणं सोयीचं. ‘खेचर’ या विसोबांच्या उपपदाबाबतही असाच विचार करता येईल. ज्ञानदेवांमुळे विसोबांना खेचर ही उपाधी चिकटली, असं महिपती म्हणतात; पण तसं झालं नसावं. विसोबा हे नाथ आणि लिंगायत पंथातील अधिकारी पुरुष होते, हे त्यांच्याच शडुस्थळी या रचनेवरून दिसतं. योगात खेचरी मुद्रा ही उच्च दर्जाच्या योग्यालाच साधता येते, अशी पुरातन मान्यता आहे. खेचरी मुद्रेत लीन असलेल्या विसोबांना खेचर मिळाल्यास आश्‍चर्य वाटायचं कारण नाही.

परस्परविरोधी दंतकथांमुळे विसोबांच्या आडनावाचा किंवा जातीचा गुंता सोडवणं कठीण झालंय. डॉ. रा. चिं. ढेरेंनी तो काही प्रमाणात सोडवला आहे. त्या आधारेच त्यापुढे जात पुढील विवेचन करता येतं. महिपतीच्या सांगण्यानुसार विसोबा हे चाटी होते. चाटी लोक कपड्यांचा व्यापार करतात. सोलापुरात प्रसिद्ध कपड्याचा बाजार हा चाटी गल्लीतच आहे. तशीच चाटी गल्ली बार्शी आणि लातुरातही आहे. सध्या चाटी आडनावाचे लोक आपण ब्राह्मण आहोत, असं सांगतात, अशी माहिती सोलापूरचे अभ्यासक विशाल फुटाणे यांनी दिली. महाराष्ट्राच्या या गल्ल्यांमधील चाटी आडनावाचे लोक आजही कापड व्यवसाय करतात. मात्र कर्नाटकात चाटी आडनावाचे लोक कपड्यांचा व्यापार नव्हे तर कापड बनवायचं काम करत असत, असं काही तुरळक उल्लेखांवरून दिसतं.

इंथोवेन, रसेल अथवा हिरालाल यांनी आपल्या जातीकोशांत चाटी समाजाचा उल्लेख जात म्हणून कुठेही केलेला नाही. भारत सरकारच्या जातींच्या यादीतही ही जात नाही. त्यामुळं हे केवळ एक आडनाव आहे. या आडनावाची माणसं कापड व्यापारी होती, असं म्हणता येईल. या आडनावाचे लोक महाराष्ट्रात कापड व्यापार करत असले तरी ते मूळ कर्नाटकातील कापड उत्पादक म्हणजेच विणकर असण्याचीच अधिक शक्यता आहे. काही चाटी व्यापाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सीमेजवळच्या भागांत सोलापूरपासून मराठवाड्यापर्यंत विस्थापित झाले असावेत. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातही या आडनावाचे लोक तुरळक प्रमाणात आहेत. विसोबांच्या तत्त्वज्ञानावर लिंगायत परंपरेची छाप आहे ती या कर्नाटक मुळातूनच, हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे. दक्षिणेतील लिंगायत आणि उत्तरेतील नाथ यांच्या तत्त्वज्ञानाचा मनोहर मिलाफ विसोबांच्या तत्त्वज्ञानावर आणि तत्त्वदृष्टीवर झाला आहे.

महिपती भक्तविजयच्या नवव्या अध्यायात म्हणतात, ‘विसोबा चाटी म्हणून| बहु होता कुटील ब्राह्मण॥’ विसोबा चाटी असतील तर ते ब्राह्मण कसे काय, हेदेखील शोधावं लागेल. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘विसोबा खेचर विरचित षट्स्थल’ या पुस्तकात विसोबा हे पांचाळांमधील सोनार समाजाचे होते असं दाखवून दिलंय. यासाठी त्यांना प्राप्त झालेल्या ‘शिल्पशास्त्र’ या अपूर्ण ग्रंथाचा मोठाच उपयोग झाला आहे. यात विसोबा खेचरांची गुरुपरंपराही आलेली असून, हा ग्रंथ पांचाळ समाजाची वंशोत्पत्ती विशद करतो. पांचाळ समाजाच्या आचार्य परंपरेत विसोबांचं नाव सन्मानानं येत असल्यानं ते पांचाळ समाजाचे होते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ढेरेंनी काढलेला आहे. या ग्रंथात शिवागम आणि नाथपरंपरेला शिरसावंद्य मानत विसोबांना ‘शिवब्राह्मण’ असं संबोधलं आहे. आजही पांचाळ समाज स्वत:ला ब्राह्मण समजत स्वत:च्या पुरोहितांकडून उपनयनही करतात, असं दिसून येतं. संतविजयाचा संदर्भ घेत विसोबांचा सराफीचा व्यवसाय लक्षात घेतला तर ते पांचाळांतील सोनार समाजाचे असावेत, असंही ढेरेंनी नमूद केलंय. पण ते चाटी होते, असं अधिक प्रसिद्ध कथांमध्ये वारंवार सांगितलंय, यावर मात्र ढेरेंनी अधिक प्रकाश टाकलेला नाही.

पांचाळ समाजात सर्वसाधारणपणे सोनार, सुतार, लोहार, कासार आणि पाथरवट म्हणजेच वडार अशा पाच जाती येतात. याच पाच जातींचे असून पांचाळ नसलेले लोकही मोठ्या संख्येनं असतात, हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे. त्या अर्थानं पांचाळ ही एक समूहजात किंवा जातसमूह आहे. समूहजात असल्यानं काही ठिकाणी पांचाळांत या पाचच नव्हेत तर अन्य जातीही आढळतात. त्यात विणकर, चर्मकार, धोबी, न्हावी अशांचा समावेश करत सोनार आणि लोहार वगळले जातात. पांचाळातल्या अन्य जातींप्रमाणंच यांचेही पुरोहित त्यांच्याच जातीचे असतात. आजवर कधीच ते ब्राह्मणांकडून उपनयन, धार्मिक कर्मकाडं करून घेत नसत. अलीकडे मात्र या प्रथेत बदल झाला आहे. पांचाळांतील भिन्न पाच वर्गांत आपापसात लग्न होतात. ते स्वत:ला दैवज्ञ ब्राह्मण समजू लागले ते पेशवाईच्या काळाच्या आसपास. त्यापूर्वी ते स्वत:ला शिवब्राह्मण म्हणवून घेत असल्याचं ‘शिल्पशास्त्र’ या ग्रंथावरून दिसतं. पांचाळ जात दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या प्रदेशांत प्रामुख्यानं आढळते. तमिळनाडूत पांचाळ जातीला कम्मालर म्हणतात. यांच्यात पाच गोत्रं आहेत. सूपर्ण दैवज्ञ, अवभुवन त्वष्ट, प्रस्थन शिल्पी, सनग मनू आणि संतन मनू अशी या गोत्रांची नावं असून, ती विश्वकर्म्याच्या मुलांच्या नावांवरून आल्याची समजूत आहे.

पांचाळ समाजाचे लोक आपली उत्पत्ती विश्वकर्मापासून झाल्याचं मानतात. ज्यानं विश्व बनवलं तो विश्वकर्मा. विश्वकर्मा ही तशी एक देवता नाही. ऋग्वेदात कधी इंद्राला तर कधी प्रजापतीला विश्वकर्मा म्हटलंय. विश्वकर्मा हे ऋग्वेदात दैवतनाम म्हणून येत नाही तर देवतांची उपाधी म्हणून येतं. ही सूर्याचीही उपाधी होती. म्हणजेच वैदिक धर्मात विश्वकर्मा हे दैवत नव्हतं तर ते देवाचं एक कर्म मानलं जात होतं. नंतरच्या काळात विश्वकर्माला प्रजापतीशी एकरूप करण्यात आलं. ऐतरेय ब्राह्मणात तर विश्वकर्मा नावाचा एक वैदिक राजाच आहे. त्याला कश्यप ऋषीनं ऐंद्राभिषेक केला होता, असं नमूद आहे. अवैदिक हिंदुच्या दृष्टीनं मात्र शिव हाच विश्वकर्मा आहे, कारण त्यालाच विश्वनिर्माता मानलं जातं. पण पुढं त्यांनी विश्वनिर्माता ब्रह्म या संकल्पनेशी विश्वकर्माला जुळवून टाकलं.

पुराणांमध्ये विश्वकर्म्याच्या परस्परविरोधी कथा सापडतात. पुराणं आणि महाभारतात विश्वकर्म्याला देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानलंय, दैवत नव्हे. हा ब्रह्माचा पुत्र होता, असं काही ठिकाणी म्हटलंय तर कुठे बृहस्पतीची बहीण योगसिद्धा आणि प्रभास वसू यांचा मुलगा होता असंही म्हटलंय. पांचाळांच्या पारंपरिक कथांतील गोत्रप्रवर्तक मानलं गेलेल्या विश्वकर्माच्या पाच पुत्रांची नावं आणि मनू, चाक्षूस, शम, काम, हर्ष, नल, वानर, विश्वरूप, वृत्रासूर ही पुराणांत आलेली नावं जुळत नाहीत. खरं तर वैदिकांमधील विश्वकर्मा ही संकल्पना आणि अवैदिक शैवांची विश्वकर्मा ही संकल्पना वेगळी आहे. त्यांनी त्याभोवती स्वतंत्रपणे वेगवेगळ्या कथा बनवल्या. पुढे पुराणकारांनी त्यात सरमिसळ केल्यामुळं गोंधळ झालेला दिसतो. नंतर अज्ञानामुळंही यात भरच पडत राहिली. पांचाळ शिवागमांना आणि शिवालाच विश्वउत्पत्तीचं मूळ मानत असल्यानं त्यांच्या विश्वकर्म्याबाबतच्या कथा स्वतंत्र होत्या. वैदिक विश्वकर्म्याशी त्याचा संबंध नव्हता. विश्वकर्मा हा पांचाळांच्या अस्तित्वाशीच जोडलेला मानल्यामुळं ते काही ठिकाणी विश्वकर्मा हेच जातीनाव आणि आडनाव म्हणून वापरतात.

पांचाळांत नेमक्या कोणत्या जाती असतील, हे निश्चित नसतं. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार घृताची नावाची अप्सरा विश्वकर्म्याची प्रेयसी होती. तिला एकदा विश्वकर्म्यानं शाप दिला, तू शूद्र कुळात जन्म घेशील. त्यामुळं ती गवळ्याच्या घरी जन्माला आली. ब्रह्मदेवाला दया येऊन त्यानं विश्वकर्म्यालाही एका ब्राह्मण कुळात जन्म घ्यायला लावला. तेव्हा घृताची आणि विश्वकर्म्यापासून झालेल्या संततीपासून कुंभार, सोनार, सुतार, शिंपी, विणकर इत्यादी निर्माणकर्त्या जाती निर्माण झाल्या. जातसंस्थेची ही एक वेगळी उत्पत्ती आहे आणि ती पुराणांनी कष्टकरी जातींना कमअस्सल ठरवण्यासाठी तयार केल्याचं समजून घ्यायला हवं. ब्रह्मदेव आणि विश्वकर्मा एकच असल्याचं पूर्वीच्या साहित्यात मानलं जात असताना इथं मात्र त्यांना वेगळं केलंय. यावरूनही त्याचा फोलपणा कळतो.

पुराणकथांतील भाकड भाग सोडून दिला तरी सर्वच निर्माणकर्त्या जाती सृष्टीत उपलब्ध असलेल्या सामग्रीतून नवनिर्मिती करत असतात. त्यामुळं त्या स्वत:ला विश्वाचीच रचना करणार्‍या विश्वकर्म्याचे वारसदार मानत असतील तर त्यात नवल नाही. त्या अर्थानं सर्वच निर्माणकर्ते आजचेही विश्वकर्माच आहेत, असं म्हणता येईल. म्हणजेच विश्वकर्मा ही एक उदात्त संकल्पना आहे. ती या समाजांचा गौरव करणारी एक उपाधीच आहे.

पण पांचाळ स्वत:ला ब्राह्मण का समजू लागले, हे यातून स्पष्ट होत नाही. त्यासाठी आपल्याला समाजेतिहासात जावं लागेल. भारतात मंदिरसंस्था प्रबळ झाली ती गुप्तकाळात. त्याआधी अर्थव्यवस्था या सर्वस्वी व्यावसायिक श्रेण्यांच्या अखत्यारीतील बाब होती. श्रेणी म्हणजे आजचं ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ म्हणता येतील. श्रेणी प्रमुखांना राजदरबारी सन्मान असे. एवढा की त्यांच्या अनुमतीशिवाय करविषयकही धोरण ठरवलं जात नसे. फक्त व्यापार्‍यांच्याच श्रेणी नसून चर्मकार आणि सुवर्णकारांच्याही श्रेणी असत. व्यावसायिक श्रेणी आणि व्यावसायिकांना खूपच प्रतिष्ठा होती. तोवर व्यवसायबदल होत असल्यानं म्हणजेच जातीही बदलता येत असल्यानं या श्रेण्या नवीन प्रवेश करणार्‍यांना प्रशिक्षणही देत असत. गुप्तकाळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला आणि अचानक विष्णूमंदिरांचं पेव फुटलं. गुप्त राजवटीनं श्रेण्यांचे ठेवी घेण्याचे आणि कर्ज देण्याचे अधिकार काढून मंदिरांकडे सोपवले. त्यामुळं मंदिरं श्रीमंत होऊ लागली आणि व्यावसायिक श्रेण्या कंगाल. तिथूनच जातव्यवस्थेच्या अवनतीची सुरुवात झाली आणि दहाव्या शतकानंतर ती रसातळाला पोचली, असं समाजेतिहास सांगतो.

मंदिर माहात्म्य आणि संख्या अपरंपार वाढल्यामुळं साहजिकच फक्त देव आणि मंदिरांशी संबंधित काम करणार्‍या कारागीर वर्गाचा उदय झाला. यात सोनार, विणकर, लोहार, पाथरवट, सुतार इत्यादी काही जातींतील विशिष्ट वर्ग फक्त देवळांचं काम परंपरेनं करत राहिला. त्यातूनच पांचाळ अथवा विश्वकर्मा समाजाची उत्पत्ती झाली. ते देवाचं कार्य करत असल्यानं स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे आणि ब्राह्मणांच्या समकक्ष समजू लागले. वैदिक ब्राह्मणांनी त्यांच्या या ब्राह्मणीकरणाला मान्यता दिली नाही. अगदी पेशवाईतही काही दैवज्ञ ब्राह्मण समजणार्‍या सोनारांनी आपली धर्मकृत्यं वैदिक पद्धतीनं केली म्हणून त्यांच्या जिभा कापण्यात आल्या, असं नमूद आहे. असं असलं तरी मध्ययुगात वैदिक गोत्रांशी आणि उच्चवर्णांशी स्वत:चा संबंध जोडण्याची अवैदिकांत आलेल्या प्रथांमधून देवांसाठी निर्मितीकार्य करणार्‍या पाच जातींना पांचाळ म्हणण्याची पद्धत रूढ झाली. स्वत:च्याच पुरोहिताकरवी का होईना; पण त्यांनी स्वत:चं उच्चत्त्व मिळवलं. त्यामुळं हे पांचाळ ब्राह्मणांपासून फटकूनच होते. अगदी अलीकडेपर्यंत ते ब्राह्मणांना धर्मकृत्यांसाठी पुरोहित म्हणून बोलावत नव्हते.

दक्षिणेत मात्र वेगळंच झाले. तिथं शिवमंदिरांचाच बोलबाला अधिक राहिल्यानं दक्षिणेतील पांचाळ स्वत:ला शिवब्राह्मण म्हणवत राहिले. विसोबांचा विचार करताना हे लक्षात ठेवायला हवंच. शिवाय पांचाळांमध्ये विणकरही येतात हेदेखील विसरता कामा नये. देवता आणि राजांसाठी कापड बनवणारी देवांग कोष्टी ही विणकरांमधली पोटजात स्वतःला ब्राह्मण मानते. त्यांचं तर स्वत:चं पुराणही आहे. सोनारांमध्येही देवांग सोनार अशी शाखा आहेच.

विसोबा खेचर हे पांचाळ समाजाचे आचार्य असले तरी त्यांना पांचाळांमधील सोनार ठरवण्याऐवजी पांचाळांमधील विणकर मानणं अधिक तर्काला धरून आहे. चाटी आडनावाच्या लोकांचा सोन्याच्या व्यवसायाशी संबंध नसून कपड्यांशी आहे. पारंपरिक कथांतून निष्कर्ष काढायचा झाला तर चाटी हे अत्यंत दुर्मीळ असलेलं आडनाव पारंपरिक माहितीत येतं. त्यावरून त्यांचा आडनावाला साजेसा कापडांचा व्यापार असावा आणि ते पांचाळांमध्ये येणार्‍या विणकर समाजातले असण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्यासाठी ‘भक्तविजया’त वापरलेलं ‘कुटिल ब्राह्मण’ हे विशेषणही यासंदर्भात महत्त्वाचं आहे. इथं कुटिल याचा अर्थ कट करणारा खलनायक असा घेता येतो. पण कुटिल याच शब्दाचा स्वतः नाही ते दाखवणारा असाही एक अर्थ आहे. ब्राह्मण नसताना स्वत:ला ब्राह्मण समजणारे या अर्थानं कुटिल शब्द असू शकतो. कौटिल्य शब्दाची फोडही याच आधारानं केली जाते.

पांचाळांमधल्या जातींमध्ये विविध आनुवांशिकींतून म्हणजे जमातींमधून व्यावसायिक कारणांमुळे आलेले लोक आहेत. सोनार आणि विणकरांमध्ये तर विविध जमातींतून आणि प्रदेशांतून आलेल्या लोकांचं मिश्रण सर्वात जास्त आहे. उदाहरणार्थ सोनारांत अहिर, लाड, नाग, गुज्जर अशा प्राचीन जमातींतून आलेले लोक आहेत. भारतातील प्रत्येक जातीची जवळपास अशीच अवस्था आहे. त्यात इतकं मिश्रण झालंय की जातींना अवास्तव प्रतिष्ठा देण्याचं खरं तर काहीच कारण नाही.

‘शडुस्थळा’वर मूळ कर्नाटकातल्या वीरशैव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे. वीरशैव आणि नाथपंथ हे मुळात अवैदिक आहेत. त्यामुळं ते वर्णव्यवस्था मानत नाहीत. जातिभेदही त्यांना मान्य नाहीत. विसोबा खेचरांच्या ‘शडुस्थळा’तही वर्ण किंवा जातीचे उल्लेखही येत नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांनी वेदांना दुय्यम स्थान दिलेलं आढळतं. विसोबांच्या काळात वेदांचं प्रस्थ असलं तरी त्यांना महत्त्व न देणारा हिंदू घटकही प्रभावी होता, हे विसोबांवरून लक्षात येतं. ते आगमांनाच महत्त्व देतात. त्यामुळं ते तंत्रशास्त्रातल्या प्रतिमा आणि तत्कालीन वैज्ञानिक संकल्पनांचा सढळपणे उपयोग करतात. उदय आणि अस्त नसलेला, रात्र-दिवस नसलेला सूर्य हा स्थिर आणि स्वयंप्रकाशित आहे, असं तत्कालीन ज्ञान ते ‘शडुस्थळा’च्या ४०७व्या ओवीत सांगतात. हीच संकल्पना त्यांच्या समकालीन असणार्‍या ‘ज्ञानेश्वरी’तही आलेली आहे. त्यात सूर्याचं स्वयंप्रकाशित्व आलेलं नाही, ते इथं आहे. नाथपंथातही तांत्रिकांनी विकसित केलेल्या शोधलेल्या संकल्पना विसोबांच्या लेखनातही ठळकपणे आलेल्या दिसतात. वैदिक तत्त्वज्ञानाचा तिथं मागमूसही दिसत नाही.

कोणत्याही ग्रंथात लेखकाच्या पारंपरिक व्यवसायाचा म्हणजे जातीचा किमान उपमा-अलंकारांच्या रूपात कोठेतरी उल्लेख येतो. हे बहुतांश संतांच्या बाबतीत दिसून येतं. ‘शडुस्थळा’चं काळजीपूर्वक परीक्षण करूनही त्यात एकही व्यवसायनिदर्शक अगदी सूचकही उल्लेख येत नाही. तत्त्वागमात रमलेला योगी असंच विसोबांचं ‘शडुस्थळा’त येणारं रूप आहे. त्यामुळं ते आपला पारंपरिक व्यवसाय स्वत: करत असण्याची शक्यता दिसत नाही. ते भटकंती करत असल्यानं त्यांचं निश्‍चित जन्मस्थान ठरवणंही अवघड आहे. ग्रंथाच्या भाषेत वेगळीच प्रादेशिक लेखनशैलीही आहे. त्यामुळं ते आळंदी किंवा पैठणसारख्या त्या काळातल्या सनातन्यांचं प्राबल्य असलेल्या शहरांपैकी नक्कीच नसावेत. त्यांना आळंदीचे ठरवताना केलेल्या सरमिसळीमुळं त्यांनी पुरोहितशाहीच्या विरोधात केलेल्या संघर्षालाच अदृश्य करण्याचा प्रयत्न दिसतो.

कथांमधल्या विसंगती दूर करत विसोबा मूळचे कर्नाटकातले असून, वीरशैवांच्या प्रभावातले मूळ नाथपंथीय होते. विसोबांचं आडनाव चाटी असावं. तसंच ते कापड व्यवसाय करणार्‍या घराण्यात जन्माला आले असावेत. ते पांचाळांतले विणकरही असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांची जन्मभूमी सोलापूर परिघातील म्हणजे बार्शीची होती. अशा निष्कर्षांच्या जवळ आपण जाऊ शकतो.

0 Shares
परंपरा बंडखोरीची हरिहरा नाही द्वैत