परंपरा बंडखोरीची

अशोक राणा

पांचाळ परंपरा आणि लिंगायत तत्त्वज्ञान यातून मिळालेला विद्रोहाचा वारसा संत विसोबा खेचरांनी ताकदीनं पुढे नेला. तो भेदाभेद आणि निर्बुद्ध कर्मकांडांच्या विरोधात केलेल्या बंडखोरीचा वारसा होता.

संतशिरोमणी नामदेव महाराजांचे गुरू या नात्यानं वारकरी संप्रदायात विसोबा खेचर यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. शिष्याच्या कीर्तीमुळे गुरूची ओळख होण्याची यादव काळातील ही एक घटना आहे. परंतु गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीविषयी नकारात्मक माहिती प्रचलित असल्याची ती कदाचित एकमेव घटना असावी. त्यामागे कोणकोणती कारणं असावीत, याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. ही नकारात्मक माहिती प्रामुख्यानं महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या ‘भक्तविजय’ या प्रसिद्ध ग्रंथातून येते. त्यानुसार नामदेवाचं मडकं कच्चं असल्याचा निर्वाळा संत गोरा कुंभारांनी दिल्याची कथा आहे. स्वतः नामदेवांनी विसोबांकडून अनुग्रह घेण्याची प्रेरणा आपणास विठ्ठलाकडून मिळाली, असं आपल्या अभंगांमध्ये लिहिलं आहे. त्यामुळं थापटण्याची कथा ही एक शुद्ध लोणकढी थाप असल्याचं स्पष्ट होतं. आजच्या ‘कुजबुज संस्कृती’चं ते यादवकालीन रूप असावं. त्यामधून नामदेवांना ज्ञानदेवादी भावंडांच्या मानानं क्षुद्र लेखलं जावं, अशी अपेक्षा व्यक्त होते.

विसोबा खेचर यांच्याविषयी महिपतीबुवांनी जी माहिती दिली आहे त्यामधून तर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. या माहितीत विसोबा हा आळंदीतील एक कुटिल ब्राह्मण होता, असं म्हटलं आहे. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘चक्रपाणि’ या शोधग्रंथात विसोबा खेचर ब्राह्मण नसून पांचाळ होते असं सिद्ध केलं आहे. त्याचप्रमाणं महिपती तसंच इतर संतचरित्रकारांनी विसोबा खेचर यांच्या गुरुस्थानी ज्ञानेश्वरांच्या बहीण मुक्ताबाई यांना ठेवलं, यालाही ऐतिहासिक आधार नसल्याचं दाखवून दिलं आहे. पांचाळ सोनार या जातीत जन्मलेल्या विसोबांना महिपतीनं ब्राह्मण का म्हटलं असावं, याचा वेध घेणं महत्त्वाचं ठरेल.

विसोबा खेचर रचित ‘शडुस्थळी’ या ग्रंथावर संशोधन करताना ढेरे यांना पांचाळ या जातीविषयी जी माहिती मिळाली, त्यानुसार पांचाळ या नावानं ओळखल्या जाणार्‍या जातीमध्ये सुतार, सोनार, तांबट, लोहार आणि पाथरवट या शिल्पजीवी जातींचा समावेश होतो. ‘शिल्पशास्त्र’ या १२४३ साली लिहिलेल्या मराठी ग्रंथात ‘शिवाच्या सद्योजातादी पंचमुखापासून म्हणजे पंचब्रह्मापासून पंचभूतात्मक सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि सृष्टीचे हे शिल्प घडविणाराने मनू, मय, त्वष्टीक, शिल्पक आणि दैवज्ञ या पाच आचार्यांकरवी पांचाळांची शिल्पकार परंपरा कशी निर्माण केली’ ते विस्तारपूर्वक सांगितलं आहे. शैव संप्रदायात वारंवार वापरली जाणारी ‘पंचब्रह्म’ ही संज्ञा या ग्रंथात अनेकदा उपयोगात आणली आहे. यातून शिवाची पाच मुखं म्हणजे पंचब्रह्म असल्याचं स्पष्ट होतं. त्याचा आधार घेऊन पांचाळांनी आपल्या जातीला ब्राह्मण वर्णात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा हे दिसून येतं. या प्रयत्नात काही ठिकाणी त्यांना यशही आलं आहे. विश्वकर्मा या नावानं ओळखले जाणारे अनेक लोक ब्राह्मण म्हणूनही ओळखले जातात, तसंच पांचाल ब्राह्मण या नावाची एक जात उत्तर भारतात आढळते.

पांचाळ हा शब्द पंच+चाळ असा व्युत्पत्तीनं बनलेला आहे. चाळ या शब्दाचा अर्थ कौशल्य असा होतो, म्हणून पाच प्रकारची कौशल्यं आत्मसात केलेले लोक म्हणजे पांचाळ होत. त्यांच्या निर्मितीमागे ज्या पाच आचार्यांचा उल्लेख केला जातो, त्यापैकी एक मनू हे नाव येतं. हा मनुस्मृतीचा रचयिता मनू नाही. या ठिकाणी मनू हा शब्द कानडी भाषेतील असून, त्याचा अर्थ पृथ्वी असा होतो. माती खोदणारे वोड्डा म्हणजेच मन्नू होत. ती पाथरवटांमधील एक पोटजात आहे. त्यावरून मनू या पांचाळांमधील आचार्याचं नाव आलं असावं. विश्वकर्माचा ज्येष्ठ पुत्र मनू हा लोखंड या धातूशी संबंधित कारागीर होता, अशी माहिती प्राचीन ग्रंथांमध्ये आढळते. त्याचे वंशज म्हणजे लोहार होत असं म्हटलं जातं. तो पांचाळांचा पहिला आचार्य मानला जातो. दुसरा आचार्य म्हणून मय हे नाव येतं. मय हे पांडवांसाठी मयसभा निर्माण करणार्‍या शिल्पकाराचं नाव महाभारतात येतं. त्याला ‘मयासुर’ या नावानंही संबोधलं गेलं आहे. असुर हे अनेक कलांमध्ये प्रवीण होते, त्यापैकी एक मय होता.

यानंतर त्वष्टीक या आचार्याचा उल्लेख येतो. वैदिक वाययात त्वष्ट असा देवतांच्या शिल्पकाराचा उल्लेख येतो. त्याचा विश्वकर्मन् असाही उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यालाच पांचाळांनी आपला आचार्य मानलं असावं. त्याचा नातू वृत्र याची हत्या इंद्रानं केल्यामुळं त्यानं इंद्रावर बहिष्कार टाकला होता, अशी कथा शतपथ ब्राह्मणात येते. इंद्रप्रस्थ नगरी निर्माण करण्यात त्यानं पांडवांना मदत केली होती असा उल्लेख महाभारतात येतो. त्याचा नातू वृत्र याला भागवतात ब्राह्मण म्हटलं आहे. त्यामुळंच इंद्राला त्याची हत्या केल्यानं ब्रह्महत्येचं पाप लागलं असं म्हणतात. पांचाळांच्या ब्राह्मणत्वाचा दावा अशा काही उदाहरणांतून स्पष्ट होतो.

यानंतर पांचाळांच्या आचार्याचा उल्लेख शिल्पक असा येतो. ऋषी शिल्पी या नावानंही तो ओळखला जातो. त्याचं गोत्र प्रयत्न आहे. त्याच्या वंशजांनी शिल्पकला विकसित केली, म्हणून त्यांना मूर्तिकार या नावानंही संबोधलं जातं. पाचवा आचार्य दैवज्ञ आहे. त्याचं गोत्र सुपर्ण असल्याची पारंपरिक माहिती आहे. त्यांचे वंशज सोनार असल्याचं मानलं जातं. सोनारांमध्ये या नावाची एक पोटजात आहे. ते स्वतःला दैवज्ञ ब्राह्मण या नावानं संबोधतात. ब्राह्मण त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यायला तयार नाहीत आणि ते स्वतःला इतर सोनारांपेक्षा श्रेष्ठ समजतात. आजही काही पांचाळ ब्राह्मणत्वावर दावा सांगत आहेत. त्याचबरोबर मागासवर्गीयांच्या सवलतीही मागत आहेत. पांचाळांमधील सोनार अशा त्रिशंकू अवस्थेत आहेत. विसोबा पांचाळ सोनारांपैकी असावेत, असं डॉ. रा. चिं. ढेरे यांचं मत आहे.

विसोबांचं मूळ दक्षिण भारतात असल्याचं त्यांच्या साहित्यावरून दिसून येतं. परंतु आज जे लोक दक्षिण भारतात स्थिरावले आहेत, ते लोक मुळात उत्तर भारतात होते, हे ऐतिहासिक पुराव्यांवरून स्पष्ट होतं. प्राचीन भारतात उत्तरेकडे पंचाल या नावाचा एक लोकसमूह असल्याची माहिती ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळते. तसंच महाभारतात पांचाळ असा त्यांचा उल्लेख येतो. ऋग्वेदातील पञ्चजन हेच असावेत असं काही विद्वानांनी मानलं आहे. उपनिषदांमध्ये पांचाळ देशातील ब्राह्मण दार्शनिक आणि भाषाशास्त्रीय वादविवादांमध्ये प्रवीण होते, असा उल्लेख आढळतो. पुराणांनी उत्तर आणि दक्षिण असे पांचालाचे दोन विभाग असल्याचं सांगून महाभारतातील द्रुपद राजा दक्षिण पांचाल देशाचा राजा असल्याचा निर्देश येतो. त्याची मुलगी द्रौपदी असल्यामुळं तिला पांचाली या नावानं संबोधलं जातं. पंचाल हे जनपद कुरु या जनपदाला लागून असल्याचा उल्लेख महाभारतात येतो. यावरून पांचाळ या कारागिरांच्या वर्गाचं प्राचीनत्व सिद्ध होतं. विद्या आणि कला यांचे भोक्ते असलेले पांचाळ आर्यांमध्ये स्वतःला सामावून घेण्याकरिता धडपडत होते, हे अनेक प्राचीन कथांवरून दिसून येतं. त्यापैकी एक तक्षकाची कथा आहे.

तक्षक या शब्दाचा एक पर्याय तक्षन असाही आढळतो. त्याचा अर्थ होतो तासणारे. दगड, लोखंड, लाकूड, सोनं, माती इत्यादींना तासून वस्तू तयार करणारे ते तक्षन होत. तक्षक हे त्याचं एक रूप आहे. महाभारतात तक्षकाची कथा जनमेजयाच्या सर्पसत्राच्या संबंधात येते. नागलोक आणि आर्य यांच्यामधील संघर्ष तक्षक कथेच्या निमित्तानं व्यक्त झालेला आहे. तक्षक हे राज्यकर्तेही होते. तक्षशिला हे तक्षकाच्या राजधानीचं ठिकाण होतं. नाग कुळातील या लोकांचा संघर्ष कुरुकुळातील परीक्षिताशी होऊन त्यात परीक्षित मारला गेला असावा. महाभारतात ही कथा प्रतीकात्मक रीतीनं व्यक्त झालेली आहे. वास्तविक कुरू कूळ सुद्धा नाग कूळ होतं, असं विद्वानांचं मत आहे. तक्षन या नावाच्या एका आचार्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात येतो. यावरून कारागिरांच्या या वर्गामध्ये विद्वत्ता असणारे लोकही होते हे दिसून येतं. काही अभ्यासकांनी तक्षकाची कथा वेदांमधील वृत्र कथेवरून बेतलेली असल्याचं मत मांडलं आहे. वेदामधील वृत्र म्हणजेच महाभारतातील तक्षक होय. त्याचा पिता म्हणूनही प्राचीन ग्रंथांमध्ये त्वष्ट्याचा उल्लेख येतो. पांचाळांचा एक आचार्य त्वष्टा नावाचा आहे. त्यामुळं प्राचीन तक्षनकार्य करणार्‍या आर्यपूर्व जमातींशी आजच्या पांचाळांची नाळ जुळते. त्याचप्रमाणं वर्णश्रेष्ठत्वासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचीही जाणीव होते. विसोबा खेचर यांचा संघर्ष वर्णवर्चस्वविरोधातील होता, हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येतं.

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी विसोबा शिवब्राह्मण असल्याचा ‘शिल्पशास्त्र’ या ग्रंथातील पुरावा दिला आहे. त्याचप्रमाणं ते पांचाळांपैकी सोनार असल्याचंही म्हटलं आहे. त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही आणि जी उपलब्ध आहे तीही नकारात्मक आहे. पारंपरिक कथेनुसार नामदेव गुरुपदेश घेण्यासाठी विसोबांकडे गेले तेव्हा ते आजच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील शिवमंदिरात गलितगात्र अवस्थेत शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले होते. विसोबांनी आपण वयोवृद्ध असल्यामुळं हालचाल करू शकत नाही, त्यामुळं ‘जेथे देव नाही, तेथे माझे पाय ठेव’, असं नामदेवांना सांगितलं. त्यानुसार नामदेव पाय उचलून ठेवत त्या त्या ठिकाणी शिवपिंड असल्याचं त्यांनी पाहिलं. देव नाही असं कोणतंही ठिकाण असू शकत नाही हा संदेश यातून त्यांना मिळाला. त्यानंतर विसोबांनी नामदेवाला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली असं म्हणतात. ही कथा चमत्कारानं भरलेली आहे, पण तिच्यातून अनेक गोष्टी आपणास कळतात.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे शैव तीर्थक्षेत्र नामदेवांच्या आधी चार-साडेचारशे वर्षांपासून पाशुपत शैव संप्रदायाशी नातं सांगणार्‍या उपासकांचं केंद्र होतं. येथे शैव संप्रदायाची मत्तमयूर शाखा उदय पावली होती. इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या उत्तरार्धात आमर्दकनाथ हा आचार्य येथील आमर्दक मठाचा अधिपती होता. पाशुपतांप्रमाणंच कालामुख शैव संप्रदायही येथे बहरला होता. पाशुपत संप्रदाय हा शैव संप्रदायातील सर्वात जुना संप्रदाय मानला जातो. सिंधू संस्कृतीतील पशुपती या शिवाच्या मुद्रेवरून त्याची प्राचीनता आपल्या ध्यानात येते. शिवाच्या पशुपती या नावावरून या संप्रदायाला पाशुपत हे नाव पडलं. पशु म्हणजे सर्व सृष्टीचा निर्माता शिव आहे, असं या संप्रदायात मानलं जातं. सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली लिंगपूजा यात अतिशय महत्त्वाची मानली जाते. परंतु हा संप्रदाय वैदिकांच्या प्रभावाखाली होता. यज्ञात जसं व्रत आणि दीक्षा या गोष्टींना महत्त्व असतं, तसं या संप्रदायात होतं. दक्षिण भारतात या संप्रदायातून कापालिक, कालामुख, भैरव, वीरशैव, रसेश्वर इ. उपसंप्रदाय निर्माण झालेत. तेथील शाक्त संप्रदायाशी हा संप्रदाय जोडला गेला. भारताबाहेर कम्बोज आणि चंपा या प्राचीन देशांमध्येही या संप्रदायाचा प्रसार झाला होता.

या संप्रदायाशी निगडित कापालिक या शैव संप्रदायाचे साधक मानवी कवटीत अन्न ग्रहण करीत असत. त्याचप्रमाणं केसांचं जानवं, गळ्यात मानवी मणक्यांच्या माळा, हातात रक्तानं माखलेली शिरं आणि जटेत हाडांचे तुकडे घालत असत, अशी माहिती सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिरानं आपल्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात दिलेली आहे. आठव्या शतकात होऊन गेलेल्या भवभूतीनं आपल्या ‘मालतीमाधव’ या नाटकात अघोरघंट नावाच्या कापालिकाचं वर्णन केलेलं आहे. त्यातून या संप्रदायात नर बळीची प्रथा असल्याचं दिसून येतं. अकराव्या शतकातील कृष्णमिश्राच्या ‘प्रबोध चंद्रोदय’ या नाटकात एका कापालिकानं आपल्या उपासना मार्गाची उद्घोषणा केली आहे. त्यात तो म्हणतो, ‘नुकतेच ज्याचे मस्तक तोडले आहे, ज्याच्या कंठातून रक्त वाहत आहे, अशा पुरुषांचा उपहार बली देऊन आम्ही महाभैरवाची अर्चना करतो.’ या उपासना मार्गात मेंदू, आतडी आणि महामांसाच्या चरबीला अग्नीत हवन करीत असत. त्याचप्रमाणं ब्राह्मणाच्या कवटीत सुरापान करीत असत.

अकराव्या शतकात तंत्र साधनेचं स्वरूप असं किळसवाणं झालं होतं. त्याविरुद्ध महात्मा बसवेश्वरांनी सर्वप्रथम प्रबोधनाची चळवळ उभारली. तिला लिंगायत धर्म या नावानं ओळखलं जातं. या धर्मानं शैव संप्रदायातील पारंपरिक धारणांना धक्के दिले. बसवेश्वरांच्या वचनांमधून ते स्पष्ट होतं. आपल्या उपासना आणि तत्त्वज्ञान याविषयीच्या उत्स्फूर्त काव्यरचनेला बसवेश्वरांनी ‘वचन’ असं नाव दिलं. कानडी साहित्यात मुक्त छंदातील रचनांना वचने या नावानं संबोधलं जातं. त्यात व्यक्त झालेली शिवविषयक धारणा क्रांतिकारक स्वरूपाची आहे.

‘गंगाधर, गौरीश्वर देव नव्हे, शंकर, शशीधर देव नव्हे;
पंचमुख, दशभुज असलेला, नंदिवाहनही देव नव्हे;
त्रिशूलखट्वांगधर देव नव्हे,
ब्रह्मकपाल, विष्णूकंकाल दंड धरलेला,
प्रलयकालीन रुद्रही देव नव्हे.
निराकार स्वयंभूलिंग आपणच म्हणून,
जाणिले तर, आपणच देव पहा,
अप्रमाण कुडलसंगमदेवा.’

बसवेश्वरांनी पाशुपत, कापालिक, कालामुख अशा शैव संप्रदायांनी चितारलेल्या शिवाच्या प्रतिमा पूर्णपणे नाकारून निराकार स्वयंभूलिंग असं ईश्वराचं स्वरूप पुढे मांडलं. ईश्वराची प्रचलित संकल्पना पूर्णपणे मोडीत काढून देवालयालाही त्यांनी हद्दपार केलं आहे. त्यांनी कोणतंही मंदिर बांधलं नाही किंवा त्यासाठी कुणालाही प्रोत्साहन दिलं नाही.

‘सधन उभारिती शिवमंदिर, काय करू मी गरीब पामर.
खांब असती माझे पाय, मम देहचि होय देवालय.
शिर हे सुवर्ण कलश पहा, परिसावे बा कुडलसंगमदेवा.
स्थावर असे बा नाशिवंत, जंगम हे अविनाश.’

पारंपरिक ईश्वर कल्पना स्वर्ग, देवालय, तीर्थक्षेत्र अशा गोष्टींशी निगडित आहे आणि तिच्यामधून सर्वसामान्य भाविकांचं शोषण केलं जातं. म्हणून शोषणाची मुळासकट उचलबांगडी करण्यासाठी बसवेश्वरांनी नव्या तत्त्वज्ञानाची प्रस्थापना केली. ‘कायक’ म्हणजे आपल्या चरितार्थासाठी आपण जे कार्य स्वीकारलं आहे, त्यातच कैलास आहे, अशी ‘कायकवे कैलास’ ही संकल्पना बसवेश्वरांनी मांडली. ते म्हणतात,

‘नव्हेत हो भिन्न देवलोक नि मृत्युलोक.
सत्य बोलणे हाच देवलोक,
असत्य बोलणे हाच मृत्युलोक.
सदाचारच असे स्वर्ग, अनाचारच नरक;
कुडलसंगमदेवा, यास तुम्हीच प्रमाण.’

बसवेश्वरांच्या या उपदेशाचा प्रभाव मोठ्या प्रमाणातील त्यांच्या अनुयायांवर होता. त्यामुळं भक्तिमार्गातील अनेक विकृती त्यांना नाहीशा करता आल्या. वीरशैवांपेक्षा त्यांचं तत्त्वज्ञान अधिक पुरोगामी होतं, तसंच वैदिकांशी ते फटकून राहिले. विसोबांनी वीरशैवांच्या षटस्थळ सिद्धांतावर आधारित ‘शडुस्थळी’ हा ग्रंथ रचला, हा केवळ एक योगायोग नाही. ते वीरशैवांच्या तत्त्वज्ञानाचे समर्थक होते असं दिसतं. त्यातून प्रगत झालेल्या लिंगायत धर्माचे आचारविचार त्यांना प्रभावित करणारे ठरले असणार. याच विचारानं प्रेरित विसोबांचा आचारविचार होता, हे नामदेवांना उपदेश करण्याच्या प्रचलित कथेवरून दिसून येतं. या कथेतील त्यांचं वर्तन उद्धटपणाचं वाटावं, अशी तिची रचना केलेली आहे. या कथेतील प्रतीकात्मकता समजून घेतली तर आपणास हेच कळतं की, विसोबांना पारंपरिक शिव पूजा अभिप्रेत नव्हती. शिव आपल्यामध्येच आहे म्हणून ज्याप्रमाणं बसवेश्वरांनी इष्टलिंग संकल्पना मांडली, तशी शिवपूजा विसोबांना अभिप्रेत असावी. त्यांच्या या वर्तनाचा विचार केल्यास त्यांनी प्रचलित शिव संकल्पनेविरुद्ध आवाज उठविला असावा आणि त्यामुळंच त्यांच्याविषयी नकारात्मक माहिती पसरविली गेली असावी. त्यांचे नामदेव गाथेतील अभंग त्यांच्या या विचाराची साक्ष देतात.

विसोबांचे नामदेवांना उद्देशून रचलेले दोन अभंग नामदेव गाथ्यामध्ये समाविष्ट केलेले आढळतात. त्यातील पहिला अभंग पारंपरिक विचार मांडणारा आहे. दुसर्‍या अभंगात मात्र विसोबांच्या विचारसरणीचं दर्शन आपणास होतं,

छंदे छंदे तीर्थ जासी| परी अविद्यासी न सांडिसी॥
वाया आत्मरूप कष्ट| तेणे न पावसी रे नित्यसुख॥
ध्यान धारणा मुद्रा जप| यम नियम करिसी तप॥
तेणे तुझी न चुके खेप| आराधी स्वरूप एक॥

वरील अभंगामध्ये प्रारंभीच विसोबांनी तीर्थयात्रेविषयीचं आपलं मत स्पष्ट केलेलं आहे. ‘तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ या तुकोबांच्या वचनामध्ये त्याचे पडसाद उमटलेले दिसून येतात. तुकोबांनी आपणास नामदेवांनी प्रेरणा दिल्याचं आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलं आहे. त्यांना हा वारसा नामदेवांपासून प्राप्त झाला हे उघड आहे. ध्यान-धारणेविषयी तसंच योगाभ्यासातील इतर पायर्‍यांविषयी विसोबा जी मतं मांडतात ती हठयोगी सिद्धांच्या अतिरेकी वर्तनाच्या विरोधी प्रतिक्रिया आहे. विसोबांनी नामदेवांना नैतिकतेचा उपदेश केला, त्याचा प्रभाव नामदेवांवर वारकरी संप्रदायात गेल्यानंतरही कायम राहिला. वारकरी संप्रदायाला केवळ एक भक्तिमार्ग म्हणूनच नाही, तर नीतीमार्ग ठरविण्यात नामदेवांचं योगदान फार मोठं आहे. गुरुसंस्थेचं महत्त्व या अभंगात सांगितलं असलं तरी नामदेवांनी त्याचं प्रस्थ वारकरी संप्रदायात वाढू दिलं नाही. शेवटी नामदेवाला मनात कोप धरू नये, असा उपदेश विसोबांनी केला आहे, त्यावरून नामदेवाच्या स्वभावाचा परिचय आपणास होतो. उमेदीच्या काळात विसोबांसारखा गुरू लाभल्यामुळं नामदेवांच्या आयुष्याचं सोनं झालं. त्याच बरोबर विसोबांच्या विचारसरणीचं अनुसरण करून त्यांनी आपली अभंग रचना केली, हे त्यांच्या अभंगांवरून दिसून येतं. शिव या दैवता विषयीची श्रद्धा नामदेवांनी व्यक्त करताना शिव या शब्दावर श्लेष साधला आहे.

सिंपियाचे कुळी जन्म मज जाला|
परी हेतू गुंतला सदाशिवी ॥

शिवाला विठोबामध्ये पाहून त्यांच्यात एकरूपता साधण्याचं मोलाचं कार्य नामदेवांनी केलं. त्यातून शैव आणि वैष्णव या परस्परविरोधी संप्रदायांमधील ऐक्य त्यांनी निर्माण केलं. महाराष्ट्र हे भारताच्या उत्तर आणि दक्षिण या दोन प्रमुख भागांना जोडणारं राज्य आहे. या ठिकाणी परस्पर बंधुभावाचा संस्कार रुजवणार्‍या नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांनी जसा कर्मकांडी वैदिक धर्माविरुद्ध विद्रोह केला, तसा नामदेवांनीही केला. त्यामधील विसोबांचं श्रेय वादातीत आहे.

0 Shares
संवादाचा दुवा पांचाळ, चाटी की अन्य कोण?