इठुराया बघे मांड्यांची गं वाट

मुकुंद कुळे

माऊलींच्या पाठीवर भाजलेल्या मांड्यांमुळे विसोबांना उपरती झाली. तेव्हापासून हे मांडे महाराष्ट्राच्या खाण्यापलीकडे एकंदर लोकसंस्कृतीचा भाग बनले. पण आज मांडे खायचे तर महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला खानदेशात किंवा दक्षिण टोकाला बेळगावी जावं लागतं.

विठ्ठलनामाची अखंड धुनी तनामनात पेटलेली असते. ऊन-वारा-पाऊस कशाचीच क्षिती नसते. पंढरीच्या दिशेनं पावलं आपसूक पडत असतात. कुणीतरी धरून चालवल्यासारखी. वारीत चालताना वारकरी भौतिक जगतात नसतोच जणू, तो आधिभौतिकात रमलेला असतो. मोहमायेच्या पल्याड गेलेला असतो. अशात चालता चालता वारीच्या मुक्कामाचं गाव येतं. दुरून गाव दिसताच कर्णे, तुतार्‍या वाजतात. पालखीचा, दिंड्यांचा वेग मंदावतो. हळूहळू जागा मिळेल तिथं पालं पडतात. दिवसभर चाललेली, श्रमलेली पावलं विसावतात. या विसाव्यातही मुखानं विठ्ठलनामाचा गजर सुरूच असतो. या दमल्या, भागल्या जीवासमोर कधीतरी कुणीतरी जेवणाचं ताट आणून ठेवतं. खरंतर खाण्यापिण्याचं तसंही फारसं भान नसतंच वारकर्‍यांना. भाकरी, ठेचा जे काही पुढ्यात मिळेल ते गुमान खावं नि पुन्हा विठ्ठलभक्तीत दंग व्हावं, हाच त्यांचा रोजचा शिरस्ता… पण कधीतरी अचानक समोर जेवणाच्या ताटात गोडाचा पदार्थ म्हणून मांडा ठेवलेला दिसतो, अन् वारकर्‍यांचा जीव कंठात येतो. त्यांच्याही नकळत डोळे झरू लागतात. मनाची अगदी कासाविशी होते. साडेसातशे वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर जशाच्या तसा उभा राहतो…

आईबापाविना वाढलेली लेकरं आळंदीला येऊन पोचलेली असतात. गावात कुणाचा आधार नाही. साथ नाही. उलट संन्याशाची मुलं म्हणून वाट्याला हेटाळणीच आलेली. विसोबा हेटाळणी करणार्‍यांचे अग्रणी. मुलं बिचारी कसंबसं झोपडं उभारतात. राहू लागतात. एक दिवस बापड्या मुक्ताईला मांडे खावेसे वाटतात. पण मांडे करायचे तर, मातीचं खापर हवं. छोटी मुक्ताई गेली कुंभाराकडे खापर आणायला. परंतु साधं खापर मिळणंही मुश्कील करून ठेवलेलं विसोबांनी. काय करणार? बिचारी पोर रडतच घरी आली. तिला रडताना पाहून ज्ञानदेवांनी विचारलं, ‘काय झालं ग मुक्ते?’ मुक्तेनं झाला प्रकार सांगितला अन् ज्ञानदेव मंदसे हसले. म्हणाले, तुला मांडेच खायचे आहेत ना, तू तयारी कर आणि झाली की मला सांग. मुक्तेला काही कळेना. पण तिने मांड्यांची तयारी केली अन् म्हणाली, दादा झाली बरं का मांड्यांची तयारी. तसे ज्ञानदेव आपल्या झोपडीत आले आणि तिच्यासमोर ओणवे झाले. म्हणाले, मी माझ्या पाठीचं खापर करतो. तू तुझे मांडे भाजून घे. आधी मुक्ताईला काही कळेना. पण बघता बघता ज्ञानदेवांनी योगसामर्थ्यानं आपल्या पाठीवर असा काही अंगार फुलवला की, मुक्ताईनं त्यावर खरपूस मांडे भाजून घेतले. आपण खाल्ले नि आपल्या भावंडांनाही वाढले…

तेव्हापासून ताटात मांडा दिसला की, प्रत्येक वारकर्‍याचा जीव आधी कासावीस होतो आणि मग आनंदाश्रूंबरोबर ते मांड्याचा एकेक घास तोंडात टाकतात. त्यांच्यासाठी तो मांडा म्हणजे जणू ज्ञानदेवांच्या पाठीवर भाजला गेलेला मांडाच असतो.

ज्ञानदेवांनी पाठीवर मांडे भाजल्याची ही कथा म्हणजे खरंतर त्यांच्यासंबंधीच्या अनेक मिथकांपैकी एक मिथककथा आहे. ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले, भिंत चालवली, यांसारखीच हीदेखील एक मिथककथा. या मिथककथांमधली सत्यता तपासून पाहण्याच्या भरीस कुणी पडू नये. कारण या मिथकांची किंवा मिथककथांची निर्मिती भक्तांच्या भावकोषातून झालेली असते. अशा घटनांमध्ये सत्याचा आधार अतिशय छोटा असतो. परंतु भक्तांच्या, जनतेच्या मनात आपल्या आराध्याविषयीची श्रद्धा एवढी जबरदस्त होते की, ते छोटंसं सत्य अवकाशाएवढं होतं आणि पुढे तेच खरं म्हणून गृहीत धरलं जातं. ज्ञानदेवांच्या मांड्यांच्या कथेतही असंच काहीसं झालेलं असावं. ते काहीही असो, साडेसातशे वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मांड्यांना मात्र अढळपद प्राप्त झालं!

तरीही मांडे करणं ही मात्र कुठल्याही गृहिणीसाठी साधीसोपी गोष्ट नाही. मांडे खाताना जेवढे चविष्ट लागतात, तेवढेच करायला मात्र कर्मकठीण असतात. ‘मनातल्या मनात मांडे खाणे’ ही म्हण त्यामुळंच तर तयार झाली. पण गंमत याची वाटते की, मुक्ताबाईनं आळंदीत ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले. परंतु आज आळंदी-देहू किंवा मावळप्रांतासकट मराठवाडा-विदर्भ कुठंच मांडे पाहायला किंवा खायला मिळत नाहीत. मांड्यांची गोडी चाखायची असेल, तर थेट खानदेशातच जावं लागतं. जळगाव-धुळे-नंदुरबार परिसरातल्या महिला घरात पाव्हाणारावळा यायचा असेल, तर अजूनही मांड्यांचाच जंगी बेत आखतात. केवळ पाहुण्यांसाठीच नाही, तर ज्ञानदेवांची मांड्यांची मिथककथा लक्षात घेऊन गेल्या वर्षी पाडव्याच्या सणाला खानदेशातून तब्बल २५ हजार मांडे आळंदीला पाठवण्यात आले होते. जेवणात मांड्याचा महाप्रसाद खाताना तेव्हाही भाविकांचा ऊर दाटून आला होता. मांडे आणि ज्ञानदेव हे समीकरण एवढं घट्ट आहे.

मिथककथेतून ओळख निर्माण होणारा मांड्यासारखा पदार्थ दुसरा नाही. परंतु त्याचा प्रचार-प्रसार महाराष्ट्रात सर्वदूर का झाला नाही, हे कळायला मार्ग नाही. कदाचित तो करण्यासाठी करावा लागणारा खटाटोप, हाच त्याच्या मार्गातला मोठा अडसर ठरला असावा. कारण मांडा करायचा तर केवढा तरी मोठा घाट घालावा लागतो. वरवर दिसायला मांडे म्हणजे कुणाला आकारानं मोठी आणि पातळ असलेली पुरणपोळी वाटेल. पण मांडा तब्बल २० ते २५ इंच व्यासाचा असतो आणि तो पुरणपोळीसारखा पोळपाटावर लाटला जात नाही, तो हात आणि मनगटावरच तोल आणि तालही सांभाळून करावा लागतो. हा तोल साधला नाही, तर सगळी मेहनत वाया गेलीच म्हणून समजा.

मांडा करण्याची पूर्वतयारीही जिकिरीची असते. मांड्यासाठी उत्तम प्रतीचा गहू आणून तो आधी स्वच्छ धुऊन वाळवावा लागतो. हा गहू वाळवताना तो नीट वाळलाय ना याची खात्री करून घ्यावी लागते. कारण तो थोडा जरी ओला असेल, तर त्याला कुजकट वास येण्याची शक्यता असते. धुतलेला गहू कडकडीत उन्हात सुकाठाक झाल्यावर मग तो अगदी बारीक दळून आणावा लागतो. पिठापेक्षाही बारीक, ज्याला पिठी म्हणता येईल असा. त्यात एकही जाडाभरडा दाणा असून चालत नाही. अशी बारीक पिठी घेऊन ती थोडं तेल आणि चवीसाठी मीठ घालून पाण्यानं मळायला सुरुवात करावी. मांड्याचं पीठ मळणं म्हणजे गृहिणीची ताकद पणाला लावण्याचंच काम असतं. कारण पीठ सैलसर आणि चिवट होण्यासाठी ते खूप तिंबावं लागतं. लोकरहाटीतल्या सासुरवाशिणी उगाच नाही म्हणत-

सासुच्यापरास, मांड्यांनी केला जाच
मायबाईच्या घरात, नाही झाला कधी काच

सासुरवाशिणींची ही खंत हे एकप्रकारे खरीच आहे. मांडे करण्यासाठी जीवाचा खरंच आटापिटा करावा लागतो. पीठ बराच वेळ उलटसुलट तिंबल्यावर ते लवचिक झालंय की नाही ते पाहावं लागतं. त्यासाठी तिंबलेल्या पिठाचा एखादा गोळा घेऊन तो हातानं ताणून बघितला जातो. तो रबरासारखा ताणला गेला तरच समजावं की, पीठ नेमकं तिंबलं गेलंय.

मांड्यासाठीचं हे पीठ तिंबण्याआधीच पुरण करून ठेवावं लागतं. त्यासाठी चांगल्या प्रतीची चणाडाळ आधी शिजवून घ्यावी लागते. त्यातलं पाणी पूर्णपणे निथळल्यावर त्यात गूळ टाकून ती पुन्हा शिजवावी लागते. गुळाला सुटलेलं पाणी आटत आलं आणि डाव पातेल्यातील मिश्रणात ठामपणे उभी राहिली की गॅस घालवावा किंवा चुलीतला विस्तव विझवावा. गूळ, चनाडाळीचं हे मिश्रण पाट्यावर पिठीसारखंच बारीक वाटावं लागतं. ते वाटून झालं म्हणजे मांड्याचं पुरण तयार.

यानंतर प्रत्यक्ष मांडा करायला सुरुवात होते. त्यासाठी आधी छोट्या आकाराच्या दोन पोळ्या (मोठ्या आकाराची पुरी) लाटून घ्यायच्या. त्या दोन पोळ्यांच्या मधे मोठ्या लिंबाएवढा पुरणाचा गोळा पसरायचा. नंतर पोळ्यांच्या कडा बंद करून त्या पुन्हा थोड्या मोठ्या लाटायच्या. मग उचलून हातावर तोलण्याएवढ्या झाल्या की वरचेवर उचलायच्या आणि हातांच्या बंद मुठींवर गोलगोल फिरवायला सुरुवात करायची. मांड्याचा आकारा मोठा होत जाईल, तसा तो दोन हात आणि दोन कोपरांवर तोलावा लागतो. २०-२५ इंच इतका मोठा झाला की तो अंगणात तीन दगडांच्या चुलीवर ठेवलेल्या खापरावर (उलट्या कढईच्या आकाराचं मातीचं भांडं) अलगद टाकायचा. खापरावर मांडा टाकणं आणि उलटसुलट करून खरपूस शेकवणं हीसुद्धा एक कलाच असते.

असा तयार झालेला मांडा पोळी, चपातीसारखा चतकोर आकारात दुमडत नाहीत. त्याची आयताकृती घडी घालतात. गरमागरम मांड्याची अशी घडी ताटात पडली की, त्याच्या वासानंच पाव्हण्याची रसना चाळवते. हे मांडे कटाच्या आमटीबरोबर (पुरणाच्या डाळीच्या पाण्याला दिलेली मस्त मसालेदार फोडणी) किंवा दुधात कालवून खाल्ले जातात. परंतु मांडे खाण्याची खरी मजा आंब्यांच्या दिवसातच. आंब्यांच्या दिवसात खानदेशातील प्रत्येक घरात एकदा तरी मांडे-आमरसाचा बेत आखला जातोच. रुमाली रोटीसारखे मऊसूत पुरणाचे मांडे आंब्याच्या रसात बुडवून खायचे, म्हणजे सुखाची परमावधीच!

मांड्यातलं पुरण कोरडं आणि तुलनेनं कमी असल्यामुळं जीवाचा त्रागा करून बनवलेले हे मांडे बरेच दिवस टिकतात. प्रवासातही उत्तम सोबत करतात. महाराष्ट्रात आता प्रामुख्यानं फक्त खानदेशातच मांड्यांची परंपरा टिकून आहे. सणवार असो किंवा कुलधर्म-कुळाचार त्या दिवशी खानदेशात मांडे करण्याची परंपरा आहे.

मांड्यांची अशीच परंपरा बेळगावानं टिकवलीय. फरक फक्त एवढाच असतो की, खानदेशातले मांडे पुरणपोळ्यांसारखे असतात आणि बेळगावी मांडे तेलपोळीसारखे असतात. कारण खानदेशात मांड्यात पुरणाचं सारण भरतात, तर बेळगावात साजूक तूप आणि दळलेल्या साखरेचं एकजीव केलेलं मिश्रण सारण म्हणून वापरतात. तसंच मांडे करण्याची पद्धत सारखी असली, तरी मांड्याचं पीठ करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. बेळगावात गव्हाचं बारीक पीठ आणि गव्हाचा रवा समप्रमाणात घट्ट मळला जातो. मळून झाल्यावर हा गोळा दोन तास बाजूला ठेवला जातो. दोन तासांनी ते पीठ पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून मळलं जातं. यावेळी ते मळून मऊ केलं जातं. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून ते ओल्या फडक्याखाली दोन तास झाकून ठेवले जातात. त्यानंतर पिठाचे दोन गोळे घेऊन ते पुरीएवढे लाटायचे. दोन पुर्‍यांमध्ये तूप-साखर-खसखस-वेलदोडे यांचं फेटून एकजीव केलेलं मिश्रण भरून दोन पुर्‍यांची केलेली एक पुरी थोडी मोठी लाटायची आणि मग खानदेशी मांड्यांप्रमाणेच हातावर उचलून मनगटावर गोलगोल फिरवत न्यायची नि खापरावर टाकायची. दोन्ही बाजूंना सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची. मात्र हे बेळगावी मांडे शेकवण्यासाठी उलट्या कढईसारखं लोखंडी पात्रच वापरलं जातं. या बेळगावी मांड्यांची घडीही आयताकृतीच घातली जाते.

खानदेशात मांडे अजून आवडीनं केले जातात. बेळगावात मात्र आता अभावानंच मांडे बनतात. पूर्वी बेळगावातील वैष्णव समाजात हा पदार्थ हमखास बनायचा. आता क्वचितच त्याचं दर्शन घडतं. मात्र बेळगावातील सरलाय कुटुंबानं मांड्यांची ही परंपरा आस्थेनं जपून ठेवलीय. विशेष म्हणजे विजयकुमार कृष्णमूर्ती सरलाय यांच्या घरातली ही परंपरा पुरुषवर्गानं जपलीय. आज बेळगावची खासियत म्हणून विकले जाणारे मांडे मुख्यतः सरलाय कुटुंबानंच बनवलेले असतात.

अर्थात मांडे खानदेशातले असोत वा बेळगावातले, ते करताना करणार्‍याचं कसब पणाला लागतं. ते खाताना गोड लागतात, कारण करणार्‍याच्या हाताची गोडीच मांड्यांमध्ये उतरलेली असते. वारकर्‍यांसाठी तर फक्त गोडीच नाही, सोबत भक्तिभावही असतो. फक्त वारकरीच कशाला? त्या विठुरायालाही या मांड्यांचा सोस सुटलेला नाही. त्याचं मायेचं लेकरू असलेल्या ज्ञानदेवानं पाठीवर मांडे भाजले म्हटल्यावर ती मायेची माऊली थोडीच गप्प बसणार आहे. म्हणून तर तो रुक्मिणीच्या जेवणातही खोट काढतो नि म्हणतो-

रुक्मिणीने वाढीलं पंचपक्वान्नांचं ताट
अन् इठुराया बघे मांड्यांची ग वाट

शेवटी तो भावाचा भुकेला होता. भक्तांच्या मनातला भाव तो नेमका ओळखायचा आणि त्यांची नड काढायचा. तो माणसं जोडायचा. म्हणून तर ज्ञानदेवांच्या पाठीवर भाजले जाणारे मांडे पाहून आळंदीच्या विसोबांना उपरती झाली आणि ते ज्ञानदेवांना शरण गेले. दोहोंतला भेदाभेद नाहीसा झाला. वारकरी संप्रदाय गेली साडेसातशे वर्ष हा भेदाभेद नाहीसा करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यासाठी त्यानं काही मिथककथांचा आधार घेतला, तर अटकाव कशाला?

0 Shares
ऐसे खेचरीचे रान विसोबाविन औंढा रिते