ऐसे खेचरीचे रान

देवदत्त परुळेकर

खेचर शब्दाचे अर्थ अनेक आहेत. खेचर म्हणजे पक्षी. खेचर म्हणजे योगी. खेचर म्हणजे भूतपिशाच्चदेखील. विसोबा यातले नेमके कोणते खेचर होते, याचा शोध भक्त आणि अभ्यासक दोघांसाठीही लोभसवाणा आहे.

संत विसोबा खेचर यांचं मूळ नाव विसोबा चाटी होतं, असं संतचरित्रकार महिपतीबाबा आपल्या ‘श्रीभक्तविजय’ या ग्रंथात सांगतात. विसोबांच्या समकालीन मराठी साहित्यात त्यांच्या या नावाविषयी काहीही माहिती नाही. संत साहित्यातही याविषयी काही खुलासा वाचायला मिळत नाही. विसोबांचे शिष्य नामदेवरायांनी आपल्या आत्मचरित्रपर अभंगांत गुरुउपदेशाच्या प्रसंगाचं सविस्तर वर्णन केलंय. नामदेवरायांनी ज्ञानदेवादी आपल्या समकालीन संतांची चरित्रं अभंगांतून वर्णन केलीत. पण त्यातही विसोबांच्या पूर्वचरित्राबद्दल काहीच वाचायला मिळत नाही. चाटी आडनावाचे लोक आहेत. पण खेचर आडनाव असलेल्या व्यक्ती कुठे आढळत नाहीत, ना इतिहासात त्यांचा कुठे उल्लेख आहे. विसोबांचा उल्लेख इतर संतांनी कायम ‘विसोबा खेचर’ किंवा नुसता ‘खेचर’ असा केलेला आहे. खुद्द विसोबांनी आपल्या अभंगांच्या शेवटी ‘खेचर विसोबा’ किंवा ‘खेचर विसा’ अशीच नाममुद्रा वापरली आहे. महिपतीबाबांचा कालखंड सन १७१५ ते १७९० हा अगदी अलीकडचा आहे. विसोबा त्यांच्याआधी साडेचारशे वर्ष होऊन गेलेत. तरीही त्यांच्या चरित्राबाबत इतर माहिती उपलब्ध नसल्यानं महिपतीबाबांनी सांगितलेल्या चरित्र प्रसंगांपासूनच विसोबांच्या नावाची शोधयात्रा सुरू करावी लागते.

‘श्रीभक्तविजय’ या आपल्या ग्रंथात महिपतीबाबा ज्ञानदेव चरित्रातील पाठीवर मांडे भाजण्याचा लोकप्रिय प्रसंग सांगतात. हा चमत्कार पाहिल्यावर विसोबांना उपरती झाली आणि त्यांनी ज्ञानदेवांचं उष्टं खाण्यासाठी झडप घातली. त्यावर ज्ञानेश्वरांनी त्यांना म्हटलं, ‘तूं कां होसी गा खेचर्| सर परता वेगेंसी||’ असं वर्णन करून महिपतीबाबा पुढे म्हणतात,

सर परता खेचरा ऐसे| ज्ञानदेवें म्हणितसें तयास्|
विसोबा खेचर नाम त्यास्| तैपासूनि म्हणताती||

अशाप्रकारे विसोबांना खेचर हे उपमान मिळालं किंवा त्यांनी ते स्वीकारलं. कदाचित त्यांचं मूळ नावच ते असावं. काहीही असो, पण खेचर या शब्दात अनेक अर्थ दडलेले आहेत. कोश शोधायचे झाले, तर त्याचे अर्थ सापडतात ते असे,

१. गाढवी आणि घोडा यांची मिश्र संतती

२. आकाशात फिरणारे पक्षी, ग्रह, नक्षत्रे

३. योगी, यक्ष, यती

४. समंध, पिशाच्च, भूत

यापैकी विसोबा श्रेष्ठ योगी, यती होते यात शंका नाही. खेचर या शब्दातून विसोबांचं योगीपण उलगडतं. विसोबांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे झडप घातली, फक्त म्हणूनच माऊलींनी त्यांना खेचर म्हटलं नसेल. तेच उपनाम प्रेमानं स्वीकारून विसोबांनी ती आपली नाममुद्रा बनवली. याचं कारण खेचर या शब्दामागचा अधिक खोल अर्थ माऊली आणि विसोबा दोघांनाही अभिप्रेत असावा. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या ६व्या अध्यायात कुंडलिनी जागृतीचं विस्तृत आणि विलक्षण वर्णन केलंय. हे वर्णन करताना एके ठिकाणी माऊली ‘खेचर’ म्हणजे कोणता योगी, हे समजावून सांगतात,

ऐकें शक्तीचें तेज जेव्हां लोपे| तेथ देहाचें रूप हारपे|
मग तो डोळ्यांमाजीं लपे| जगाचिया॥
एर्होवीं आधिलाचि ऐसें| सावयव तरी दिसे|
परी वायूचें कां जैसें| वळिलें होय॥
नातरी कर्दळीचा गाभा| बुंथी सांडोनी उभा|
कां अवयवचि नभा| उदयला तो॥
तैसें होय शरीर्| तें तें म्हणिजे खेचर्|
हें पद होतां चमत्कार्| पिंडजनीं॥

या ओव्यांचा भावार्थ असा- कुंडलिनीचं तेज जेव्हा लय पावतं, तेव्हा योग्याचं शरीर वायुरूपही होऊ शकतं. मग त्या योग्याला जगाच्या डोळ्यात लपता येतं. चमत्कार असा होतो, की शरीर तर पहिलंच असतं. अवयवपण जिथल्या तिथंच असतात. फक्त आता ते शरीर आणि अवयव वायूचे असावेत इतके नितळ होतात. केळीच्या पोकळीवरचे सोपट काढून टाकावे आणि ती पोकळीच उभी करावी, तसं त्याचं रूप दिसतं. त्याचे अवयव जसे काही आकाशाचे बनले आहेत, असे वाटतात. देहधारी असून ते शरीर आकाशगमन करण्याइतकं हलकं होतं. हा चमत्कार खरा, पण तो घडतो. शरीर जेव्हा असं होतं, तेव्हा त्याला ‘खेचर’ म्हणतात.

नामदेवरायांनी ज्ञानदेवांचं वर्णन ‘योग्यांची माऊली’ असं केलंय. ते स्वतः नाथसंप्रदायी श्रेष्ठ योगी होते. त्यांनी कुंडलिनी योगातील या अत्यंत श्रेष्ठ स्थितीचं वर्णन करताना ‘चमत्कार’ हा शब्दा वापरला आहे. याचं आकलन आपल्यासारख्या सामान्यांना कसं होणार? पण ही कुंडलिनी योगातील अत्यंत श्रेष्ठ अवस्था असायला हवी, एवढं मात्र या ओव्या वाचून समजतं. विसोबा खेचर हे या ओव्यांत वर्णन केलेली श्रेष्ठ अवस्था प्राप्त करून घेतलेले महान योगी असावेत. नाहीतर माऊली त्यांना उगाचच खेचर म्हणणार नाहीत.

संतसाहित्यात खेचर हा शब्द भूत किंवा पिशाच्च या अर्थानंही अनेक वेळा वापरला गेला आहे. तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे,

पंढरीचे भूत मोठे| आल्या गेल्या झडपी वाटे||
बहु खेचरीचे रान| जातां वेडे होय मन||
तेथे जाऊ नका कोणी| गेले नाही आले परतोनि||
तुका पंढरीसी गेला| पुन्हां जन्मा नाही आला||

अभंगाचा भावार्थ असा- पंढरीस नांदत असणारे भूत, सर्व भूतांपेक्षा फार मोठे आहे. त्याच्या वाटेनं कोणी आलं गेलं, तर त्याला तेव्हाच झपाटून घेतं. असं हे रान फारच कडक खेचरीचं म्हणजे भूतांचं आहे. तेथे गेले असतां भजन-कीर्तनात मन वेडं होतं. पूर्वी त्या ठिकाणी जे कोणी गेले, ते परत आलेच नाहीत. म्हणून तेथे कोणी जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, मी जो पंढरीस गेलो, तो परत जन्माच्या गावास आलोच नाही.

ज्ञानेश्वर माऊलींनी खेचर या शब्दाचा भूतपिशाच्च हा अर्थ घेऊन त्याचा सुंदर उपयोग ज्ञानेश्वरीच्या ५व्या अध्यायात आत्मज्ञानी व्यक्तीची लक्षणं सांगताना केलाय.

बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान| ब्रह्मरूप भावी आपणा आपण्|
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण्| तत्परायण अहर्निशीं॥

या ओवीपासून पुढच्या अकरा ओव्यांत माऊलींनी दाखले देऊन आत्मज्ञानी माणसाचं वर्णन करतात. त्यानंतर अकराव्या ओवीत ते सांगतात,

जैसा जनामाजि खेचरु| असतुचि जना नोहे गोचरु|
तैसा शरीरीं परी संसारु| नोळखे तयांतें॥

या सलग बारा ओव्यांचा भावार्थ असा, आपण ब्रह्मरूप आहोत हा अनुभव आला की सगळं ब्रह्मांडच ब्रह्मरूप आहे हा बोध सहजच प्रकट होतो. ध्यानावस्थेत पाहिलेलं आत्मरूप अहोरात्र दिसावं असा या योग्यास ध्यास लागतो. ‘मी ब्रह्म आहे’ या वृत्तीशी तो पूर्णपणे एकनिष्ठ राहातो. असं व्यापक ज्ञान त्याच्या हृदयात ठसलं की त्याची समतादृष्टी होते, तिचं किती म्हणून वर्णन करावं? आपल्या ठिकाणी विश्व आणि विश्वाच्या ठिकाणी आपण, अशी साम्यबुद्धी होते. भाग्याला दैन्य ठाऊक नाही, विवेकाला भ्रांतीची ओळख नाही, सूर्याला स्वप्नातही अंधाराचं दर्शन नाही, अमृताला मृत्युवार्ता ठाऊक नाही किंवा चंद्राजवळ दाह नाही, तसा या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीस भूतमात्रामध्ये भेदभाव नसतो. पार्था, मग हे चिलट, तो हत्ती. हा चांडाळ, तो ब्राह्मण. हा परका, तो पुत्र, असं तो पुरुष कधी म्हणेल काय? तो ब्रह्मभावाच्या ठिकाणी जागा असल्यामुळे ही गाय, तो कुत्रा, एक श्रेष्ठ, एक हीन या कल्पनेचं स्वप्नच त्याला पडत नाही. हा भेद दिसायला जागेवर अहंकार असायला हवा. तो तर त्यांना कधीच सोडून गेलेला असतो. मग भेद दिसावा कसा? सर्व ठिकाणी सारखं अखंड असणारं ब्रह्मच आपण आहोत, हे समदृष्टीचं वर्म त्याला कळून चुकलेलं असतं. इंद्रियं विषय भोगतात, भोगू देत. त्यांना शिक्षा करायची नाही. पण आतून भोगेच्छा मात्र समूळ उपटून टाकायची, अशी युक्ती करून ते ज्ञानी नि:संगता जोडतात. लोकांत राहायचं म्हणून लोकांसारखा व्यवहार करतात. पण सामान्य पुरुषाजवळ असणारं अज्ञान त्यांच्याजवळ असत नाही. खेचरू म्हणजे पिशाच्च फिरत असतं पण दिसत नाही. तसा तो संसारात वावरतो पण संसाराच्या तावडीत सापडत नाही. संसारी लोकांना त्याचं सत्यस्वरूप कळत नाही.

नाथसंप्रदायी, विशेषत: अवधूत योगी अनधिकारी लोकांची संगत टाळण्यासाठी पिशाच्चासारखं अनाकलनीय आचरण करतात. वेड्यासारखं, पिशासारखं वागतात. आधुनिक काळातही शेगावचे गजानन महाराज, दाणोलीचे साटम महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज यांची उदाहरणं यासंदर्भात देता येतील. विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांना सामान्य लोक ‘काली मंदिरातील पिसा’ म्हणूनच ओळखत. वरती वेड पांघरलेलं असलं तरी हे योगी अंतरी महाज्ञानी असतात. असंच खेचराचं अनाकलनीय वर्तन विसोबाही करत नसत काय? नामदेवांनी देवावर पाय ठेवून झोपलेले खेचर पाहिले. तेव्हा त्यांना ते वेडेच वाटले होते. अनाकलनीय वर्तन असणारा तो खेचर, या अर्थानुसार विसोबा खेचर नव्हते का?

खेचर शब्दाचा विचार करताना खेचरी मुद्रेशिवाय पुढे जाता येत नाही. खेचरी मुद्रा ही योगमार्गातील एक सर्वश्रेष्ठ मुद्रा मानली गेली आहे. ज्ञानदेवांनी त्यांच्या ‘अंतरी असणार्‍या योगीराज श्रीगुरु दत्तात्रेयां’चं वर्णन एका अभंगात केलंय. त्याची सुरुवातच अशी आहे-

पैल मेरूचें शिखरी| एक योगी निराकारी|
मुद्रा लावोनि खेचरी| प्राणायामी बैसला||

यावरून खेचरी मुद्रा किती श्रेष्ठ आहे, हे लक्षात येईल. अनेक योगविषयक ग्रंथांमध्ये तिचं वर्णन येतं.

खेचरी हा शब्द ‘ख’ आणि ‘चरी’ अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. ‘ख’ शब्दानं आकाश अर्थात मनाची निर्विचार अवस्था निर्देशित केलीय. ‘चरी’ म्हणजे फिरणारी किंवा प्रवेश करणारी. थोडक्यात खेचरी म्हणजे आकाशात फिरणं. हे आकाशात फिरणं दोन स्तरांवर घडत असतं, शारीरिक आणि मानसिक. त्यापैकी शारीरिक स्तरावर जी क्रिया साधक करतो, त्याला खेचरी मुद्रा असं म्हणतात. या क्रियेच्या परिणामस्वरूप मनाची जी निर्विचार अवस्था होते, त्याला खेचरी अवस्था असं म्हणतात.

खेचरी मुद्रेमध्ये साधक आपली जीभ उलटी फिरवून टाळूला भिडवून मागे नेतो. पडजीभ ओलांडून त्याची जीभ मेंदूकडे जाणा-या ‘कपाल कूहरात’ प्रवेश करते. तेथे प्रवेश केल्यावर साधक अनेक चवींचे स्राव अनुभवतो. त्याचबरोबर त्याचं मन शांत होऊ लागतं. शरीर शुद्धी झालेली असेल तर साधक बिंदुविसर्ग नामक चक्रातून स्रवणारं ‘अमृत’ प्राशन करू शकतो. मन शांत होत होत शेवटी त्याला समाधी लागते. ही मुद्रा ज्याला साधते तो योगी समाधी साधलेला आत्मज्ञानी बनतो, हे आंतरलक्षण. तर त्याच्या जीभेवर अमृताचा स्राव सुरू होतो. त्यामुळं त्याला तहान भूक लागत नाही, हे बाह्य लक्षण.

ही मुद्रा केवळ हठयोगानं साधते असं नाही, तर ती भक्तियोगानंही साधता येते. संत गोरा कुंभार यांच्या एका अभंगात याचा उल्लेख आहे,

बोलता आपली, जिव्हा पै खादली|
खेचरी लागली, पाहता पाहता||

तुकाराम महाराज या अमृत अनुभवाचं वर्णन करतात,

नाम घेता मन निवे| जिव्हे अमृतची स्त्रवे|
होताती बरवे| ऐसे शकुन लाभाचे||

ज्याने खेचरी मुद्रा साधली आहे, तो योगी म्हणजे ‘खेचर’, अशी व्याख्या केली तर विसोबांना ती साधली असावीच. त्यांनी ही स्थिती कोणत्या साधनामार्गानं मिळवली असेल, असादेखील प्रश्न उभा राहतो. विसोबा मूळ योगमार्गी असले तरी त्यांनी आणि त्यांचे परमशिष्य नामदेवरायांनी उपदेश केला तो भक्तिमार्गाचाच. विसोबा भक्तीमार्गात अगदी तल्लीनही झाले होते. निवृत्तीनाथ एका अभंगात विसोबांचं वर्णन करताना सांगतात, ‘दिंडी टाळघोळ गाती विठ्ठलनाम| खेचरासी प्रेम विठ्ठलाचे||’

विसोबांच्या खेचरत्वाचा शोध असा लोभसवाणा आहे. विसोबा ‘खेचर’ होते ते कोणत्या अर्थानं हे ज्याचं त्यानं ठरवावं. त्यांच्या या वाटचालीत त्यांना लाभलेलं सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान हा शब्दांचा अनुभव होऊच शकत नाही. त्यापासून शेकडो मैल दूर असलेले आपण तर त्याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला जे विठ्ठलाचं प्रेम लाभलं त्यातील काही प्रसाद आम्हालाही लाभावा, अशी विसोबांच्या चरणी विनवणी.

0 Shares
गुरूंच्या गुरूंचं गाव इठुराया बघे मांड्यांची गं वाट