गुरूंच्या गुरूंचं गाव

अभय जगताप

संत नामदेवांचे गुरू असणार्या विसोबांचे गुरू म्हणून वारकरी परंपरेत ज्ञानेश्वरांचे भाऊ सोपानदेवांना मान दिला जातो. त्यांच्या समाधीचं गाव सासवड. याच गावाशी विसोबांच्या नाथ परंपरेतले गुरूंचे गुरू चांगा वटेश्वर यांचाही जवळून संबंध आहे.

वारकरी संप्रदाय हा एकमेकांना पाया लागून परस्परांशी प्रेमाची नाती उभी करणारा संप्रदाय आहे. इथं आराध्य दैवत पांडुरंग आई, बाप, बहीण, बंधू, सोयरा, सखाही आहे. जो जिव्हाळा देवाविषयी तोच इथं संतांविषयीही आहे. कुणी संत इथं माउली आहे, कुणी आई, कुणी बा तर कुणी काकाही. एक गोरोबाकाका आहेत आणि दुसरे सोपानकाका. गोरा कुंभार वयानं थोडे ज्येष्ठ असल्यामुळं त्यांना चुलतेपणाचा मान दिला गेला, हे समजू शकतं. ज्ञानदेवांचे धाकटे भाऊ सोपानदेव वयानं लहान असूनही त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांना काका म्हटलं गेलंय. मुंज व्हावी म्हणून पैठणला जाण्याची सूचना केली गेली, तेव्हा सोपानदेव स्वतःविषयी म्हणतात ते नामदेवांनी अभंगात सांगितलंय,

भक्ती हे सरती जाती न सरती|
ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य॥
दुर्वास वसिष्ठ अगस्ती गौतम|
हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे॥
व्यास आणि वाल्मिकी कोण कूळ तयांचे|
तैसेचि आमुचे सोपान म्हणे॥

अशी स्वयंप्रज्ञा असणार्‍या भावंडांशी विसोबांची आळंदीत गाठ पडली. आधी प्रतिकूल असणारे विसोबा या भावंडांची योग्यता पाहून शरण आले. यानंतर त्यांनी या भावंडांना विशेष करून सोपानकाकांना गुरुस्थानी मानल्याचं दिसून येतं. विसोबांनी लिहिलेला ग्रंथ ‘शडुस्थळी’नुसार त्यांनी चांगा वटेश्वर यांचे शिष्य कृष्णनाथ यांचा अनुग्रह घेतला होता. ‘शडुस्थळी’नुसार ही परंपरा गोरक्षनाथ, योगिनी मुक्ताबाई, चांगा वटेश्वर, कृष्णनाथ आणि विसोबा खेचर अशी आहे. अभ्यासकांच्या मते या योगिनी मुक्ताबाई ज्ञानदेवभगिनी संत मुक्ताबाई यांच्याहून भिन्न होत्या. चांगा वटेश्वरांच्या गर्वाचं हरण झाल्यावर त्यांनी ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई यांना गुरुस्थानी मानल्याची पारंपरिक कथा मात्र आहे. योगसिद्धीच्या बळावर चांगदेवांनी वाघ, साप, झाडं अशा सजीव सृष्टीला आपल्या अंकित केलं होतं. आपल्या या सामर्थ्याचं दर्शन घडवत ते ज्ञानदेवांच्या भेटीला येताना वाघावर बसून, सापाचा चाबूक करून निघाले. तर ज्ञानदेवांनी निर्जीव भिंतीवरून येऊन त्यांना चकित केलं. या भेटीनंतर त्यांनी मुक्ताबाईंना गुरु मानलं तर विसोबा खेचरांनी सोपानकाकांना गुरुस्थानी मानलं. सासवडच्याच बाडात सापडलेल्या एका अभंगात ते म्हणतात,

माझी मूळपिठीका सोपान सद्गुरू|
तेणे माथा करू ठेवियेला॥
त्याचे कृपेंकरुन मीपणा ठकलो|
देहभान गेलों विसरुनियां॥
चांगयाचा अंगीकार मुक्ताईने केला|
सोपान वोळला मजवरी॥
जन्ममरणाचे भय नाही आता|
खेचरी तत्त्वता मुद्रा दिली॥
जिकडे पाहे तिकडे आनंद भरला|
खेचर सामावला तयामाजी॥

संत जनाबाईंनी सुद्धा ‘नामयाचा गुरु| तो हा सोपान सद्गुरू॥’ असा उल्लेख केलेला आहे. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर. त्यामुळं या ठिकाणी गुरू याचा अर्थ गुरूंचे गुरू परात्पर गुरू असा घेता येईल. ‘जय जय आरती सोपानदेवा| ओवाळी खेचरु विसा जिवींचिया जीवा॥’ अशी विसोबा खेचरांनी सोपानदेवांची एक आरती लिहिल्याचा उल्लेख ल. रा. पांगारकरांनी केला आहे.

‘शडुस्थळी’ या ग्रंथात सोपानकाका अथवा अन्य वारकरी संतांचा उल्लेख नाही. त्यावरून हा ग्रंथ ज्ञानदेवादी भावंडांच्या भेटी पूर्वीचा असला पाहिजे, असाही एक निष्कर्ष निघतो. विसोबा खेचरांच्या भेटीनंतर पुढे ज्ञानेश्वरी लेखन, नामदेवांची भेट, नामदेव महाराजांसोबत तीर्थयात्रा या सर्व प्रवासात सोपानकाका सर्व संतमंडळींसोबत होतेच. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतल्यावर सोपानकाकांनी समाधी घेण्याचं ठरवलं. हरी भक्तीचा प्रसार होण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या ठिकाणी समाधी घेणं स्वाभाविक होतं. ज्ञानेश्वर माउलींनी आजोळी आळंदीत समाधी घेतली. तर सोपानकाकांनी समाधीसाठी सासवडची निवड केली.

‘समाधिवर्णनाचे अभंग’ या नावानं ओळखल्या जाणार्‍या या अभंगगटात नामदेवरायांनी समाधी सोहळ्याचं सविस्तर वर्णन केलं आहे. यामध्ये संतमंडळींच्या संवादाचंही वर्णन आहे. या संवादात पांडुरंगानंसुद्धा सहभाग घेतला आहे. या संवादात चांगा वटेश्वरांनी आपण सासवड क्षेत्री पूर्वी तप केल्याचं सांगितलं आहे. ‘वटेश्वरी वृत्तांत सांगितला सकळ| पूर्वी आमुचे स्थळ याच क्षेत्री॥’ सासवड गावचा संबंध विसोबांचे नाथ परंपरेतले परात्परगुरू चांगा वटेश्वर आणि वारकरी परंपरेतले गुरू सोपानदेव या दोघांशीही आहे. समाधीच्या वेळेस विसोबांनी सोपानदेवांची पूजा केल्याचा उल्लेख समाधिवर्णनाच्या अभंगात आहे.

उठिले वैष्णव घेऊनि नारायणा|
चालिले ते स्नाना अवघे जण॥
गंध आणि अक्षता विसोबाचे हाती|
पूजा ते करिती सोपानाची॥

समाधिवर्णनाच्या अभंगांत सोपानकाका आणि चांगा वटेश्वर यांचा अनेकदा जोडून उल्लेख आला आहे.

विशेष म्हणजे चांगदेवांच्या शिष्यांकडूनच निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेवांच्या संजीवन समाधीची पूजा चालू राहिली. त्यांच्या या शिष्यांनी गृहस्थ जीवनाचा स्वीकार केला. हा बदल वारकरी संप्रदायासाठी उचित असाच होता. शिष्यपरंपरेनं चालू असलेली सेवा पुढं वंशपरंपरेनं सुरू झाली. पुजारी असणार्‍या गोसावी घराण्याकडे आळंदी देवस्थानची व्यवस्थाही होती. पुढे ती अन्य मंडळींकडे गेली. पण त्र्यंबकेश्‍वर आणि सासवड येथील पूजा व्यवस्था अजूनही गोसावी घराण्याकडे आहे. या गोसावींपैकी रामानंद यांनी शिवकाळात समाधी स्थानाच्या पूजेअर्चेची व्यवस्था केल्याचे दाखले आहेत.

साधारण शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या ज्ञानेश्वर वामन गोसावी यांनी देहूकर फडावर राहून भजन, कीर्तन शिकून घेतलं. त्यांनी या दोन्ही देवस्थानांत वारकरी पद्धतीने भजन, कीर्तन आणि उत्सवांना सुरुवात केली. सोपानकाकांचा पालखी सोहळासुद्धा यांच्याच काळात सुरू झाला. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे घराणं सोपानकाका समाधी मंदिराच्या आवारात राहत होतं. त्यांच्या सध्याच्या पिढीचे मधुकर, गोपाळ आणि श्रीकांत गोसावी मंदिराच्या व्यवस्थापनात सहभागी आहेत. समाधीच्या पूजेअर्चेसाठी पगारी पुजारी नेमले आहेत. पूर्वीचे वहिवाटदार नारायणराव गोसावी यांनी सोपानदेवांचं कार्य अधिक लोकांपर्यंत पोचावं म्हणून चरित्रलेखन, अभंगगाथेचं प्रकाशन, पालखी सोहळा माहितीपुस्तिका, अभंगगायनाच्या सीडी असे उपक्रम राबवले.

विसोबा खेचरांनी लिहिलेला ‘शडुस्थळ’ हा ग्रंथ डॉ. रा. चिं. ढेरे यांनी उजेडात आणला. १९६९ साली त्यांना या ग्रंथाचं बाड सासवड येथील पुरंदरे घराण्याच्या संग्रहातून मिळालं. हे बाड पूर्वी सोपानकाका समाधी मंदिराचे पुजारी गोसावी यांच्याकडे असावं. तिथून ते पुरंदरेंकडे आलं असावं, असा कयास ढेरेंनी प्रास्ताविकात व्यक्त केला आहे. या ग्रंथामुळं विसोबा खेचरांचा नव्यानं परिचय झाला. त्याच विषयावर ढेरे यांनी पीएच.डी. केली. मराठीतल्या सांस्कृतिक अभ्यासालाही या ग्रंथामुळं एक नवं वळण मिळालं.

सासवडचं सोपानकाका समाधी मंदिर चांबळी नदीच्या तीरावर उंच टेकडीवर आहे. मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूनं दगडी पायर्‍या आहेत. मंदिरासमोर मोठं पटांगण आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर आधी समोर नागेश्वराचं मंदिर दिसतं. गाभारा आणि सभामंडप दोन्ही काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. सभामंडपात अलीकडच्या काळात संगमरवरी फरशीवर सोपानदेवी ग्रंथ कोरून लावला आहे. सभामंडपासमोरच्या आवारात उघड्यावर नंदी आहे. दोन्ही बाजूला पूर्वी पुजारी आणि यात्रेकरूंना राहण्यासाठी बांधकाम केले होते. सध्या जीर्णोद्धार चालू असून, हे बांधकाम पडलं आहे. यामुळे मंदिराभोवतीच्या दगडी ओवर्‍या बघता येतात.

नागेश्वराच्या मागील बाजूस सोपानकाका समाधी मंदिर आहे. मंदिराचा मुख्य सभामंडप लाकडी असून, यातील सहा खांबांवर द्राक्षाचा वेल, त्यावर खेळणारी मुलं, पक्षी अशी कलाकुसर आहे. याच मंडपात समाधीसमोर भव्य अशी मारुतीची मूर्ती आहे.  सभामंडप आणि गाभार्‍याच्या मधे दगडी मंडप लागतो. या मंडपात राम, लक्ष्मण, सीता आणि विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. गाभार्‍यात सोपानकाकांची काळ्या पाषाणाची समाधी आहे. समाधीच्या मागे गोपालकृष्णाची मूर्ती आहे. सोपानकाकांनी समाधी घेतली ती भुयारवजा गुहा. या गुहेचं प्रवेशद्वार मंदिर परिसरातील चिंचेच्या झाडाखाली दाखवण्यात येतं. या जागेवर सोपानकाकांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. गुहेमध्ये ज्या ठिकाणी समाधीला बसले त्याच्या वर समाधी आणि गाभारा बांधला आहे. गाभार्‍यातून बाहेर छोटा दरवाजा असून, प्रदक्षिणा मार्गावर दत्त मंदिर आहे. गाभार्‍याच्या मागील बाजूला ओवर्‍या असून, याचा वापर यात्रेकरूंना राहण्यासाठी होतो. सभामंडप आणि मंदिर परिसरात अनेक छोट्या समाध्या तसंच काही वृंदावनं आहेत.

मंदिरात रोज सकाळी काकडा भजन, समाधीची पूजा, दुपारी नैवेद्य, सायंकाळी ४ वाजता समाधीला पोशाख आणि प्रवचन होतं. रात्री हरिपाठ, भजन आणि शेजारती होऊन मंदिर बंद होतं. कार्तिकी पौर्णिमेला सोपानकाका जयंती साजरी होते. पूर्वी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला यात्रा भरत असे. साधारण शंभर वर्षांपूर्वी आळंदीप्रमाणं सासवड इथं समाधी सोहळा साजरा करायला सुरुवात झाली. आता मार्गशीर्ष वद्य एकादशीला समाधी सोहळ्याची यात्रा भरते. यानिमित्त विविध फडकर्‍यांची कीर्तनसेवा सासवड येथे होते. या शिवाय वर्षभर रामनवमी, जन्माष्टमी, विविध वारकरी पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला विविध दिंड्यांतर्फे कीर्तन, जागर आणि द्वादशीला पंगत होते.

सासवडला सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढीनिमित्त निघणारा पालखी सोहळा. ज्येष्ठ वद्य द्वादशीला पालखीचं प्रस्थान होतं. याचवेळेस ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा सासवडला दोन दिवसांचा मुक्काम असतो. यानिमित्त एक यात्राच भरते. ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पूर्वी शिरवळमार्गे पंढरपूरला जात असे. शुद्ध एकादशी पंढरपूरला. तर वद्य एकादशी संतक्षेत्रात असा वारकर्‍यांचा रिवाज आहे. त्यामुळं वारीमधला ज्येष्ठ वद्य एकादशीचा मुक्काम सासवडला असावा असा विचार पुढे आला. त्यामुळं माउलींच्या पालखी सोहळ्याचा मार्ग बदलून पालखी सासवडमार्गे जाऊ लागली. तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा पूर्वी सासवडमार्गे पंढरपूरला जात असे, असं जुने गावकरी सांगतात. पुढे गर्दीमुळे पालखी सोहळा स्वतंत्र मार्गानं जाऊ लागला. पंढरपूरला जाताना पालखीचा मुक्काम गावाबाहेर स्वतंत्र ठिकाणी असतो. परतीच्या प्रवासात माउलींची पालखी सोपानकाकांच्या समाधी मंदिरात उतरते.

सोपानकाकांच्या समाधीमुळं वारकरी संप्रदायासाठी या क्षेत्राचं महत्त्व वाढलं. याशिवाय सासवडच्या सांस्कृतिक परंपरेत शैव आणि नाथ संप्रदायाच्याही खुणा दिसतात. मुळात सोपानदेव नाथपंथाचे अनुग्रहित. सोपानदेवांच्या नाथपंथीय शिष्य शाखेचेही उल्लेख रा. चिं. ढेरे यांना मिळाले आहेत. यापैकी एका शिष्यशाखेत लिहिल्या गेलेल्या ‘गोरक्षगीतानिरुपण’ या ग्रंथात गंगाधरनाथांनी त्यांची गुरुपरंपरा सांगितली आहे. त्यात सोपानदेवांचा उल्लेख सोपाननाथ असा केला आहे.

गहनीनाथ निवृत्तीनाथ| ज्ञाननाथ सोपाननाथ॥
मुकुंदनाथ आवृतनाथ| दीनबंधू दयाळू॥
अच्युतनाथ नरसिंहनाथ| अलक्षनाथ जनार्दननाथ॥
सद्गुरू माझा श्री रघुनाथ| पतितपावन परमात्मा॥

सोपानदेवांची एक नाथपंथीय शिष्य शाखा कर्नाटकातसुद्धा विद्यमान होती. या शाखेतील सरफोजी राजांच्या आश्रयाला असलेल्या एका शिष्यानं मराठी ग्रंथलेखन केलं आहे.

सासवडपासून १२-१३ किलोमीटर अंतरावर बोपदेव गावाजवळ नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांचं मंदिर आहे. यालाच काहीजण कानिफनाथ समाधी स्थान मानतात. या मंदिराच्या गाभार्‍यात फक्त पुरुषांना प्रवेश आहे. इथं शर्ट काढून आणि चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवून प्रवेश करावा लागतो. प्रवेशासाठी छोटं खिडकीवजा प्रवेशद्वार असून, त्यातूनच सरपटत गाभार्‍यात जावं लागतं. हे या मंदिराचं वैशिष्ट्यं बनलं आहे. येथील कानिफनाथांची समाधी दर्ग्याप्रमाणं आयताकृती आकाराची आहे. नवनाथांच्या बहुसंख्य समाध्या या काही दशकांपूर्वीपर्यंत पीर म्हणून ओळखल्या जायच्या. सोपानकाकांच्या समाधी मंदिरावरसुद्धा पूर्वी घुमट आणि मिनार होते, अशी माहिती गोसावी कुटुंबाकडून मिळाली. पुढं मंदिराचा जीर्णोद्धार होऊन गर्भगृहावर शिखर बांधण्यात आलं. त्यात या सुफी खुणा पुसल्या गेल्या. राज्यभर उसाच्या गुर्‍हाळाच्या व्यवसायात पुरंदर तालुक्यातील मंडळी आघाडीवर आहेत. त्यातही बोपगावची फडतरे मंडळी या व्यवसायात जम बसवून आहेत. त्यामुळं मुंबईपुण्यासह अनेक शहरांतल्या रसवंती गृहांना नवनाथांचं किंवा कानिफनाथांचं नाव असतं.

सासवड गाव आणि परिसरातही कानिफनाथांची काही ठाणी आहेत. यापैकी एक खुद्द सासवड गावात शिंपी आळीमध्ये आहे. निरगुडे परिवाराच्या खासगी मालकीच्या या मंदिरातील समाधीचा वेळोवेळी जीर्णोद्धार झाला आहे. सासवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील निरगुडे कुळात कानिफनाथांची पूजा हा कुळाचाराचा भाग आहे, अशी माहिती नवीन पिढीचे पुजारी ओंकार निरगुडे यांनी दिली. पुजारी निरगुडे मंडळींच्या देवघरात नवनाथांचे ताईत आहेत. वर्षातून एकदा हे ताईत मढीला रंगपंचमीच्या यात्रेत नेऊन तेथे विशिष्ट पूजा करून यामध्ये नवीन निर्माल्य भरून पुन्हा आणतात आणि वर्षभर पूजतात.

महाराष्ट्रातील शैव क्षेत्रातील महत्त्वाचं क्षेत्र शिखर शिंगणापूरचा महादेव. या ठिकाणी चैत्र महिन्यात अनेक ठिकाणांहून अभिषेकासाठी कावडी येतात. यातील मानाची कावड सासवड येथून येते. या कावडीला ‘भुत्या तेल्याची’ कावड असं म्हणतात. या कावडीचं मानकरी घराणं कावडे या नावानं ओळखलं जातं. ज्ञानदेव आणि इतर वारकरी संतांनी कावडींवर रूपक अभंग लिहिले आहेत.

सासवडमध्ये नदीकिनारी दगडात कोरलेली अनेक शिवलिंगं सापडतात. पांडवांपैकी भीमानं ही शिवलिंगं खोदल्याची एक आख्यायिका सांगितली जाते. येथील सर्वात जास्त आणि प्राचीन मंदिरं शंकराची आहेत. या मंदिरांपैकी नागेश्वर, सिद्धेश्‍वर, संगमेश्वर आणि वटेश्वर ही मंदिरं प्रसिद्ध आहेत. यापैकी नागेश्वर मंदिर चांबळेच्या काठी असून, याच मंदिराच्या मागील बाजूस संत सोपानकाकांनी समाधी घेतली. सध्या हे मंदिर संत सोपानकाका समाधी मंदिराच्या आवारातच आहे. माउलींनी आळंदीला सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या आवारात समाधी घेतली. निवृत्तिनाथांची समाधी तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर क्षेत्री आहे. संगमेश्वर मंदिर कर्‍हा आणि चांबळीच्या संगमावर आहे तर वटेश्वर मंदिर कर्‍हेकाठी आहे.

वटेश्वर या विशेषनामानं प्रसिद्ध असलेला महादेव हे चांगदेवांचं आराध्य दैवत होतं. वटेश्वर हे देवतेचं नाव चांगदेवांच्या नावाशी जोडलं गेलं. चांगदेवांना चांगा वटेश्वर या नावानं ओळखलं जातं. चांगदेवांशी संबंधित वटेश्वर मंदिरं अजून काही ठिकाणी आहेत. समाधिवर्णनाच्या अभंगात चांगा वटेश्वरांनी इथं तप केल्याचा उल्लेख आधी आला आहेच. शिवाय अभंगात वटेश्वरांचा उल्लेख सोपानकाकांच्या सोबतच अनेकदा आला आहे. याचा उल्लेख वर आला आहे. समाधी वर्णनाच्या अभंगांत पांडुरंगानं आळंदी यात्रेला जाताना या क्षेत्री उभयतांना भेट देऊ, असं म्हटलं आहे. या सर्व गोष्टींमुळं सासवडशी चांगा वटेश्वरांचा असलेला संबंध स्पष्ट होतो. चांगा वटेश्वरांचे सासवडशी असलेले हे ऋणानुबंध लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी सोपानकाका समाधी मंदिराजवळील लक्ष्मी नारायण मंदिरात चांगा वटेश्वरांची प्रतीकात्मक समाधी बांधण्यात आली आहे. या ठिकाणाहून पूर्वी लक्ष्मी नारायण पालखी पंढरपूरला जात असे. आता चांगा वटेश्वर नावानं ही पालखी निघते. या पालखीचं प्रस्थानही सोपानकाकांच्या प्रस्थानादिवशी होतं.

नामदेवरायांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांत जेजुरीचा खंडोबा आणि कोंढणपूरची देवी या सासवडजवळच्या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आला आहे. नाथ, वारकरी आणि शैव या तिन्ही दैवतांमुळं प्रसिद्ध असलेलं सासवड अलीकडच्या काळात मात्र नारायण महाराजांमुळं प्रसिद्ध झालेल्या नारायणपूरच्या दत्त मंदिरामुळं आणि केतकावळे येथील पर्यटकप्रिय प्रतिबालाजी यासाठी ओळखलं जातं. भाविकांची मानसिकता बदलत चालल्याचं हे लक्षण मानायला हवं.

0 Shares
महायोगिनी ऐसे खेचरीचे रान