महायोगिनी

नरेद्र साठे

विसोबा खेचर आणि योगी चांगदेव या ज्येष्ठांनी धाकुट्या मुक्ताईला गुरू केलं. अभ्यासक म्हणतात, ती ज्ञानदेव भगिनी नव्हे तर नाथपंथीय महायोगिनी मुक्ताबाई होती. अर्थात या दोन्हीही मुक्ताबाईंच्या पाऊलखुणा गावा-खेड्यांनी अजूनही जपल्यात.

विसोबा खेचरांच्या षटस्थल ग्रंथात त्यांनी आपली गुरू परंपरा सांगितली आहे. ती नाथपंथीय आहे. आदिनाथ-मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ-मुक्ताई-चांगदेव-कृष्णनाथ-विसा खेचर अशी आहे. दुसरीकडं विसोबा ज्ञानदेव मंडळात दाखल होतात तेव्हा ते ज्ञानदेव, सोपानदेव आणि धाकल्या मुक्ताईलाही गुरू मानतात. अर्थात या भावंडांनीही आपली परंपरा नाथांची असल्याचं वारंवार सांगितलंय. अभ्यासक म्हणतात, ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाई नव्हे, तर नाथपरंपरेतील गोरक्षनाथांची शिष्या महायोगिनी मुक्ताबाई या चांगदेव आणि विसोबांच्याही गुरू आहेत. पुढं असंही सांगितलं जातं, की चांगदेवांनी आद्य मुक्ताईच्या समाधीनंतर ज्ञानदेवांच्या छोट्या बहिणीला मुक्ताईलाच गुरू मानलं. चांगदेवांची गुरू परंपरा आणि प्रत्यक्ष मुक्ताईचा सहवास यामुळं साहजिकच विसोबा मुक्ताई आणि भावंडांचे शिष्यच बनले.

महाराष्ट्रात धाकट्या मुक्ताईची मंदिरं भरपूर दिसतात, पण आद्य मुक्ताईच्या पाऊलखुणा अजिबात दिसत नाहीत, असं ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी नमूद केलंय. तथापि ‘रिंगण’चे संपादक श्रीरंग गायकवाड यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात गावोगावच्या सीमेवर मुक्ताईची मंदिरं आहेत. या मुक्ताई मंदिराच्या परिसरातच भैरवनाथ, धर्मनाथ या नाथपंथीय दैवतांची मंदिरं आहेत. खेडोपाड्यात एवढी रुजलेली देवी नक्कीच आद्य मुक्ताई असणार. मुक्ताई म्हणजे भक्तांना बंधनातून मुक्त करणारी. ही फार मोठी, खमकी स्त्री असणार. जिच्यासमोर चांगदेव, विसोबाच काय, तर महानुभवांसारखे इतर पंथाचे लोकही नतमस्तक होतात. चांगदेवांना ज्ञानदेव भगिनी मुक्ताई या आद्यमुक्ताईच्या अवतार वाटाव्यात यात सारं काही आलं. म्हणूनच या मुक्ताईंचा प्रभाव जनमानसावर कसा आहे, हे शोधायचं ठरलं. त्यासाठी आळंदी परिसर निवडला.

एका भल्या सकाळी निघालो. वडमुखवाडी पुण्यापासून २० ते २५ किलोमीटरवरील गाव. हे गाव आळंदी रस्त्यावर आहे, एवढीच माहिती हाताशी होती. सकाळी बाईक काढली आणि भोसरी मार्गे आळंदीचा रस्ता धरला. रात्री पाऊस पडून गेल्यानं वातावरणात गारवा जाणवत होता. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होतीच. आळंदीहून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा पुण्यात पोचला असल्यानं रस्ता मोकळाच होता. माऊलींच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभारलेल्या कमानी काढण्याचं काम सुरू होतं. भोसरी फाट्यापासून थोडं पुढं गेल्यानंतर डाव्या बाजूच्या एका मिसळ हाऊसमध्ये चहासाठी थांबलो. तिथं वडमुखवाडीची चौकशी केली. हॉटेलमालकानं सांगितल्याप्रमाणं पुढं जात राहिल्यानंतर वडमुखवाडी असा फलक दिसला. अरुंद रस्त्यावरून गाडी वळवली तर समोर लहान-लहान दाटीवाटीतली घरं दिसू लागली.

साधारणत: पंचाहत्तरीतले बाबा दिसले. त्यांना विचारलं, आजोबा इथं मुक्ताईचं मंदिर कुठं आहे? तसं त्यांनी हातानंच पुढं जा अशी खूण केली. मी लगेच दुसरा प्रश्न केला, ‘इथं ज्या मुक्ताईचं मंदिर आहे, त्या कोणत्या मुक्ताई? माऊलींची बहीण की अन्य दुसर्‍या कोणी?’ आजोबा म्हणाले, ‘त्याची काही जास्त माहिती नाही, पण लई दिवसापासून गावात लहान मंदिर आहे मुक्ताबाईचं.’

एका केशकर्तनालयाच्या समोर गाडी नेऊन उभी केली. त्यांना विचारलं, मुक्ताईचं मंदिर कुठयं? त्यावर दुकानातले काका म्हणाले, इथून सरळ पुढं जावा. ते समोर पांढरी टोपी घातलेले काका बसलेत ना, त्यांच्या उजव्या बाजूला छोटसं मंदिर दिसंल, ते मुक्ताईचं मंदिर.

तिथं एका उंच ओट्यावर पांढरी टोपी, पायजमा, कुर्ता घातलेले गृहस्थ भेटले. त्यांचं नाव गुलाबराव तापकीर. हातानं दाखवत म्हणाले,  हेच मुक्ताईचं मंदिर. साधारण चार ते पाच फूट उंचीचं एक लहानसं देऊळ होतं ते. गुलाबराव म्हणाले, इथं पाठीमागंच अगोदरचं दगडाचं अगदीच लहान मंदिर होतं. गाव पहिलवानांचं. त्यामुळं मंदिराशेजारी तालीमही होती. आता कोण जात नाही म्हणून तालीम बुजवून टाकलीय. त्या जागेवर हा ओटा बांधला. गावात ज्याच्या घरी लग्न असंल त्या घरचे मंडळी अगोदरच्या दिवशी या ओट्यावर मीटिंग घेतात. तिथंच गावकर्‍यांना लग्नाचं आमंत्रण दिलं जातं. आता जिथं मंदिर आहे, पूर्वी तिथं एक टेकडी होती. ती टेकडी फोडून गावकर्‍यांनी सात-आठ वर्षांपूर्वी मुक्ताईचं मंदिर बांधलं. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील उभारण्यात आला.

गुलाबरावांनाही या मुक्ताई ज्ञानदेवांच्या बहीण की दुसर्‍या कोणी मुक्ताई आहेत, असं विचारलं. तेही माहिती नाही म्हणाले. आमचं बोलणं सुरू असतानाचं गावातच पेंटिंगचं काम करणारा नीलेश पाठीमागं उभं राहून ऐकत होता. आमचं बोलणं तोडत तो म्हणाला, एवढीच माहिती पाह्यजे आसंल तर आळंदीत एखाद्या महाराजांना भेटा की, सगळी माहिती देत्याल ते. तेवढ्यात मंदिराच्या समोरचा उतार उतरून साठीतल्या दोघी महिला येत होत्या. गुलाबरावांनी त्यांना आवाज दिला, ‘अरं, इकडं या. या पोरांना जरा माहिती द्या आपल्या मुक्ताईविषयी.’ त्यातली एक माऊली बोलकी होती. त्यांचं नाव लक्ष्मीबाई तापकीर. म्हणाल्या, माझ्या लग्नाच्या आधीपासून हे मंदिर हाये. जुनी लोकं गेली. आमचीपण पिढी चालली आता. नक्की माहिती नाही हे मंदिर गावात कधीपासून हाय त्ये. पदूबाई, लक्ष्माई, दिव्याई यांची प्रत्येक गावात ठाणी असत्यातच की. आखाड (आषाढ) महिन्यात ‘मोढा’ असतो. दर मंगळवारी हा ‘मोढा’ धरत्यात.  मंदिर आसंल त्या गावच्या पंचक्रोशीत असतो मोढा.

मोढा म्हणजे काय? मोढा का धरला जातो असं विचारलं तर, लक्ष्मीबाई म्हणाल्या, पूर्वीपासूनची प्रथा हाये. देवाचं आहे म्हणून आम्ही करत आलो. पण आता कोणी मोढा फार पाळत नाही. पूर्वी मोढा असलेल्या दिवशी शेतात औत नाही धरायचे. खुरपायचे नाहीत. दोन हंड्यांनी पाणी आणायचे नाहीत. गिरणी बंद ठेवायचे. आता कोणी विहिरीवर पाणी आणायला जात नाही. प्रत्येकाच्या घरी नळ आलेत. कुणाकडं बैलं राहिले नाहीत. बायांना आता सुखाचे दिवस आलेत. त्यांना कुठं लावणी करायला जायचं नाही. खुरपायला जायचं नाही. नाश्ता करायचा, जेवायचं, पोरांना शाळेत सोडायचं आणि पुन्हा शाळेतून घेऊन येयाचं, असली कामं राहिलीत फक्त. चला जाते रे बाबांनो लई येळ झालायं मला कामंहेत. म्हणून लक्ष्मीबाईंनी आमचा निरोप घेतला. लक्ष्मीबाईंनी आळंदी परिसरातलं वास्तव सांगितलं होतं. आळंदी पुण्याला अगदी खेटूनच असल्यानं आता परिसराचा मोठा विकास होत आहे. विकास म्हणजे इथं मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. राहत आहेत. शेतजमिनी गुंठेवारीनं बिल्डरांना विकून शेतकर्‍यांच्या हातात पैसा आलाय. त्यामुळं त्यांच्या बायकांना आता शेतात राबावं लागत नाही, असं लक्ष्मीबाईंच्या बोलण्यातलं सार होतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीबाई मोढा या परंपरेविषयी काही तरी थोर बोलत होत्या. नदी, विहिरीवरून पाणी आणायचं, दळणकांडण करायचं, चूलमूल सांभाळायचं, शेतात राबायचं हे खेडोपाड्यातल्या बायकांचं पिढ्यानपिढ्याचं  आयुष्य. कल्पना करा आजच्या काळातही कुणा मुक्ताईचा मोढा एका दिवसासाठी का होईना, या कामाच्या रगाड्यातून महिलांची मुक्ती करत असेल, तर महिला किती ऋण मानत असतील? म्हणूनच गावागावातल्या महिलांनी मंदिरातली मुक्ताई जितीजागती ठेवली असणार.

मी कॅमेरा काढून मंदिराचे फोटो घेण्यासाठी पायर्‍या चढून वर गेलो. अतिशय लहान दिसणार्‍या मंदिरात मी खाली बसून मुक्ताईची मूर्ती न्याहाळू लागलो. साडीमधील मुक्ताईची मूर्ती अतिशय बोलकी आणि हसरी वाटली. जणू काही मुक्ताई आपल्याशी आत्ता बोलेल! मंदिरात स्वच्छ उजेड नव्हता. त्यामुळं कॅमेर्‍याची सेंटिंग चेंज करून वेगवेगळ्या अँगलमध्ये मुक्ताईचे आणि तिच्या मंदिराचे फोटो काढले. जवळच उभ्या असलेल्या नीलेश पेंटरनं या बाजूनं फोटो घ्या… त्या बाजूनं घ्या, अशा सूचना केल्या.

गुलाबराव आणि तरुण पेंटर नीलेश आतापर्यंत आमचे चांगले मित्र झाले होते. गुलाबरावांना मुक्ताईचे पुजारी आहेत का, असं विचारल्यानंतर त्यांनी हो म्हणून सांगितलं. आणि एका पोराला आवाज देऊन भगताला बोलून आण म्हणून पिटाळलं. त्या पोराबरोबर एक चाळीशीतील्या महिला आल्या. त्यांचं नाव जयश्री भालेराव. त्यांना मुक्ताईंविषयी विचारलं तशा त्या म्हणाल्या, ‘माझं जसं बाशिंग सुटलंय तशी मी मुक्ताईची सेवा करते’. दोन मुक्ताई आहेत का, याविषयी विचारलं असता, त्यांनी सांगितलं, नाही तसं सांगता येणार नाही. या मुक्ताईचं खरं ठाणं कोंढणपूर इथं आहे. आम्ही त्यांची फकस्त पूजा करतो. बाकी नाही काही माहिती, जुन्या लोकांना होती. आम्ही या मुक्ताईबद्दल फारशा आख्यायिकादेखील ऐकलेल्या नाहीत.

मुक्ताईंच्या पूजेविषयी त्या म्हणाल्या, रोज मुक्ताईला पाणी घालायचं. सणावाराला दह्यादुधाचा अभिषेक. गावातले लोक निवद दाखवतात. वाडवडिलांकडून आलेली मुक्ताईची सेवा आम्ही पुढं चालवतोय. तेवढ्यात जयश्री भालेराव यांचे पती मच्छिंद्र भालेराव आले. त्यांनी सांगितलं, आमची दुसरी पिढी आहे, मुक्ताईची सेवा करणारी. वडिलांकडूनही मुक्ताईबद्दल जास्त माहिती ऐकली नाही. कोंढणपूरला आम्ही सहसा जात नाही. हे मुक्ताईचं मंदिर किती जुनं, हे काही ठाऊक नाही. जयश्री भालेराव यांनी चर्‍होली बुद्रुक या गावातही मुक्ताईचं मंदिर असल्याचं सांगितलं. तिथं त्यांचे भाऊ राहतात. गावात गेलात की, गुरव कुठं राहतात, असं विचारा. कुणीही सांगेल तुम्हाला, असं जयश्रीताई म्हणाल्या.

रस्त्याच्या बाजूनं कमरेत वाकलेल्या गरजाबाई तापकीर जात होत्या. गुलाबरावांनी त्यांनाही आवाज दिला. आम्हाला माहिती द्या म्हणून सांगितलं. गरजाबाई म्हणाल्या, आमच्या लग्नाच्या अगोदरपासून मुक्ताईचं मंदिर इथं आहे. थकलेल्या माणसांना विचारलं पाहिजे. तेवढ्यात मित्र विनोदानं म्हणाला, तुम्हीदेखील थकल्या आहातच की. गरजाबाई म्हणाल्या, माझं वय आता ऐंशी आहे. लग्न झालं तव्हा लहान मंदिर होतं. पयल्यांदा खाली होतं छोटं मंदिर. आता ते वरच्या बाजूला घेतलं आहे.

सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही चर्‍होलीला शेतरस्त्यानं निघालो. शेतात ट्रॅक्टरनं पेरण्या सुरू होत्या. स्मार्ट सिटीकडं वाटचाल करणार्‍या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाविष्ट गावांमध्ये वडमुखवाडी आणि चर्‍होली येतं. त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांची आणि इतर विकासकामं सुरू होती. चर्‍होली गावात गेल्यानंतर मुक्ताईचं मंदिर कुठंय, असं बस स्टँडवर बसलेल्या एका व्यक्तीला विचारलं. तर माहिती नाही, म्हणून उत्तर मिळालं. गुरवाचं घर शोधत-शोधत आम्ही एका मोठ्या वेशीतून आत जाऊन पंक्चरच्या दुकानासमोर थांबलो. त्यांच्याकडं चौकशी केल्यानंतर कपाळाला मोठा गंध आणि डोक्यावर मोठी शेंडी असलेला तरुण म्हणाला आम्हीच गुरव आहोत. बोला काय झालं? मुक्ताईचं मंदिर कुठं आहे, असं विचारल्यावर गावात असं मंदिरच नाही, असं तो म्हणाला. तरीपण आमच्या चुलत्यांना विचारा, म्हणून त्यांनं रस्त्याची दिशा दाखवली. चर्‍होलीतील गल्ली बोळीतून जाताना मोठमोठे बंगले आणि त्यासमोरील चकचकीत गाड्या पाहत आम्ही एका तीन मजली इमारतीसमोर थांबलो. खाली बसलेल्या पोरांना गुरव कुठं राहतात, असं विचारल्यावर ती म्हणाली, दुसर्‍या मजल्यावर. आमचा आवाज ऐकूण एक तरुण दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीत येऊन थांबला. तो गुरवकाकांचा मुलगा. वडील घरात नसल्याचं वरूनच सांगत गावात मुक्ताईचं मंदिर नसल्याचंही तो म्हणाला. समोर महाजनकाका आहेत, त्यांना विचारा, असंही म्हणाला. महाजनकाकाही गावात मुक्ताईचं मंदिर नाही, असं म्हणाले. आम्ही पुन्हा गावच्या बस स्टँडवर येऊन थांबलो.

तिथं एक पन्नाशीतले संभाजी नावाचे गृहस्थ होते. त्यांनी तिथून जवळच मरकळ रोडला सोळू नावाच्या गावात मुक्ताईचं मंदिर असल्याचं सांगितलं. पेंटर नीलेशला कामावर जायचं असल्यानं त्यानं आमचा निरोप घेतला. आम्ही त्या व्यक्तीला मोढा परंपरेविषयी विचारलं. त्यांनी जवळचं बसलेल्या एकाला ‘ओ पाटील इकडं या’ म्हणून आवाज दिला. पाटील आले. यांना जरा मोढ्याबद्दल माहिती द्या म्हटल्यावर त्या प्रवीण तापकीर पाटलांनी सांगितलं, समोर जी वेस दिसते ना, ती आखाडातल्या मोढ्याच्या मंगळवारी सकाळी सहा ते रात्री सहा या वेळेत बंद केली जाते. त्यातून फक्त टू व्हीलर दुसर्‍या बाजूला जाऊ शकेल एवढाच रस्ता ठेवला जातो. मोढ्याच्या दिवशी दोन हंड्यानं पाणी आणलं जात नाही. वेशीतून चप्पल घेऊन जात नाहीत. चर्‍होलीतही आषाढातल्या मंगळवारीच मोढा धरला जातो. अजूनही या दिवशी शेतीची कामं शेतकरी बंद ठेवतात. त्या दिवशी दोन हंड्यानं पाणी का आणायचं नाही, हे माहिती नाही, पण पहिल्यापासून चालत आलं आहे. सोळू गावला कसं जायचं हे पाटलांना विचारुन आम्ही तिथून निघालो.

चर्‍होलीतून एका कच्च्या रस्त्यानं पुढं गेल्यानंतर पांदीचा रस्ता सुरू झाला. अर्थात हा पांदीचा रस्ता चिखलाचा नव्हे तर पक्का डांबराचा होता. बाईकवर जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं जणू अंगावर येत होती. एका वस्तीवर पुन्हा सोळूकडं जाणारा रस्ता कोणता आहे, याची विचारणा केली. सोळू आळंदीपासून साधारण पाचेक किलोमीटरवर असावं. गावात गेल्यानंतर मुक्ताईचं मंदिर कुठंय असं विचारल्यानंतर, तो सभापतीचा बोर्ड दिसतोय का, तिथून आत जा लगेचच मंदिर दिसंल असं, पानटपरीवाल्यानं सांगितलं. त्याप्रमाणं गावात वळलो शेजारून जाणार्‍या शाळकरी मुलांना विचारल्यानंतर त्यांनी चोहोबाजूंनी घरांनी वेढलेल्या एका शिखराकडं हात दाखवला. मंदिरासमोर दोन मोठी झाडं होती. त्यातील एक अजान वृक्ष असल्याचं तिथल्या महाराजांनी सांगितलं. मंदिराच्या दरवाजाला कडी लावलेली होती. कडी उघडून आत गेलो. मंदिरात एका बाजूला टाळ, पखवाज, सतरंज्या, स्पीकर असं भजनी मंडळांचं साहित्य ठेवलं होतं. लाकडी खांबांचा आधार दिलेलं कौलारू छपराचं मंदिर. आतमध्ये गाभार्‍याचं आणखी एक मंदिर. त्यावर मुक्ताईसह चारही भावंडाच्या मूर्ती बसलेल्या. तिथल्या एका मुलानं सांगितल्याप्रमाणं आम्ही एका महाराजांना भेटण्यासाठी मंदिराच्या पाठीमागं नव्यानं बांधलेल्या दत्त मंदिरात गेलो.

महाराज कसली तरी जुनी कागदपत्रं काढून एका व्यक्तीसोबत चर्चा करत होते. कागद पावसानं भिजले असावेत. म्हणून ते सुकण्यासाठी ठेवले होते. त्यात ट्रस्टच्या नोंदणीपासून अनेक जुनी पत्रं होती. १९८९मध्ये वर्तमानपत्रात आलेल्या ट्रस्टच्या जाहिरीतीची कात्रणं महाराज काढत होते. आमचं स्वागत करून त्यांनी आमच्या येण्यामागचं प्रयोजन जाणून घेतलं. महाराजांचं नाव हभप बळवंत ठाकूर. मंदिराचं बांधकाम साधारण शंभर वर्षांपूर्वीचं असावं, असा अंदाज त्यांनी वर्तवला. माऊलींच्या सोहळ्यात गावची दिंडी गेल्या २२ वर्षांपासून सहभागी होते. दिंडी पुढं गेली आहे, परंतु त्यांची काही सुविधा करण्यासाठी मी मागे थांबलोय, असा खुलासा महाराजांनी केला.

शेजारी बसलेल्या एका छोट्या मुलानं बाबा त्यांना गावाच्या नावाविषयी सांगा म्हणून सांगितलं. अरे हो, म्हणून त्याला आठवण करून दिल्याबद्दल शाबासकी देऊन म्हणाले, ‘सोळू गावाचं नाव पूर्वी आंबेगाव होतं. परंतु याठिकाणी मुक्ताईचा मोठा सोहळा झाला. सोहळा म्हणजे दीक्षा वगैरे असा काही तरी कार्यक्रम झाला. तेव्हापासून या गावाचं नावं सोळू पडलं. मी लहान असताना मंदिरावर इंग्रजी कौलं टाकल्याचं मला आठवतं. ती कौलं फुटू लागल्यानंतर चार-पाच वर्षांपूर्वी हे पत्र्याचं छत केलं. हेवेदावे विसरून गावकरी मंदिरात एकत्र येतात. मंदिराच्या समोर एक अजान वृक्ष आहे. ज्ञानदेवादी भावंडांची मंदिरं जिथं असतात, तिथं हा अजान वृक्ष असतो. अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर मंदिरात पहाटे काकड आरती होते. त्यानंतर उत्सवाचा कार्यक्रम असतो. पौष पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी गावात पालखी काढून नगर प्रदक्षिणा केली जाते…’

ठाकूर महाराज सांगत होते, ‘मोढा आमच्या गावात देखील पाळला जातो. आषाढ महिन्यातील मंगळवार आणि श्रावणातील गुरुवारी मोढा पाळला जातो. मोढ्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन सार्वजनिक कामं करायचे. आता त्याचं प्रमाण कमी झालंय. पण मला आठवतं, मोढ्याच्या दिवशी श्रमदानातून रस्त्याचं काम केलं जायचं. त्यादिवशी घरची, शेतातली काहीच कामं करायची नाही. औत-काठी बंद ठेवायची. चौकात विहीर आहे. त्या विहिरीतला गाळ मला आठवतंय दोन-तीन वेळा मोढ्याच्या दिवशीच आम्ही उपसला आहे. या दिवशी दोन हंड्यांनी पाणी आणत नसत. गावातली पिठाची गिरणी बंद ठेवली जाई. अजूनही या परंपरा चालू आहेत.’

मोढ्यात दोन हांड्यांनी पाणी का आणलं जात नाही, हे विचारल्यावर ठाकूर महाराज म्हणाले, ‘त्यामागचं नेमकं कारण माहिती नाही. पण पूर्वी नदीवरून पाणी आणावं लागायचं. आषाढ-श्रावणात रस्ते निसरडे झालेले असत. असा वेळी डोक्यावर दोन हंडे घेतलेल्या महिलांचा पाय घसरून तोल जाऊ नये म्हणून तसंच त्यांना कामातून विश्रांती मिळावी म्हणून ही प्रथा पडली असावी. गावातले ७५ टक्के लोक मांसाहारी होते. आता परिस्थिती उलटी झालीय. या आधुनिक काळातही अधिकाधिक लोक शाकाहारी झालेत. गावातील दिंडी, आळंदीहून येणारे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यामुळं हा बदल झाला असावा. आळंदीतले अनेक विद्यार्थी मधुकरी मागण्यासाठी सोळूमध्ये येतात. एका ग्रंथात या गावात मुक्ताईचा सोहळा झाल्याचा उल्लेख आहे. त्या ग्रंथाचं नाव मला आता सांगता येणार नाही. पण कीर्तनकार सांगतात.’

गावात एक सोनबा ठाकूर म्हणून होते. तुकोबांच्या दिंडीतील १४ टाळकर्‍यांपैकी ते एक. देहूला आता या १४  टाळकर्‍यांची कमान उभी केली आहे. त्यात सोनबामहाराजही आहेत. सोळू येथून ठाकूर महाराजांचा निरोप घेऊन आळंदी मार्गे येण्यास निघालो. आणखी काही लोकांना विचारलं. तर समजलं की, आंबेगाव नावाच्या या गावात पूर्वी निबीड अरण्य होतं. संत ज्ञानेश्वरमाऊलींनी आळंदीत संजीवन समाधी घेतल्यानंतर खिन्न झालेली मुक्ताई इंद्रायणी काठच्या आंबेगावच्या अरण्यात येऊन बसली. पुढं तिचं मन वळवण्यासाठी सारे संत या गावी जमा झाले. त्या वेळी जो ‘सोहळा’ झाला त्यातून गावाचं नाव बदलून सोहळ्याचं गाव अर्थात सोळू झालं!

हा दीक्षा समारंभ, सोळूपुराण ऐकताना मला नाथ पंथाच्या परंपरेबाबत सुरुवातीला झालेली चर्चा आठवली. नाथपरंपरेत दीक्षाविधीला मोठं महत्त्व. नक्कीच या गावात मोठा दीक्षा सोहळा झाला असेल. नाथपंथीय योगी आणि वारकर्‍यांनी केलेला जयजयकार आणि टाळमृदंगाच्या गजरानं इथलं आकाश दुमदुमून गेलं असेल. गावाचं नाव ‘सोळू’ ठेवून पंचक्रोशीनं हा अपूर्व सोहळा पिढ्यानपिढ्या आपल्या जाणीवेनेणीवेत जपून ठेवला आहे, असं वाटलं.

मुक्ताईंचे संदर्भ शोधत असताना जोडूनच चांगदेव महाराजांचा उल्लेख होतो. त्यांची तपोभूमी म्हणजे नगर जिल्ह्याच्या सीमेवरील हरिश्चंद्र डोंगर. तेथून ते ज्ञानदेवादी भावंडांना भेटायला आळंदीला आले. त्यामुळं मार्गात ठिकठिकाणी त्यांच्या पाऊलखुणा आढळतात. चांगदेवांची नाळ नगर जिल्ह्याशी जोडलेली आहे. त्यांचं जन्मस्थळ आहे, नगर जिल्ह्यातल्या नारायणडोहो या छोट्या गावात. साधारणत: तीन हजार लोकवस्तीचं हे गाव. नगरपासून बारा किलोमीटरवर. अहमदनगरमधून चांदणी चौक मार्गे, सोलापूर रस्त्यानं नारायणडोहोला जाण्याचा रस्ता आहे. विसोबा खेचरांचे गुरुबंधू असलेल्या चांगदेवांच्या जन्मगावी जाणं रोमांचकारी वाटलं. कारण याच परिसरानं चांगदेव, विसोबांवर संस्कार केले असणार. त्यांना जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं असणार. विसोबांकडून हेच तत्त्वज्ञान घेऊन त्यांच्या शिष्यानं, संत नामदेवांनी देशभर बंधुभावाचा, समतेचा वारकरी झेंडा फडकवला असणार. एमआयआरसी या लष्कराच्या छावणीला ओलांडल्यानंतर चांगदेवांचं जन्मस्थळ आलं.

गावच्या बस स्टँडवर गेल्यानंतर डाव्या बाजूला भव्य अशी कमान आपलं स्वागत करते. या कमानीवर गावातल्याच एका रंगार्‍यानं वाघावर बसलेले चांगदेव महाराज चितारलेत. उजव्या बाजूनं गावात प्रवेश केल्यानंतर समोर चांगदेव महाराजांचं मंदिरही दिसलं. तिथंच काही तरुण मंडळीही भेटली. त्यातला विजय साठे म्हणाला, गावातलं चांगदेव महाराजांचं मंदिर खूप पूर्वीपासून आहे. या मंदिराच्या अगोदर याठिकाणी दगडी बांधकाम असलेलं तीन टप्प्यातलं मंदिर होतं. ते मंदिर हेमाडपंथी असल्याचं वडीलधारी सांगतात. पहिल्यांदा कमानीचा सभामंडप, त्यानंतर दगडी खांबावर दुसरं सभागृह आणि त्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा, अशी पूर्वीच्या मंदिराची रचना होती. या मंदिरात संपूर्ण दगडी फरशी असल्यानं मंदिरात नेहमीच थंड वातावरण असायचं. नंतरच्या काळात मंदिराचं शिखर आणि सभामंडप नव्यानं बांधण्यात आला. चांगदेव महाराजांच्या संदर्भात अनेक अख्यायिका आज्जी सांगत आली आहे. चांगेदव महाराज चौदाशे वर्ष जगले. त्यांनी चौदा वेळा यमराजाला माघारी पाठवलं, अशा तिच्या गोष्टी लहानपणी ऐकल्यात. चांगदेवांचा जन्म गावातल्या मुरद्गण या ब्राह्मण कुटुंबात झाल्याचं गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

जवळच असलेले मोहन बांगर यांना आम्ही भेटलो. त्यांनी चांगदेव महाराजांच्या संदर्भातील अख्यायिका सांगितली. माऊली नेवासेवरून आळंदीला जाताना पुणतांब्याला थांबले. त्याठिकाणी त्यांना काही माणसं मृतदेह घेऊन थांबलेली दिसली. त्याबाबत विचारता इथं चांगदेव महाराज तपश्चर्या करत आहेत. ते येऊन या मृतदेहांना जिवंत करणार असल्याचं ज्ञानेश्वर माऊलींना सांगण्यात आलं. माऊलींनी मुक्ताईला संजीवनी मंत्र सांगितला. मुक्ताईनं जवळच्या कमंडलूतलं पाणी त्या मृतदेहांवर शिंपडलं आणि ते सगळे जिवंत झाले. चांगदेव महाराजांची तपश्चर्या संपल्यानंतर ते बाहेर आले. त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी माऊलींना पत्र लिहिलं. त्यात वयानं लहान पण ज्ञानानं महान असणार्‍या ज्ञानदेवांना आशीर्वाद लिहावा की, दंडवत लिहावं हे न सुचून त्यांनी माऊलींना कोरंच पत्र पाठवलं. मुक्ताईनं माऊलींना त्याला उत्तर लिहायला सांगितलं. त्यानुसार माऊलींनी ६५ ओव्यांचं लिहिलेलं ते पत्र म्हणजेच चांगदेव पासष्टी. पण या ओव्यांचा अर्थ चांगदेवांना समजला नाही. मग चांगदेव वाघावर बसून, हातामध्ये सापाचा आसूड घेऊन आळंदीला माऊलींच्या भेटीला आले. माऊली आणि इतर भावंडं निर्जीव भिंत चालवत चांगदेवांना सामोरे गेले. गर्वहरण झालेल्या चांगदेवांनी मुक्ताईला गुरू मानलं. त्यावेळी मुक्ताई केवळ १० वर्षांची होती. या लहानग्या मुक्ताईनं चांगदेवाला त्या ६५ ओव्यांचा अर्थ समजावून सांगितला, असं बांगर यांनी सविस्तर सांगितलं.

बांगर यांचा निरोप घेऊन आम्ही रस्त्यानं जाताना नंदाबाई साठे भेटल्या. त्या म्हणाल्या सात-आठ वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला. नागपंचमीला गावात हरिनाम सप्ताह सुरू होतो. याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी चांगदेव महाराजांच्या जयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. समोरच बसलेला आत्माराम सोनसळे म्हणाला, चांगदेव महाराजांचा जन्म आडाच्या वाड्यात झाल्याचं सांगितलं जातं. मग त्याच्या सोबत आम्ही आडाच्या वाड्याकडं गेलो. जुन्या वाड्यांची पेठ न्याहाळत जाताना दोन-तीन वळणांनंतर एका घरासमोर थांबून आत्माराम म्हणाला, हा आडाचा वाडा. समोरच्या चौथर्‍यावर जाऊन पाहिलं तर दोन बाय दोनचा मोठा चौकानी आड दिसला.

हे सगळं पाहताना जाणवत होतं, संत विसोबा खेचर असो, योगी चांगदेव असो वा त्यांना मार्ग दाखविणार्‍या आद्ययोगी मुक्ताई आणि ज्ञानदेवांची लाडकी बहीण मुक्ताई असो. या सार्‍यांनी, त्यांच्या मानवतेच्या विचारधारांनी आपल्या जगण्याच्या वाटा उजळवून ठेवल्या आहेत. म्हणून तर या आधुनिक युगातही खेड्यापाड्यांनी, भोळ्याभाबड्या आयाबायांनी त्यांच्या पाऊलखुणा जपून ठेवल्या आहेत.

मोढा आणि फुर्मोल

आळंदी आणि जुन्नर, नगर परिसरात विशेषतः गावाच्या सीमेवर मुक्ताईची पुरातन मंदिरं दिसतात. ही मंदिरं ज्ञानदेवांची बहीण संत मुक्ताबाईंची नसावीत. कारण वारकरी संप्रदायाची भजन, कीर्तनं तिथं होताना दिसत नाहीत. रोजच्या पूजेअर्चेसोबतच आषाढ-श्रावणात या मुक्ताईच्या मंदिरात महिलांची मोठी गर्दी होते. महिला खणा-नारळानं ओटी भरतात. देवीला महिला रोजच्या स्वयंपाकात जे तेल, मीठ, मिरच्या, पीठ वापरतात, त्याचा नैवेद्य दाखवतात. शिवाय मंगळवारी अर्थात मोढ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवद्य करतात. यशिवाय ज्या नाथपंथाची विचारधारा नवनाथांनी सर्वत्र रुजवली त्या नाथांची मंदिरंही मुक्ताई मंदिरासोबतच गावोगावी दिसतात. विशेषतः भैरवनाथ आणि धर्मनाथाची मंदिरं प्रत्येक गावी आहेत. गावांमध्ये ग्रामदैवत भैरवनाथाचे यात्रा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतात. तर माघ शुद्ध द्वितीयेला होणार्‍या धर्मनाथाच्या उत्सवात ज्वारी-बाजरी-चपाती-तूप-गूळ-हरभरा घुगर्‍या यांच्या मिश्रणाचा ‘फुर्मोल’ आणि ज्वारी किंवा तांदळाची आंबील हा प्रसाद घरोघरी मोठ्या भक्तीभावानं खाल्ला जातो. गव्हाच्या पिठांच्या दिव्यानं ओवाळत ‘ठम पाजळण्याचा’ विधी होतो. श्रावणात घरोघरी नवनाथांची पोथी वाचली जाते. वेशीवर असणार्‍या मुक्ताई, धर्मनाथाला संकटापासून वाचवण्यासाठी साकडं घातलं जातं. मानवधर्म सांगणार्‍या या दैवतांवर आणखी प्रकाश पडणं गरजेचं आहे.

0 Shares
इंद्रायणी काठी विसोबा चाटी गुरूंच्या गुरूंचं गाव