कच्च्या मडक्याची कच्ची कहाणी

नंदन रहाणे

संत नामदेव हे स्वतंत्र प्रज्ञेचे महापुरुष होते. बालपणापासूनच त्यांनी मोठा अधिकार स्वतः कमावला होता. त्यांना अहंकारी ठरवून त्यांचं मडकं कच्चं ठरवणं हा त्यांचा अपमान आहे. तीच कथा विसोबांचाही अपमान करते.

भूतकाळाचं तीव्र आकर्षण आणि आपली पाळंमुळं धरून राहण्याची अनावर ओढ हे भारतीय लोकमानसाचं वैशिष्ट्य आहे. आपलं कुटुंब, आपली वंशावळ, आपलं कुलदैवत याविषयी हिंदू घराणी अतिशय जागरूक असतात. नाशिक, त्र्यंबकेश्‍वर सारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर तिथल्या उपाध्यायांकडे जाऊन कुळातल्या प्रत्येकाची नोंद आवर्जून करण्याचा प्रघातही भारतात आढळतो. कौटुंबिक इतिहासाबाबत अतिशय सजग असलेले आपण भारतीय सामाजिक इतिहासाची मात्र अक्षम्य हेळसांड करीत आलेले आहोत. आपला शास्त्रशुद्ध इतिहास कोणीही लिहून ठेवलेला नाही. जनसमूहांचं वैविध्य, त्यांची स्थलांतरं, इतरांशी झालेले त्यांचे संघर्ष, विविध राजवटींचे उदयास्त, देवसंकल्पनांचं उन्नयन, पंथसंप्रदायाचं उत्कर्ष अपकर्ष, जातीपातींची जडणघडण याविषयीची विश्‍वासार्ह माहिती आपल्याकडे पहिल्या फेरीत उपलब्ध होतच नाही. महिमामंडनासाठी केलेली अतिशयोक्ती आणि दैवतीकरणासाठीची पक्षपाती भूमिका यामुळे सगळा इतिहास बाधित झालेला आहे. साचेबद्धता, सांकेतिकता यामुळं स्थळ, काळ, व्यक्ती, हेतू यांचं भान सुटल्याचं तर सतत जाणवत राहातं. वंश, वर्ण, पंथ यांच्या एकांतिक अभिमानातून होणारा श्रेयापहार ठायीठायी दिसून येतो.

संशोधक जेव्हा ध्यास घेऊन एखाद्या गोष्टीमागील सत्याचा उलगडा परिश्रमपूर्वक करतो तेव्हाच मूळ इतिहासाचं दर्शन घडू शकतं; पण त्याचाही स्वीकार समाज मनमोकळेपणानं करील याची शाश्‍वती नाही. उलट भावना दुखावल्याचं कारण सांगून बखेडे माजवण्याची प्रवृत्तीच वाढीला लागल्याचं अनुभवाला येतं. यात पंथाभिमानी, विकारग्रस्त मंडळी नेहमीच आघाडीवर असतात. असा विरोध प्रखरपणे केला जातो. कारण संशोधनातून जो सत्य इतिहास पुढे येतो तो असत्याच्या मक्तेदाराचे भांडवल हिरावून घेणारा असतो. त्या भांडवलावरच त्यांच्या वंश, वर्ण, पंथाच्या अभिमानाचा आणि हितसंबधांचा डोलारा उभा केलेला असतो त्यालाच धक्का बसून तो कोसळणं त्यांच्यापैकी कुणालाच परवडणारं नसतं. म्हणून ‘विरोध’ किंवा त्याहूनही प्रभावी मार्ग म्हणजे ‘उपेक्षा’ या अस्त्रांचा वापर केला जातो. वारकरी संप्रदायातलं संत नामदेवांचं कार्य, त्यांचं स्थान, त्यांचं महानायकत्व, त्यांच्या चळवळीची व्यापकता, तिच्यामागील नामदेवांचं क्रांतदर्शित्व या बाबतीत याच ‘उपेक्षा’ नामक जालीम विध्वंसक अस्त्राचा उपयोग सातत्यानं होत आला आहे.

परिणामी, नामदेव महाराष्ट्रात केवळ एक भोळाभाबडा संत म्हणून शिल्लक ठेवला गेला. असा संत, ज्याला देव केवळ नशिबानंच प्रसन्न झाला. त्यामुळं तो अतिशय अहंकारी बनला. साहजिकच त्याला माणसांचं मोठेपण समजेना. मग त्यासाठी त्याला गुरू करणं अत्यावश्यक ठरलं. या गुरूनं त्याला उपदेश दिल्यावरच त्याला संतपण आलं. या सार्‍याला निमित्तकारण ठरल्या त्या ज्ञानेश्‍वरभगिनी मुक्ताबाई. त्यांच्या परखडपणामुळे नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वातलं उणेपण सर्वांच्याच लक्षात आलं. विसोबा खेचरांचा गुरू म्हणून स्वीकार केल्यावर ते न्यूनत्व दूरही झालं.

प्रवचन-कीर्तनात हा सर्व भाग अतिशय घोळवून सांगितला जातो आणि नामदेवाचं मडकं कच्चं कसं ठरलं, कशाने ठरलं ते अतिशय रस घेऊन ऐकलं जातं. ज्या भक्तभागवतानं आपलं अवघं आयुष्यच पणाला लावून सर्वसामान्य माणसाला भक्तीचा अधिकार मिळवून दिला. त्यासाठी लोकभाषा, लोकधारी यांचाच अंगीकार केला आणि प्रखर विरोधाला तोंड देत संघर्ष न माजवता, सौम्यपणे, युक्तीबुद्धीनं समता आणि सहिष्णूता यावर आधारलेला वारकरी संप्रदाय साकार केला. त्याला इतका लहान करून आपण अशोभनीय कृतघ्नतेचं असंस्कृत प्रदर्शन करत आहोत, याचीही जाणीव कोणाला नाही. कारण त्याच्याभोवती अपप्रचाराचा व्यूहच तसा उभा करून ठेवला गेला आहे! तो व्यूह टिकणारा आहे की नाही हे तपासण्याची तसदीही कोणी घेत नाही. नामदेव अहंकारी होते काय? त्यांचं डोकं तपासण्याचा प्रसंग घडला काय? त्यांचं मडकं खरंच कच्चं ठरलं काय? त्यांचे गुरू विसोबा खेचर असू शकतील काय? विसोबा नेमके कोण होते? त्यांचा आध्यात्मिक अधिकार काय? या प्रश्‍नांचा उलगडा केल्यास सत्य इतिहास समोर येईल. तो स्वीकारण्याची तयारी दाखवल्यास, वारकरी संप्रदायाची महत्ता आणखी वाढणार आहे, हे चाकोरीतच फिरणार्‍या भाविकांनी समजावून घेतलं पाहिजे.

ज्ञानेश्‍वर माऊली आणि भावंडांचं प्रतिमावर्धन आणि दैवतीकरण चरमसीमेवरती नेऊन ठेवण्यासाठी नामदेवांना आणि विसोबांनाही फटका देण्याचा हा उपद्व्याप कसा केला गेला त्याचा धांडोळा घेणं गरजेचं आहे. त्यासाठी नामदेवांची अभंगगाथा हे महत्त्वाचं साधन आपल्याला उपलब्ध आहे. केवळ नामदेवांच्या अभंगगाथेमुळंच आपल्याला त्यांचं जीवनचरित्र आणि ज्ञानदेवादिकांची विलक्षण जन्मकहाणी समजू शकते आहे. अन्य एकाही संतानं नामदेवांइतकं इतिहासभान दाखवलेलं नाही. नेमक्या याच गोष्टीचा लाभ षड्यंत्रवादी मंडळींनी घेऊन, त्यांना लहान करून ठेवलं आहे.

आज आपल्याला उपलब्ध असणारी नामदेव गाथासुद्धा शुद्ध नाहीच. कारण, नामदेवांच्या अभंगांत इतरांच्याही अभंगांची खूपच भेसळ झालेली आहे. विष्णुदासा नामा, नामा यशवंत, नामा शिंपी, नामा पाठक यांच्या रचना त्या गाथेत घुसडलेल्या आहेत. शिवाय त्यांची नाममुद्रा लावून पदरचे अभंग भेसळणारे काही महाभागही निश्‍चितच असतील. भरपूर हीन मिसळलेली, कमी कसाची नामदेवगाथा आपल्यासमोर आहे, त्याला इलाज नाही. पण तर्क, विवेक आणि संवेदना यांचा उचित उपयोग केल्यास बरंच काही हाताशी लागतं.

महाराष्ट्र शासन प्रकाशित नामदेवगाथेत ‘श्रीनामदेवचरित्र’ हा विभाग आहे. तो १२३२व्या अभंगानं सुरू होतो. १३१४ क्रमांकाच्या अभंगापर्यंत नामदेव, दामाशेटी, गोणाई, राजाई, स्वतः विठ्ठल ही पात्रं त्यात वावरताना दिसतात. कुठेही आळंदीच्या या अनाथ लेकरांचा पुसटसा उल्लेखही येत नाही. मग एकदम अचानक १३१५व्या अभंगात, नामदेव त्या सर्वांना भेटायला आळंदीला गेल्याचा कथाभाग सुरू होतो. त्याआधी त्याची कसलीही पार्श्‍वभूमी सांगितलेली नाही. नामदेवांनी ज्ञानदेवादिकांचं नाव, कार्य, कीर्ती ऐकली, त्यांना वेध लागला आणि ते पंढरपूरहून आळंदीला गेले हे काहीही येत नाही. एकदम निवृत्तिनाथ उठतात आणि नामदेवांना प्रदक्षिणा घालून चरण वंदन करतात. १३१६मध्ये ज्ञानदेव, १३१७मध्ये सोपानदेवही पाया पडताना दिसतात. मात्र, १३१८ या अभंगात मुक्ताबाई नामदेवांची जी झाडणी सुरू करते ती १३२७व्या अभंगापर्यंत. यात तिनं नामदेव अहंकारी असल्याचा आरोप करून, नमस्कार करायला चक्क नकार दिलेला आहे. बिघडलेल्या नामदेवाला सुधारण्यासाठी, मडके तपासण्याचा घाट घातला जातो. त्यासाठी गोरोबांना बोलावणं होतं. १३३३व्या अभंगात नामदेव थापटण्याच्या आघातानं कळवळतात आणि त्यांचं मडकं कच्चं असल्याचं आपोआप सिद्ध होतं. मग देव आणि नामदेवात बरीच भवतीनभवती होऊन १३४८व्या अभंगात देव त्याला विसोबा खेचरांचं नाव सुचवतो. पुढे आवंढ्याचा गुरुबोधाचा चमत्कार सुरू होतो. मग उपदेशाचे विसोबाकृत प्रतिपादन आणि नामदेवाची कृतार्थतेची भावना हे सारं प्रकरण १३७८व्या अभंगापर्यंत चालतं.

अभंग क्र. १३१५ ते १३७८ यातील मांडणीच संशयास्पद आहे. सुरुवातीला शेंडाबुडखा नसताना एकदम निवृत्तिनाथ येतात. थेट प्रसंगच सुरू झाल्याचं दिसतं. जे नामदेव पंढरपूरहून निघून या प्रतिभावंत भावंडांना भेटण्यासाठी थेट आळंदीला जातात ते अहंकारी असतील हे संभवू शकेल काय? त्यांचा हा दोष वयानं, ज्ञानानं, अधिकारानं मोठ्या असलेल्या तिन्ही भावांना उमजला नाही हे तरी पटतं का? ही घटना १२९१ साली घडली असं जुळवता येतं, तेव्हा मुक्ताबाई १२ वर्षांच्या आहेत तर नामदेव २१ वर्षांचे आहेत. मग आक्रमकतेचा आणि उद्धटपणाचा आरोप मुक्ताबाईंवरच करता येणार नाही काय? हे दोन्ही दुर्गुण तर अहंकारातूनच येतात ना? मग अहंकारी कोण ठरतं? भेटीसाठी जो दूरवरून आपणहून आला, तो नामा पंढरीचा प्रेमा होता हे निवृत्तिदेवांना ठाऊक होतं. प्रेमळपणा हेच नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्य वैशिष्ट्य आहे, प्रेमळ माणूस अहंकारी असतो काय? अहंकारी माणसाची ख्याती कधीतरी प्रेमळ अशी होऊ शकते काय? नामदेवांशी संबंध आलेल्या अन्य कोणीही त्यांच्यावर अहंकारी असल्याचा आरोप त्याआधी वा नंतरही कधी केला काय? सामान्य कथेकरी असलेल्या गर्विष्ठ परिसा भागवताला, तो ब्राह्मण म्हणून जे नामदेव मान देताना दिसतात, ते या अलौकिक प्रज्ञावान भावंडांपुढं आपल्या अहंकाराचं प्रदर्शन करतील काय? तेही त्यांच्या गावी जाऊन? त्यांची काय एकमेकांशी स्पर्धा होती की वैमनस्य होतं? नामदेव बालपणापासूनच लाघवी, निरामय, प्रेमळ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे तर लोभावून देव त्यांचा मित्र झाला. याच प्रकरणात एक अभंग आहे. तो त्रयस्थाची भूमिका घेऊन नामदेवांनी लिहिलाय. त्यात स्वतःची भावावस्था वर्णन करताना ते म्हणतात…

केशवाचे नाम्या लागलेसे ध्यान| देखे त्रिभुवना| तदाकार॥
जया तया म्हणे माझा चक्रपाणी| जाय लोटांगणी| सर्व भावे॥
प्रेम वोथरत नामाचेनि छंदे| हृदय प्रेमानंद| वोसंडत॥
धावूनी येऊनी चरणाजवळी| वंदी पायधूळी| सर्व भावे॥
घनःश्याम मूर्ती सुंदर सावळी| ध्यान हृदयकमळी| नित्य राहे॥
भाग्यवंत नामा भक्तां शिरोमणी| अखंड उन्मनी| भोगितसे॥

भेटणार्‍या प्रत्येकात कृष्णरूप पाहून लोटांगण घालणारे नामदेव उन्मनी अवस्थेत प्रेमानंद भोगत असत. आळंदीच्या या दैवी तेजानं विलसणार्‍या भावंडांना पाहून, मूळचे उन्मनी नामदेव थेट समाधीसुखातच तल्लीन झाले आणि सर्व औपचारिक बाबी विसरले असं म्हटलं तर ते अनाठायी ठरेल काय? मुक्ताबाईला जे नामदेव अहंकारी भासले, त्यांनी तर माळावरच्या दगडधोंड्यांनाही पांघरुणं घातली होती, ते अहंकारामुळं की अतिसंवेदनशीलतेमुळं? मग अशा या नामदेवरायांवर अहंकाराचा आरोप काय म्हणून? कारण मुळात ही घटनाच उपरी आहे. आपला जन्मश्रेष्ठत्वाचा अहंकार कुरवाळण्यासाठी, नंतर कोणीतरी ज्ञानेश्‍वर दैवतीकरणाच्या निमित्तानं नामदेवांचं स्वयंभू थोरपण छाटण्यासाठी ही घालघुसड केली आहे.

मडक्यांची तपासणी करायचं निश्‍चित झालं ते मुक्ताईंच्या सांगण्यामुळं हा भाग १३२६व्या आणि १३२७व्या अभंगात येतो. त्याच गोरोबांना बोलावणं धाडायला सांगतात.

नामदेवांना थापटण्यासाठी संत गोरा कुंभारांचं येणंही पटणारं नाही. कारण ही घटना आळंदीत घडते तर गोरा कुंभार तेरला आहेत. दोन्ही गावं खूप लांब आहेत. शिवाय ज्ञानदेवांना पाहण्या-भेटण्यासाठी ते नामदेवांच्या बरोबर आल्याचीही नोंद नाही. ते लगोलग नंतर आल्याचंदेखील दिसत नाही. वस्तुस्थिती अशी आहे, की नामदेवच त्यांचे मित्र, वाटाडे, तत्त्वदर्शी आहेत. त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाला नामदेवरायांनीच पैलू पाडले आहेत. त्या विषयीची कृतज्ञता त्यांच्या अनेक अभंगांमध्ये प्रकटही झालेली दिसून येते. त्यापैकी ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’ ही रचना आधुनिक काळात आकाशवाणीवर गाजलेलीही आहे. पण गोरोबांची नामदेवांसंदर्भातली एक ओळ पारच महत्त्वाची आहे. ‘म्हणजे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा| प्रत्यक्ष नामदेवा| भेटलासी’. नामदेवांनी जी उंची गाठली ती स्वतःच्या अनुभवाच्या बळावर, असं गोरोबांचं प्रतिपादन आहे. एखादा शास्त्रज्ञ एकदम वेगळी दिशा पकडून शून्यापासून सुरुवात करतो, विविध प्रयोग करत करत, चुकत माकत पण चिवटपणे संपूर्ण नव्या क्षेत्रातलं यश केवळ स्वानुभवाच्या बळावर मिळवतो तसं नामदेवांचं कर्तृत्व आहे, असं गोरोबाकाकांचं म्हणणं आहे. ते खरंच बोलत आहेत. कारण ते नामदेवांचे अंतरंग मित्र आहेत. नामदेवांच्या संतमंडळातले सहकारी आहेत. तिथं कोणी गुरू नाही की शिष्य नाही, उच्च नाही की नीच नाही. नामदेवांनी तिथं कसलं अवडंबरच येऊ दिलेलं नाही. ते अवडंबर ज्यांच्या मनी ध्यानी सतत आहे त्यांनीच, ज्ञानदेवांचं दैवतीकरण करण्याच्या अट्टहासापायी मुक्ताबाईंना या गुरुबाजीच्या प्रकरणात राबवलं आहे. त्यासाठी जे कुभांड उभारलं ते खूपच ढिसाळ आहे. पण त्याचा मारा इतक्या वेगानं आणि सातत्यानं होत राहिला आहे, की तेच सत्य असल्याचा भ्रम वास्तव म्हणून प्रस्थापित झाला आहे.

ही कथा पटणारी नसली तरी विसोबा हेच नामदेवरायांचे गुरू आहेत. दोघांची भेट औंढ्या नागनाथाला झाली हा शेवटचा भागच तेव्हढा खरा आहे. मांडे भाजण्याची कथा रचून विसोबांनाही विनाकारण खाली दाखवण्याचा प्रकार झालाय. विसोबा एकतर औंढ्या किंवा पैठणजवळच्या मुंगी गावात राहणारे आहेत. ते कापड विकणारे चाटी आहेत किंवा सराफ-सावकार आहेत. मराठवाड्यातले व्यापारी विसोबा थेट ज्ञानेश्‍वरांना त्रास द्यायला आळंदीला कशासाठी येतील? ते आले आणि स्थायिक झाले असं गृहीत धरलं तरी एक प्रतिष्ठित सराफ, सावकार किंवा कापड व्यापारी आपला धंदा सोडून या लहान लेकरांवर काट कशाला धरील? स्वतःच्या दुकानातून उठून त्यांच्या दैनंदिन हालचालींवर पाळत तरी किती ठेवील? ज्ञानदेवांना मांडा खाण्याची इच्छा झालीय की, थेट कुंभारवाड्यातच जाऊन कुंभाराला तंबी देऊ, असे पोरकट उद्योग स्वतःच कशाला करील? त्यांच्या झोपडीत चोरून वाकून पाहील हे कुणाला तरी पटेल काय? पण तेच तर महाराष्ट्राच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न सतत चालला आहे. कुठलाही सामान्य भाविक हीच कथा सांगून मग ते ज्ञानदेवांना शरण गेल्याचं आणि सोपनादेवांचे शिष्य झाल्याचं अवश्य सांगेल.

नामदेवांचं स्वयंप्रभ, स्वयंप्रज्ञ व्यक्तिमत्त्व झाकोळून टाकण्याचा जसा प्रयत्न केला गेला आहे. तसाच डाव विसोबांबाबतही खेळला गेला आहे. या गुरू-शिष्यांना डांबून बसवण्यासाठी जाणीवपूर्वक छोट्या चौकटी तयार करून त्यात त्यांना कोंबायचे निर्दयी प्रयत्न झालेत. नामदेवांचे गुरू विसोबा, विसोबांचे गुरू सोपानदेव, सोपानदेवांचे गुरू निवृत्तिनाथ. मात्र निवृत्तिनाथ आपल्या अभंगांमधून, शिष्याच्या शिष्याविषयी म्हणजेच  नामदेवांविषयी मैत्रीपूर्ण कौतुकोद्गार काढताना दिसतात. हे गुरू-शिष्यांच्या चिरेबंदी परंपरेत संभवते काय? गुरू हा ब्राह्मणच असला पाहिजे, हा आग्रह चालवण्याकरता विसोबा खेचरांची जातच बदलण्याचा उद्योगही करण्यात आला आहे. साधू-संतांची जातपात पाहू नये असं शहाजोगपणे सांगणारेच, ही असली कुटिल कारस्थानं करण्यात आघाडीवर असतात.

विसोबा खेचर हे पांचाळ जातीतील होते आणि पांचाळांचे आचार्य होते, असं रा. चिं. ढेरे यांनी सिद्ध केलं आहे. इतकंच नव्हे तर या पाचही कौशल्यांचे धनी असलेल्या ११०० शिष्यांचे आचार्य होते. ते शिवब्राह्मण होते म्हणजेच वैदिकांच्या शाखांशी त्यांचा संबंध नव्हता तर ते शिवागमाच्या ज्ञानपरंपरेतील श्रद्धेय, परमज्ञानी महापुरुष होते. स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचे नामदेव खाली खेचण्यासाठी खोटा प्रसंग उभा करायचा. त्यांचे महाप्रज्ञावान गुरू विसोबा यांचंही अस्तित्व बदलून टाकायचं असा हा कुटिल व्यूह आहे. विसोबांच्या परात्परगुरू योगिनी मुक्ताबाई आणि ज्ञानेश्‍वर भगिनी मुक्ताबाई यांचं नामसाधर्म्य पाहून तो तडीलाही नेण्यात आला. पुन्हा हा सर्व खेळ करणारे नेहमीप्रमाणे नामानिराळे राहिले ते राहिलेच.

मडकं तपासण्याच्या कथेत नामदेव आळंदीवरून धावतपळत पंढरपूरला येतात आणि पांडुरंगाला आपला अनुभव कळवळून सांगतात. त्यांचं ‘उठाउठी येणं’ जणू काय आळंदीवरून पुण्याला येण्यासारखं वर्णिलं आहे. त्यात ते भावंडांचं वर्णन तक्रारीच्या सुरात करताना त्यांच्या दारिद्य्राचाही उल्लेख करतात. जणू काय नामदेव स्वतः धनाढ्यच होते. त्यांनी अगदी बालपणापासून आपल्या कीर्तनात सर्वांना सहभागी करून घेतलं आहे. वर्ण, वंश, जात, पात, धंदा, धन यावरून भेदाभेद करणं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हतं, तरीही ही चालबाजी पिढ्यान्पिढ्या खपून गेली आहे.

मग विठ्ठलानं त्यांची काढलेली समजूत १३४५, १३४६ या अभंगात  आहे. १३४५ क्रमांकाचा अभंग तब्बल ६२ चरणांचा आहे आणि त्याचा थाट अगदी नमुनेदार हरिदासी वळणाचा आहे. तो बनावट आहे हे प्रथमवाचनीच समजून येतं. मग १३४८ या अभंगात स्वतः पांडुरंगच नामदेवाला विसोबांचं नाव सांगून औंढ्याला नागनाथाच्या दिशेचा संकेत करतात. विसोबा कलानिपुण, सृजनशील पांचाळ ज्ञातीसमूहाचे आचार्य होते. ११०० शिष्यांच्या गुरुकुलाचे प्रमुख होते. त्यांच्यापेक्षा अन्य कुणीही नामदेवांचा गुरू शोभलाच नसता. ही योजना स्वतः पांडुरंगानं केल्याचं त्या अभंगमालिकेत दिसतं आहे हे अत्यंत उचित आणि परमसत्य होय.

देव आणि नामदेव यांच्यात अद्वैत नाहीच. नामदेवांचं प्रत्येक कार्य हे जगावेगळं आणि त्याच्यापासूनच सुरू होणारं असं अभूतपूर्व होतं. त्या मागे देवाचं पाठबळ उभे राही त्याचाही अन्वयार्थ हाच आहे. या गुरुशोध प्रकरणातही असंच म्हणता येईल. आपल्या विचारविश्‍वात खळबळ माजल्यानंतर अस्वस्थ नामदेव मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःच अंतःस्फूर्तीनं विसोबा खेचरांकडे गेले.

विसोबा तेव्हा औंढ्या नागनाथांच्या क्षेत्री होते. नामदेवांचं जन्मगाव जे नरसीबामणी, त्याच्या जवळच हे ज्योतिर्लिंग आहे. नामदेव मंदिरात जाऊन पाहतात तो काय, एक जख्खड म्हातारा थेट पवित्र शिवलिंगावरच पाय ठेवून निवांत निजला होता. कथा म्हणून ती घटना कितीही मनोरंजक असली, तरी इथेही काही प्रश्‍न उपस्थित होतातच. औंढ्या नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचं स्थान. अनादिकाळापासून ते भारतभर प्रख्यात. तेव्हा तिथं सगळीकडच्या भाविकांची रीघ सतत लागलेली असणारच. अशा ठिकाणी स्थानिक पुजारी कोणाला गाभार्‍यात शिरून निजू देतील हेच संभवत नाही. तेही थेट शिवलिंगावर पाय ठेवून हे तर अगदी कल्पनेतही अशक्य. तिथं विसोबा खेचर घुसून निजणं आणि नामदेवांनीही ते कौतुक पाहणं तर्कसंगत ठरत नाही.

मात्र विसोबांचं अतिवृद्धपण हाच त्या कथेतला मुद्दा खरा ठरतो. ‘शिल्पशास्त्र’ या ग्रंथात समाप्तीकाळाचा जो उल्लेख रा. चिं. ढेरे यांना आढळला तो शके ११६५ असा आहे. त्याचा इसवी सन १२४३ असा येतो. यावर्षी ग्रंथकर्ता हा श्रीकृष्णनाथांचा शिष्य होता आणि ते विसोबांचे गुरू होते. त्यावेळीच विसोबा तथा विश्‍वेश्‍वर यांना ११०० शिष्यांच्या आचार्यत्वाचा सन्मान प्राप्त झालेला होता. तेव्हा त्यांचं वय किमान ४० आणि कमाल ६० धरलं तर नामदेवभेटीच्या वेळी म्हणजे १२९१ साली ते किमान ८८ ते कमाल १०८ असं असू शकेल. याचाच अर्थ नामदेवांना ते प्रथम दिसले ते जख्खड म्हातार्‍याच्या रूपात हेच तेवढं पूर्णसत्य होय.

शिवब्राह्मण असलेले, आपण स्वतः पांचाळांचं आचार्यपद भूषवित असलेले, वीरशैवांच्या ‘षट्स्थळ’ सिद्धान्तावर ग्रंथरचना करणारे महाविद्वान विसोबा खेचर, ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्री जाऊन, वर्दळीच्या मंदिरातील परमपवित्र शिवपिंडीवर पाय ठेवून निजतील हे त्यांच्या बाजूनं विचार करूनही पटत नाहीच. एवढी धाडसी कथा रचणारा, नक्कीच कुणी कट्टर वैष्णवपंथाभिमानी किंवा कट्टर मूर्तिपूजाविरोधक वेदाभिमानी असेल यात शंका नाही. स्वयंप्रज्ञ नामदेव अंतःस्फूर्तीनं परिणतप्रज्ञ, प्रतिभावान विसोबांकडे गेले हे सत्य. त्यांचा गुरू म्हणून स्वीकार केला तो औंढ्या नागनाथाच्या क्षेत्री हे देखील सत्य. बाकी सर्व फोलपट. हे निदान जाणत्यांनी तरी जाणून घ्यावं.

नामदेवांचा व्यापक जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्यभर वैशिष्ट्य राहिलं आहे. माणसांना भेटायला ते नियमितपणे उत्सुक होते. त्यातून त्यांनी विठोबाचा संप्रदाय प्रचंड वाढवला आणि सर्व स्तरांमधली, सर्व जातींमधली भक्तमंडळी संत आणि कवी म्हणून उदयाला आणली. ज्ञानदेवही त्यांचा सहवास इच्छित होते इतका त्यांचा स्वभाव माणूसलोभी जीव लावणारा होता. नामदेवांच्या समाधीनंतर ते ५४ वर्ष सतत समाजकार्य करीतच राहिले. पहिल्या तीर्थयात्रेनंतर त्यांनी पुन्हा एकट्यानं ४ वेळा प्रदीर्घ भारतयात्रा केल्या. सर्व प्रांतोप्रांती प्रचंड प्रभाव निर्माण केला. सगळीकडे जाऊन नवनवं शिकण्याची आणि शिकवण्याची हातोटी असल्याशिवाय त्यांच्या एवढं प्रचंड, कल्पनातीत कार्य होणं शक्य नाही. नामदेवराय विसोबा खेचरांकडे गेले असतील ते ‘शिवागम’ शिकण्यासाठी. नाथसंप्रदायाची विचारसृष्टी आणि वीरशैवांची मतप्रणाली जाणून घेण्यासाठी विसोबा खेचरांसारखा सुपात्र गुरू अन्य नव्हताच. तो नामदेवांनी स्वतःच हेरला आणि त्यांनी शिष्यत्व पत्करलं.

वारकरी संप्रदाय सर्वांनाच आपलासा का वाटला याचं रहस्य नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वात आणि संपर्क तंत्रात आहे. त्यांना लहान ठरवल्याशिवाय श्रेष्ठतागंडानं झपाटलेल्यांना चैन पडणं शक्य नव्हतं. त्यातूनच मडकं कच्चं ठरण्याची कथा आणि त्यांच्या गुरूंचीही जात बदलून, परमउपास्यावर पाय ठेवण्याची कथा प्रसृत केली गेली आहे. संतांचा अभिमान बाळगावा, पण संतसाहित्याकडे देखील विवेकानंच पाहावं आणि सत्य जाणून घ्यावं हाच या प्रकरणाचा धडा मानावा.

0 Shares
निगुऱ्याचा गुरू सकळाशी येथे आहे अधिकार