सकळाशी येथे आहे अधिकार

शामसुंदर सोन्नर

नामदेव महाराजांनी विसोबांना गुरू केलं, पण त्याचं अवडंबर माजवलं नाही. ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराजांनी गुरूचा महिमा गायला, पण स्वतः शिष्यवृंद तयार केला नाही. तुकोबाराय तर म्हणाले, शिष्यांचा भार करणारे गुरू हे शेपटी नसलेली कुत्रीच आहेत.

‘सकळाशी येथे आहे अधिकार| कलियुगी उद्धार हरीच्या नामे॥’ हाच वारकरी संप्रदायाच्या विचारांचा गाभा आहे. ज्ञान घेण्याचा आणि ज्ञान देण्याचा अधिकार हा सगळ्यांनाच आहे, ही विशाल दृष्टी भक्ती परंपरेत रूढ करण्याचा सर्वच वारकरी संतांनी प्रयत्न केला आहे. वारकरी संप्रदाय अनेक जाती, धर्म, पंथ आणि संप्रदायांना एकत्र घेऊन चालणारा आहे. याला संप्रदाय म्हणण्यापेक्षा चळवळ म्हणणं अधिक सुसंगत ठरू शकतं. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका निभावली. भागवत धर्माच्या इमारतीच्या उभारणीत या चार संतांचं काय योगदान आहे, याचं डॉक्युमेंटेंशन तुकारामशिष्या बहिणाबाई पाठक यांनी करून ठेवलंय,

संत कृपा झाली| इमारत फळा आली॥
ज्ञानदेवे रचिला पाया| उभारिले देवालय॥
नामा तयाचा किंकर| तेणे केला हा विस्तार॥
जनार्दन एकनाथ| खांब दिला भागवत॥
तुका झाला से कळस| भजन करा सावकाश॥
बहिणी म्हणे फडकती ध्वजा| निरूपण केले ओझा॥

या चार संतांच्या विचारधारेवर भागवत धर्माची इमारत आज सातशे वर्ष भक्कम उभी आहे. या चारही संतांचा विचार एकाच हेतूनं प्रेरित म्हणजे समताधिष्ठित आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचा असला तरी त्यांची गुरुपरंपरा आणि गुरूंचे संप्रदाय मात्र एक नाहीत. संप्रदाय एक नसल्यामुळं गुरू करण्याची आणि त्याच्याकडून ज्ञान घेण्याची पद्धतीही सारखी नाही. तरीही त्यांचा विचार मात्र एक असल्याचं आपल्याला दिसून येतं.

वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायाशी नातं सांगणारे आहेत. ज्ञानेश्वर महाराज यांनी स्वत: आपली गुरुपरंपरा एका अभंगात नोंदवली आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथांनंतर ही परंपरा गहिनीनाथ, निवृत्तिनाथ आणि ज्ञानदेव अशी आहे.

गहिनी प्रसादे निवृत्ती दातार|
ज्ञानदेवा सार चोजविले॥

नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा खरं तर एक गुरू-एक शिष्य अशी असते. परंतु ती परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर मुक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर माऊलींनी नाथ परंपरेप्रमाणं कुणालाही अनुग्रह दिल्याचा उल्लेख सापडत नाही. काही जणांनी त्यांना अनुग्रह देण्याचा आग्रह धरल्यानंतरही ते मोहात अडकले नाहीत. त्याची दोन उदाहरणं स्पष्टपणे नोंदवता येतात. एक म्हणजे चांगदेवांची ज्ञानेश्वर महाराजांशी भेट झाल्यानंतर त्यांनीही अनुग्रहित करण्याचा आग्रह धरला. पण माऊलींनी स्वत: अनुग्रह न देता ती जबाबदारी त्यांनी आपली सर्वात लहान बहीण संत मुक्ताबाई यांच्यावर सोपवल्याचं दिसतं. चांगदेवाचं गुरुपद हे मुक्ताबाईंकडे जातं. त्याचा उल्लेख चांगदेवांनी आपल्या एका अभंगामध्ये करून ठेवलेला आहे.

चांगदेव म्हणे आजी मुक्त झालो|
गुरु पुत्र झालो मुक्ताईचा॥

त्यानंतर विसोबा खेचर यांनीही ज्ञानेश्वर माऊलींकडे अनुग्रहासाठी आग्रह धरला. मात्र त्यांनी ती जबाबदारी आपले लहान बंधू सोपान महाराज यांच्यावर सोपवल्याचं दिसून येतं. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाला अनुग्रह दिला नाही. तरी ज्ञानेश्वर महाराजांना गुरू मानणार्‍यांची संख्या मात्र खूप मोठी आहे. जवळपास सर्वच संतांनी ज्ञानेश्वर महाराजांची महती गायलीय. अनेकांनी त्यांचा गुरू असा उल्लेख केलाय. परंतु त्यांनी प्रत्यक्ष अनुग्रह मात्र कुणालाही दिल्याचा दाखला नाही.

वारकरी संप्रदायाचे इंजिनिअर किंवा विस्तारक म्हणून नामदेव महाराज यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची गुरुपरंपराही नाथ संप्रदायाशीच जोडलेली आहे. सोपानकाकांनी विसोबा खेचर यांना अनुग्रह दिला आणि विसोबांनी तो नामदेवांपर्यंत पोचवला. त्यामुळं नामदेव महाराज यांची परंपराही नाथ संप्रदायाशी जोडलेली आहे. परंतु नामदेव महाराजांच्या साहित्यात नाथपंथीय परंपरेचा कुठेही डांगोरा पिटल्याचं दिसत नाही. वारकरी संप्रदायाच्या नित्यनेमामध्ये हरिपाठात म्हटल्या जाणार्‍या गुरुपरंपरेच्या अभंगांत नामदेव महाराजांचा एकही अभंग नाही. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार करताना गुरू नावाच्या संस्थानाला पहिला सुरुंग लावला.

व्यक्तीपेक्षा विचार जास्त महत्त्वाचा आहे. गुरुसंस्थेमध्ये व्यक्तिपूजेला महत्त्व येतं. व्यक्तिपूजक व्यवस्था निर्माण झाली की ती शोषणाला जन्म देते. वारकरी संप्रदायाच्या अगोदर गुरुगृही राहून अध्ययन करण्याची परंपरा होती. गुरूकडून ज्ञान मिळवल्यानंतर गुरूला गुरुदक्षिणा द्यावी लागत होती. व्यक्तिपूजेची चटक लागलेले गुरू ज्ञान देताना सर्वांना सरसकट देत नव्हते. ते व्यक्ती पाहून ज्ञान देत. एखाद्या गुरूकडे कितीही शिकायची इच्छा असली, तरी गुरू त्याची जात, त्याचा वर्ण पाहून विद्या देत असे. अनेकांनी गुरूकडे असलेलं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षपाती गुरूंनी प्राप्त झालेली विद्या शिष्याला वापरता येणार नाही, अशी व्यवस्था केल्याची उदाहरणं सापडतात. आपल्याकडे सर्वांच्या मनात सलत असणारं एकलव्याचं ढळढळीत उदाहरण आहे. महाभारतातील तो एक कायम मनाला बोचणी देणारा प्रसंग आहे. एकलव्यानं द्रोणाचार्यांकडे विद्या देण्याची विनंती केली. तो केवळ क्षत्रिय नाही, राजपुत्र नाही म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला विद्या दिली नाही. एकलव्यानं निष्ठेनं द्रोणाचार्यांचा पुतळा करून विद्या आत्मसात केली. हे द्रोणाचार्यांना समजलं तेव्हा त्यांनी धनुष्य चालवण्यासाठी अत्यावश्यक अंगठाच एकलव्याकडे कापून मागितला.

दुसरं उदाहरण महाभारतातलंच आहे. कर्ण अत्यंत पराक्रमी होता. त्याला ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा होती. म्हणून त्यानं परशुरामांकडून विद्या प्राप्त केली. परंतु परशुरामांनी त्यालाही शाप दिला, त्यानं प्राप्त केलेली विद्या त्याला मोक्याच्या वेळेला आठवणार नाही. याचा अर्थ व्यक्तीची जात पाहूनच ज्ञान दिलं जात होतं. शिष्याला त्याच्या विद्येचं श्रेय कायम आपल्या गुरूला द्यावं लागे. नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांना गुरू केलं असलं तरी त्याचं मोठं अवडंबर माजवल्याचं मात्र दिसत नाही. कदाचित हे विसोबा खेचर यांनी दिलेल्या ज्ञानातच ते असलं पाहिजे. विसोबा खेचर यांच्या भेटीच्या प्रसंगातच भगवंत चराचरात भरलेला आहे, हा विचार नामदेवांच्या मनावर कोरण्यात आला होता.

विसोबांचे पाय जिथं होते, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना महादेवाची पिंड दिसली. यातून दोन गोष्टींचा बोध झाला. एक म्हणजे शिव आणि विष्णू वेगळे नाहीत. त्यामुळं हरी आणि हर या वादात अडकण्याची गरज नाही. दुसरं म्हणजे भगवंत सर्व ठिकाणी आहे. विसोबांच्या एका कृतीतून कुत्र्यामध्ये सुद्धा देव पाहण्याची दृष्टी नामदेवांच्या मनावर बिंबवली गेली. त्यामुळं सर्व जगच भगवंताचं आहे, तर गुरूचा टेंभा मिरवत बसण्याची गरज काय, असा वारकरी संतांचा शिष्याशी वागतानाचा भाव होता.

ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूचा महिमा मोठ्या प्रमाणात गायलाय. ते स्वत: मात्र गुरूच्या भूमिकेत वावरल्याचं पाहायला मिळालं नाही. तीच वृत्ती त्यांच्या परंपरेतील पुढच्या प्रत्येकामध्ये दिसते. नामदेवांनी व्यक्तीपेक्षा विचारांना जास्त महत्त्व दिल्याचं दिसतं. त्यांच्या पंजाबमधील वास्तव्यात त्यांनी हा विचार अधिक भक्कम केला असावा. म्हणून नामदेवांच्या नंतर तिथं निर्माण झालेल्या शीख पंथामध्ये व्यक्तीला गुरू मानण्याच्या पुढे जात विचाराला गुरू मानलेलं आहे. शीख संप्रदायानं वेगवेगळ्या संतांचे विचार देणारं साहित्य एकत्र करून त्याचा ग्रंथ आपला गुरू म्हणून मानला. त्या ग्रंथांत नामदेव महाराजांच्या पदांचा समावेश आहे. गुरु ग्रंथसाहिब या क्रांतिकारक कल्पनेची बीजं नामदेव महाराजांच्या विचारांतच आढळतात.

वारकरी संप्रदाय भक्कम करण्यामध्ये एकनाथ महाराजांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्यांचा गौरव भागवत धर्माच्या इमारतीचे खांब म्हणून केला जातो. एकनाथ महाराजांची गुरुपरंपरा दत्त संप्रदायाशी जोडलेली आहे. दत्त संप्रदायामध्येही गुरूचं स्थान फार महत्त्वाचं आहे. एकनाथ महाराज त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडे विद्याभ्यासासाठी गेले होते. केवळ आध्यात्मिक नाही, तर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांचंही शिक्षण त्यांनी घेतलं. जनार्दन स्वामींचा एकनाथ महाराजांवर खूप मोठा प्रभाव होता. म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या सर्व साहित्यनिर्मितीत नाममुद्रा म्हणजे लेखकाचं नाव म्हणून एका जनार्दनी असा उल्लेख केलाय. स्वत: एकनाथ महाराजांनी गुरूबद्दलची आस्था मोठ्या प्रमाणात जपली. तरी आपला शिष्यवृंद वाढावा, त्याच्याकडून आपला गौरव करून घ्यावा, असं एकनाथ महाराजांनी कुठे केलं नाही. त्यांच्या गावबा या एकमेव शिष्याचा उल्लेख सापडतो.

वारकरी संप्रदायाचा कळस असणार्‍या तुकाराम महाराज यांची गुरू परंपरा ही चैतन्य संप्रदायांशी जोडणारी आहे. नाथ संप्रदाय श्रीशंकरापासून सुरू झालेला आहे, तर चैतन्य संप्रदाय महाविष्णूपासून निर्माण झालेला आहे. याबाबतची गुरू परंपरा निळोबारायांनी सांगितली आहे,

मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ|
संप्रदाय फळ येथुनिया॥
हंसारुपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी|
चतुश्लोकी चारी भागवत॥

त्यानंतर नारद, व्यास, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी, तुकाराम, निळोबाराय अशी परंपरा ते अभंगाच्या पुढच्या चरणांमध्ये सांगतात,

जगद्गुरू तुका अवतार नामयाचा|
संप्रदाय सकळाचा येथूनिया॥
निळा म्हणजे मज उपदेश केला|
संप्रदाय दिधला सकळ जणा॥

तुकाराम महाराज यांची चैतन्य संप्रदायी परंपरा असली तरी त्यांना मिळालेला अनुग्रह प्रत्यक्षातला नाही. तो स्वप्नात झाल्याचा उल्लेख महाराजांनीच केला आहे. स्वप्नातच उपदेश केलेला असल्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करावी लागली नाही, असं महाराजांनी सांगितलेलं आहे.

सत्य गुरूराये कृपा मज केली|
परी नाही घडली सेवा काही॥

वेगवेगळ्या परंपरांमध्ये अनुग्रह देण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. दत्त संप्रदायामध्ये गुरुगृही अनुग्रह मिळतो. नाथ संप्रदायात कानामध्ये मंत्र सांगून अनुग्रह देण्याची पद्धत आहे. चैतन्य संप्रदायात डोक्यावर हात ठेवून अनुग्रह दिला जातो. म्हणून तुकाराम महाराजही म्हणतात, ‘मस्तकी तो जाणा ठेविला कर.’ तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्य यांना गुरू मानलं. खरं तर भगवान पांडुरंगानंच बाबाजी चैतन्यांच्या रूपात येऊन आपल्याला हा अनुग्रह दिला, असाही विश्वास तुकाराम महाराजांना होता. त्याचा दाखला तुकाराम महाराजांच्या अन्य एका अभंगामध्ये पाहायला मिळतो.

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव|
आपणची देव होय गुरू|

साक्षात दीनांचा सोयरा पांडुरंगालाच तुकाराम महाराजांनी गुरू म्हणून मान्य केलं. गुरू करावा, गुरूनं कानात मंत्र सांगावा, शिष्यानं तो कुणालाही सांगू नये, असा दंडक तोवर घातलेला असे. मात्र तुकाराम महाराज यांना दिलेला ‘राम कृष्ण हरी’ हा वारकर्‍यांसाठी उघडा मंत्र आहे. त्यामुळं वारकर्‍यांमध्ये कानात मंत्र सांगण्याची परंपरा नाही. अगोदर कानात मंत्र सांगण्याच्या निमित्तानं जे गूढ निर्माण केलं जात होतं, ते गूढ संपवून हा मंत्र उघडा करण्यात आला. जो म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळं या मंत्राशिवाय म्हणजे भगवंतांच्या नावाशिवाय इतर कोणत्याही कर्मकांडाची आवश्यकता नाही, हा मोठा संदेश मंत्र उघडा करून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं.

गूढ मंत्र देणं, त्यातून गुरुभक्तीच्या नावाखाली शिष्यांचं शोषण करणं, याचा तुकाराम महाराजांनी अनेक अभंगांत निषेध केलाय.

एक करती गुरू गुरू|
भोवती भारू शिष्यांचा॥
पूस नाही पाय चारी|
मनुष्य परी कुतरी ती॥

अशा प्रकारे गुरू गुरू मिरवणारे, चार पाय आणि शेपूट नसणारे कुत्रे आहेत, असं महाराज म्हणतात. वारकरी संप्रदायात तीन प्रमुख भक्ती संप्रदायांचा संगम झालेला दिसतो. तरीही त्यांनी आपापली संपूर्ण वैशिष्ट्यं बाजूला ठेवून समताधिष्ठित समाज आणि शोषणमुक्त भक्तीचा पाया घातला. त्यांनी गुरू या संस्थेकडून होणारं शोषण थांबवून उघडा मंत्र दिला. हा मंत्र म्हणण्याचा कुणालाही अधिकार आहे, असा विश्वास दिला. इतर मंत्र म्हणण्याच्या वेळा चुकल्या, पद्धत चुकली तर त्यामध्ये अनिष्ट परिणामांची भीती दाखविली जाते. मात्र वारकरी संतांनी दिलेल्या भगवंतांच्या नामाच्या मंत्राला कोणत्याही काळवेळाचं बंधन ठेवलं नाही.

काळवेळ नाम उच्चारिता नाही|
दोन्ही पक्ष पाही उद्धरती॥

इतकंच नव्हे तर हा मंत्र म्हणताना साधन शुचितेची सुद्धा आवश्यकता नाही. हा मंत्र म्हणण्यासाठी आंघोळसुद्धा करण्याची गरज नाही. त्यापुढे जाऊन सांगतात तोंडसुद्धा धुवावं लागत नाही. ‘नलगे आंघोळी तोंड धुवावे|’ मंत्र उघडा झाल्यानं त्यातला गूढपणा संपून त्याचा धाक कमी झाला. यापुढं कोणत्याही गुरूनं कानातला मंत्र न देता उघडपणे द्यावा आणि तो उपदेश करीत असताना द्रोणाचार्य आणि परशुरामांप्रमाणं जात, धर्म पाहून न करता तो मेघवृष्टीनं करावा, असं तुकाराम महाराज सांगतात. ‘मेघ नाही पाहत| हाणदारी शेत॥’ पाऊस जसा शेतात, डोंगरावर, नदीवर अगदी पाणी असलेल्या समुद्रावरही पडतो. ज्याची जशी क्षमता असेल त्या प्रमाणं त्याचे परिणाम होतात. सुपीक जमीन असेल तर खूप चांगलं पीक येईल. बरड असेल तर कमी पीक येईल. कातळावर फक्त झुरपाडच वाढतील. ज्याचा जसा अधिकार असेल तसं त्याला फळ मिळेल. तसा गुरूनं उपदेश मुक्तपणे करावा. शिष्य आपल्या क्षमतेप्रमाणं ते स्वीकारतील. ज्याला जे मिळवायचं आहे ते मिळवण्याचा आणि मिळवलेलं ज्ञान सर्वांना देण्याचं स्वातंत्र्य वारकरी संतांनी बहाल केलं. सकळाशी येथे आहे अधिकार.

0 Shares
कच्च्या मडक्याची कच्ची कहाणी गुरुकृपांकित तत्त्वज्ञ