विसोबाविन औंढा रिते

चन्नवीर भद्रेश्ररमठ

अवतीभोवतीच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नसल्यानं आपण हल्ली गोंधळलेल्या मानसिकतेत वावरतो. याचं कारण आपण आपली मुळं विसरलोत. आपल्याला ज्यांनी जगण्याचं शहाणपण शिकवलं, त्यांना विसरलोत. त्यापैकीच एक विसोबा खेचर. सध्या ते त्यांच्या गावातच उपेक्षित आहेत.

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा मी एक पाईक. पत्रकाराची नोकरी सांभाळून जमेल तेवढा बसवविचारांचा प्रसार करत राहायचा असं ठरवलंय. यंदा ‘रिंगण’च्या संपादकांनी संत विसोबा खेचरांवर लिहायला सांगितलं, तेव्हा ही बसवादी शरणांचीच इच्छा आहे, असं वाटलं. नोकरीच्या धबडग्यातून सुटका करून घेत सोलापूरहून औंढ्या नागनाथाला जाण्याची तयारी सुरू केली. मला हा योगायोगही वेगळा वाटला. जेव्हा लाखो भक्त विठुरायाला भेटण्यासाठी आमच्या पंढरपूरला निघाले होते, तेव्हा मी उलट्या दिशेनं विठुरायाऐवजी त्याच्या भक्तांना भेटायला निघालो होतो. संत नामदेव आणि त्यांचे गुरू संत विसोबा खेचर जिथं एकमेकांना भेटले होते, त्या प्रसिद्ध औंढ्या नागनाथला.

‘गुगल’नुसार सोलापूर ते औंढा नागनाथ हे अंतर २९५ किलोमीटर आणि आणि प्रवासाची अपेक्षित वेळ साडेसहा तास. मी सोलापूर-कळमनुरी बसनं सलग १० तासांचा प्रवास करून एकदाचा औंढा नागनाथ बसस्थानकावर उतरलो. तेव्हा दुपारचे चार वाजले होते. मंदिर समितीच्या भक्त निवासात बॅग ठेवून विसोबांच्या भेटीसाठी निघालो. औंढा आणि नरसी या ठिकाणांना भेट देण्यासाठी दोन दिवस जाणार होते. या भटकंतीतील वाटाडे आणि औंढ्यातील पत्रकार मित्र दत्तात्रय शेगुकर घ्यायला आले होते.

देवापेक्षा भक्त आणि गुरूपेक्षा शिष्यच जास्त प्रसिद्ध असतो, असं म्हणतात. इथं शिष्याच्या वाट्यालाही काहीशी उपेक्षा आली आणि गुरूचं तर नावही घेतलं जात नाही, अशी परिस्थिती. संत विसोबा आणि संत नामदेव ही ती गुरू-शिष्याची जोडी. काळाच्या माथ्यावर पाय ठेवून उभी राहिली. उपेक्षा झाली तरी, आपल्या साहित्यातून अभंगच राहिली. मुळात नामदेवाला सोपी नामभक्ती करण्याचा सल्ला देणारे विसोबा स्वत:च एक गूढ बनून राहिले. त्यांची ती प्रसिद्ध गोष्ट आपल्याला माहिती आहे. नामदेव जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते निवांतपणे शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून पहुडले होते. नामदेवांना त्याबद्दल पराकोटीचं आश्चर्य वाटून त्यांनी त्याबद्दल विसोबांना विचारलं. तर ते म्हणाले, तूच ठेव माझे पाय उचलून बाजूला. नामदेव वृद्ध विसोबांचे पाय उचलून बाजूला ठेवू लागले तर जिथं पाय ठेवतील, तिथं पायाखाली पिंड, असा चमत्कार! नामदेव समजले आणि उमगले. या चराचरांत ‘देवाविण ठाव रिता’ नाही हे सत्य त्यांना पटलं. सगुणसाकार विठ्ठलाची भक्ती करणार्‍या नामदेवांचं मन निर्गुण निराकार परमेश्वराच्या अस्तित्वानं भरून गेलं. गुरु-शिष्य भेटीच्या त्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला निघालो होतो. वाटेत भेटेल त्याला विचारत होतो, विसोबा कोण होते?

‘विसोबा भक्ती संप्रदायातील विभूती होते, नाथपंथी सिध्दयोगी होते, स्थावर लिंगपूजेच्या विरोधात होते’.., अशी वेगवेगळी उत्तरं मिळत होती. एक उत्तर मात्र सगळ्यांकडंच होतं. ते म्हणजे, नामदेव महाराजांचा अहंकार दूर करण्यासाठी विसोबा पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. आणखीही कथा ऐकल्या.

भक्तनिवासाच्या कोपर्‍यावरच चहाची टपरी होती. तिथं टेकलो. टपरी चालवणार्‍या आजोबांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. मी त्यांना विसोबांबद्दल विचारलं. तर म्हणाले, ‘विसोबा सोनार-सावकार होते. त्यांचा सावकारीचा व्यवसाय होता. ते चोरीचा माल खरेदी करायचे. त्यांच्याकडून व्याजानं पैसे घेतलेल्या लोकांचा ते छळ करत. कोणाचीही दया माया न ठेवता ते विचित्रपणानं वागत. इतरांचा दुस्वास करत. खेकसून बोलत. त्यामुळं त्यांचं नाव खेचर पडलं. अनेक छोटे व्यावसायिक त्यांच्या सावकारीचे बळी ठरले होते. एकदा एका गरीब कुंभाराची दुरवस्था पाहून त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी सर्व संपत्ती दान करून टाकली.’

औंढ्याच्या मंदिरात विसोबा आणि नामदेव महाराजांची भेट झाल्यानंतर विसोबा अदृश्य झाले, असंही एका भाविकानं सांगितलं.

मंदिरातले चंद्रकांत स्वामी पुजारी यांनी सांगितलेली कथा अशी, विसोबा हे जंगम- स्वामी होते. त्यांचं मूळ नाव विश्वनाथ स्वामी. ते खूप विद्वान होते. त्यांनी नागनाथाला प्रसन्न करून घेतलं होतं. विश्वनाथ या नावावरूनच त्यांचं नाव विसोबा पडलं. पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती. आळंदीत मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांनी त्यांची विद्वत्ता आणि भक्तिबद्दल आदर व्यक्त केला होता. म्हणूनच नामदेव महाराजांना गुरू शोधण्यास सांगताना ज्ञानेश्वरांच्या डोळ्यासमोर विसोबांचं नाव आलं. आपल्या भक्तीमुळे नागनाथ मंदिर फिरल्याचा अहंकार नामदेवांना होता. त्यांचा तो अहंकार दूर करण्यासाठीच विसोबांनी नागनाथाच्या पिंडीवर पाय ठेवून ईश्वर सर्वत्र भरलेला असल्याचा दृष्टांत दिला.

त्यांनीच सांगितलेली दुसरी कथा पहिल्या कथेच्या एकदम विरुद्ध होती. विसोबा लिंगायत शूद्र कुळातले होते. नागनाथाचे पुजारी त्यांना मंदिरात प्रवेश देत नसत. मंदिर परिसरातून त्यांना सतत हुसकावून लावत असत. मात्र विसोबांची भक्ती निस्सीम होती. ते विरक्तीला पोहोचले होते. देवाशी संवाद साधल्यासारखे ते एकटेच बडबडत नागनाथाच्या मंदिरातल्या एका कोपर्‍यात बसून राहत असत. त्यांच्या पायाला मोठी जखम झाली होती. मंदिरात पुजारी नसल्याची संधी बघून ते गाभार्‍यात गेले; परंतु पायाच्या वेदना असह्य झाल्यानं तिथून त्यांना हलता येईना. पाय उंचावर ठेवल्यास आराम मिळेल या भावनेनं त्यांनी आपला पाय पिंडीवर ठेवला. त्यांना थोडा आराम वाटला, परंतु त्यांना तशा अवस्थेत पाहून संतापलेल्या पुजार्‍यानं त्यांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हलले नाहीत. त्याच वेळी तिथं गुरूच्या शोधात असलेल्या नामदेव महाराजांचं आगमन झालं. जखमांनी जर्जर झालेले पाय नागनाथाच्या पिंडीवर ठेवून झोपलेल्या विसोबांचा नामदेवांना खूप राग आला. विसोबांचे पाय पिंडीवरून खाली जिथं ठेवतील तिथं पिंड अवरतण्याचा दृष्टांत झाला. नामदेवांनी शरणागती पत्करून विसोबांना गुरू मानलं.

नागनाथ मंदिराजवळ उभा असताना उत्तर प्रवेशद्वार कमानीजवळ राम जन्मोत्सव सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देणारं बजरंग दलाच्या नेत्याचं होर्डिंग्ज लक्ष वेधून घेत होतं. रस्त्याच्या उजव्या बाजूला ‘दर शिवरात्रीला तिळाएवढं वाढणारं जागृत श्री नीळकंठेश्वर देवस्थान’ अशी पाटी नजरेस पडली. उत्सुकता म्हणून मंदिरात गेलो. गोसावी संप्रदायाचं हे खाजगी मंदिर. दर वर्षी शिवरात्रीला हे शिवलिंग तिळाएवढं का वाढतं, याचं उत्तर वारसदार, पुजार्‍याकडं नव्हतं.

डाव्या बाजूला ‘औंढा नागनाथ देवस्थान संचलित व्यापारी गाळे’ अशी पाटी मिरवत विविध दुकानं सजली आहेत. या दुकान गाळ्यांच्या शेवटी, पाठीमागच्या बाजूला विसोबांचं मंदिर आहे. कोणत्याही वाडी वस्तीवरील लक्ष्मी-हनुमानाचं मंदिर जेवढं छोटं असतं, तेवढं. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी या मंदिरावर एक मंडप बांधण्यात आला. त्यात दाटीवाटीनं तिसेक जण बसतील एवढी जागा. गर्भ मंदिरात शिवलिंग आहे. विठ्ठल -रखुमाईच्या मूर्ती आहेत. दुसर्‍या पिंडीवर विसोबा आणि नामदेवांची मूर्ती आहे. नागनाथांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेल्या विसोबांच्या समोर नामदेव महाराज हात जोडून उभे आहेत. त्यांच्या भोवती आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणं शिवपिंडी प्रगटल्या आहेत. विसोबा, नामदेवराय आणि त्या पिंडी पाहताना क्षणभर ते दोघे गुरु-शिष्य डोळ्यासमोर तरळले.

लहानपणापासून ऐकलेली विसोबा-नामदेवांची कथा ऐकली. याच प्रसंगानंतर नामदेवांनी उत्तरेत जायचं ठरवलं असेल. म्हणजे महाराष्ट्राच्या संत चळवळीला देशभर घेऊन जाण्याचं इथंच ठरलं असेल. कदाचित इथंच नामदेवांनी तशी शपथ वगैरे घेतली असेल. या घटनेनंतर उत्तर भारतात गेलेल्या नामदेवांनी शीख धर्माचा पाया घातला. अनेक जातीजमातींमधून, उपेक्षित वर्गांतून संत घडवले. विठ्ठलाचा समतेचा संदेश कन्याकुमारीपासून अफगाणिस्तानपर्यंत पोचवला. नामदेवांच्या त्या राष्ट्रकार्याची दखल अजूनही म्हणावी तेवढी घेतली गेलेली नाही. मग त्यांच्या गुरुंची काय कथा? असा विचार करत असताना नजर मंदिराचा अंतर्भाग न्याहाळत होती. भिंतीवरील खिळ्यांना देवाचे कपडे तर एका कोपर्‍यात वाकचौरे नावाच्या कुणा महाराजांचा फोटो लटकलेला. गर्भगृहाच्या बाहेर एक दगडी नंदी. बाजूला एक तेलकट कळकट मिणमिणती पणती.

मंदिराच्या भिंतीवर ‘श्री विसोबा खेचर स्वामी मंदिर’ अशी पाटी लावलेली. सभामंडपाच्या बाहेरच्या भिंतीवरील ‘श्री विसोबा खेचर मंदिर, श्री संत नामदेव महाराज यांचे गुरू’ ही अक्षरं विसोबांचं अस्तित्व सांगण्याचा प्रयत्न करतायत, असं वाटलं. सण-वार, श्रावण महिना आणि वर्षातले ५२ सोमवार नागनाथाचं मंदिर गर्दीनं ओसंडून वाहत असतं. त्याचवेळी विसोबाच्या मंदिरात मात्र शुकशुकाट असतो. वर्षभरात कोणतेही उत्सव या मंदिरात होत नाहीत. अगदी आषाढी एकादशीलाही. मंदिराला ना कोण वहिवाटदार, ना कोणी पुजारी. मुक्कामाची जागा शोधणारे या मंदिराच्या आश्रयाला येतात. परिसरातल्या दुकानदारांनाही त्याचं काही वाटत नाही. बाहेरून येणारे वारकरी मात्र या मंदिराला आवर्जून भेट देतात. आम्ही गेलो तेव्हा तिथं उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातले वारकरी दर्शनासाठी आले होते. त्यापैकी उस्मानाबादचे माधव तुकाराम खंदारे म्हणाले, ‘विसोबा संत नामदेवरायांचे गुरू. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय औंढ्यातून कसं जायचं?’

विसोबांची उपेक्षा स्थानिकांनीच काय मायबाप सरकारनंही केलीय. औंढ्याचे तहसीलदार नागनाथ मंदिराच्या विश्वस्त समितीचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त समितीत वकील, पत्रकारही आहेत. नागनाथांचे पुजारी ब्राह्मण समाजाचे आहेत. यामध्ये भोपी या मानकरी पुजार्‍यांसह देव, जोशी, ऋषी, पाठक आणि सुरवाडकर ही काही नावं. मंदिरात जंगम-स्वामी पुजारीही दिसतात; मात्र त्यांचा मानकरी वा वहिवाटदार म्हणून हक्क नाही. समन्वयाच्या भूमिकेतून त्यांचं पौरोहित्य सुरू आहे. या सर्व पुजार्‍यांना नागनाथामध्येच ‘इंटरेस्ट’ आहे. त्यामुळं त्यांचं विसोबांकडं लक्ष जाण्याचा प्रश्नच येत नाही.

आजच्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर बालाघाटाच्या डोंगरात औंढा नागनाथ हे तालुक्याचं गाव. पांडव काळाचा दाखला देत दारूकावन नावानं ओळखल्या जाणार्‍या या परिसरात नागनाथ ज्योतिर्लिंगाचं हे विशाल मंदिर उभं आहे. या नागनाथ मंदिराच्या पश्चिमेला नामदेवांचं आणि उत्तरेला विसोबांचं मंदिर आहे. विसोबांच्या मंदिराच्या तुलनेत नामदेवांचं मंदिर मोठं आणि दर्शनीय भागात आहे. वारकरी आणि नामदेवांचे भक्त वगळता भाविकांना हे नामदेव महाराज आहेत हे आवर्जून सांगावं लागतं.

नामदेवांच्या या मंदिराचीही स्वतंत्र आख्यायिका आहे. नामदेव महाराज औंढ्यापासून ३५ किलोमीटरवरील नरसी गावचे. त्यांची नागनाथावर अपार श्रध्दा. ते नित्यनेमानं नागनाथाच्या दर्शनाला येत; मात्र मंदिराचे पुजारी त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास वा कीर्तन करण्यास मज्जाव करत. एकदा नामदेव महाराज मंदिरासमोर कीर्तन करण्याच्या तयारीत असताना पुजार्‍यांनी नागनाथांच्या पूजेस अडथळा होत असल्याचं कारण सांगत नामदेवांना मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करण्याची सूचना केली. नामदेव महाराज पश्चिमेला म्हणजे मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करू लागले. ते ऐकून नागनाथ प्रसन्न झाले आणि नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी थेट साक्षात नागनाथ मंदिरांसह १८० कोनात फिरून मागं तोंड बसल्याची कथा आहे. त्याच्या पुष्टीसाठी आता मंदिराच्या पाठीमागं असलेल्या तीर्थाचे आणि नगारखान्याचे दाखले दिले जातात. कारण सर्व मंदिरांमध्ये जलतीर्थ आणि नगारखाने समोरच्या बाजूला असतात. विसोबांच्या वाट्याला मात्र यापैकी काहीही आलेलं नाही. नागनाथ मंदिराच्या उत्तरेला विसोबांचं मंदिर आहे. पुस्तकं, पूजा साहित्य विक्रेत्यांच्या रांगेचा शेवट या मंदिरानं  होतो.

इथंच विठ्ठल लक्ष्मण मानकर भेटले. ते विसोबांच्या मंदिराची झाडलोट करतात. मानकर विसोबा आणि त्यांच्या मंदिराप्रमाणंच उपेक्षित. मानकर मंदिर समितीच्या अन्नछत्रात जेवतात. मिनतवार्‍या केल्यानंतर त्यांना महिन्याचा ९०० रुपये पगार मिळतो.

श्री नागनाथ देवस्थानच्या विश्वस्त समितीचे सदस्य डॉ. किसन लखमावार यांच्याशी बोलत होतो. ते म्हणाले, संत नामदेवांची ख्याती ऐकून दूर पंजाबवरून भाविक येतात. मात्र नामदेव आणि त्यांचे गुरू विसोबा खेचर हे दोघेही मराठी असूनही त्यांच्या दर्शनाची ओढ घेऊन येणारा मराठी माणूस विरळा आहे. विसोबा आणि नामदेवांवर अभ्यास वगैरे व्हावा, याच्याशी नागनाथ मंदिर समितीला काही देणं घेणं नाही. केवळ आर्थिक लाभ आणि प्रसिध्दी मिळाली तर ती हवी आहे. अशा परिस्थितीमुळं विसोबांच्या मंदिराचा जीर्णोध्दार होण्याची शक्यता दिसत नाही.

हे झालं मंदिरातलं चित्र. बाहेरचं चित्र यापेक्षा निराशाजनक आहे. विसोबा औंढ्याचे असले तरी औंढा विसोबांचा नाही. छोटं मंदिर सोडलं तर औंढ्यात विसोबांना अस्तित्व नाही. १२ ज्योतिर्लिंगांच्या यादीतलं आठवं ज्योतिर्लिंग म्हणून औंढ्याच्या नागनाथाचं महत्त्व आहे. याशिवाय गावाची दुसरी ओळख सांगावी असं ठिकाण नाही. पुजार्‍यांची घरं वगळता लक्ष वेधून घेतील अशा इमारतीही नाहीत. पुजार्‍यांची घरं मात्र आलिशान म्हणावीत अशी आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणाचा लाभ या पुजार्‍यांनाही होतोय. अनेक पुजार्‍यांनी बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या मुलांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देत आपली अर्थव्यवस्था भक्कम केली आहे.

गावभर विसोबाच्या पाऊलखुणा शोधत फिरताना दिसले उखडलेले रस्ते, तुंबलेली गटारं. विसोबा सिध्दयोगी, शिवोपासक होते या मताला ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते आणि समाजशास्त्राचे अभ्यासक ब. ल. तामस्कर दुजोरा देतात. त्यांनी दिलेली कारणंही वेगळी आहेत. ते औंढ्याच्या स्थित्यंतराविषयी बोलतात़. त्यासाठी औंढ्याच्या लोकसंख्येचा ते दाखला देतात. औंढ्यात लिंगायतांची संख्या मोठी आहे. कुंभार, लोहार आणि तेली समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय हा समाज आपल्या परंपरांशी घट्ट चिकटून आहे. गळ्यात लिंग आणि कपाळावर विभूती भस्म लावणार्‍या, मन्मथ स्वामींच्या अभंगांची पारायण करणार्‍यांच्या अनेक पिढ्या इथं आहेत. काही जणांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. नाथ संप्रदायी गोसाव्यांची घरंही इथं आहेत. परंतु त्यांचं वैदिकीकरण झाल्याची खंत ते व्यक्त करतात. तामस्करांच्या या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना ‘विसोबा’ची जास्त ओळख नसली तरी ममत्व असल्याचं जाणवलं.

अशा ‘विसोबाविन रित्या’ वाटणार्‍या औंढ्याहून निघालो तेव्हा मनात जवळच असलेल्या भक्तश्रेष्ठ नामदेवांच्या नरसी या जन्मगावात जायची इच्छा झाली. पावलं आपसूकच तिकडे वळाली. ज्या नामदेवानं वारकरी संप्रदायाचा झेंडा उत्तर भारतात उंचावला, त्याच्या जन्मगावात त्याच्या गुरूच्या काही खुणा आहेत का, हेही जाणून घ्यावं वाटलं. नरसी औंढ्यापासून ३५ किलोमीटवर आहे. औंढा-हिंगोली मार्गावर आत सेनेगाव रस्त्यानं १२ किलोमीटर अंतरावरील या गावात पोचलो. वडाप रिक्षात २० जणांचा ‘सुखाचा’ प्रवास झाला. या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ठराविक अंतरांनं ‘श्री अमुक-तमुक संस्थान, जागृत स्थान, श्रीक्षेत्र खुर्द वा बुद्रूक’ अशा स्थान महात्म्य सांगणार्‍या भल्या मोठ्या कमानी दिसत होत्या. लांबूनच नजरेस पडणारा भव्य गुरुव्दारा पाहताच नरसी आल्याची चाहूल लागली. ‘शिरोमणी भगत नामदेव महाराज गुरुव्दारा’ अशी पाटी या गुरुव्दाराच्या प्रवेशव्दारावर दिसली. गावात पोचल्यानंतर नामदेव स्मारकाची चौकशी करत गेलो. दोन भिंतीच्या मध्ये उघड्या अंगाच्या नामदेवांचा फोटो, बाजूला त्यांचाच कीर्तनकाराच्या वेषातला हाती वीणा आणि चिपळी घेतलेला दुसरा फोटो, तर दुसर्‍या बाजूला गुरू गोविंदसिंग यांचा फोटो ठेवलेलं स्मारक. या दोन भिंतीच्या मधे एका व्यक्तीला बसता येईल अशी व्यवस्था. हे स्मारक गुरूव्दारा समितीनं खरेदी केलेलं आहे. दिवसभर दर्शनाला येणार्‍यांमध्ये मराठी भाषिकांच्या तुलनेत शीख समाजाची संख्या मोठी. या स्मारकाची व्यवस्था पाहणार्‍या सरदारजींकडं नामदेवजी महाराज यांच्या गुरुंविषयी, विसोबांविषयी चौकशी केली. त्यांना त्याबाबत काहीही माहिती नव्हतं.

नरसीत कयालु नदीच्या तीरावर आता नामदेव महाराजांचं भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प विश्वस्त मंडळ आणि गाव कारभार्‍यांनी केलाय. देणगीसाठी त्यांची भिस्त मराठी नव्हे, शीख भक्तांवर अधिक असल्याचं परिसरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवरून जाणवलं. मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. वारकरी वाटणार्‍या या गर्दीतील अनेकांकडे विसोबांची चौकशी केली. सगळ्यांनी ‘नाही’ असंच उत्तर दिलं. नामदेव महाराजांच्या मूळ गावी त्यांच्यासमवेत संत सेना महाराजांचं देऊळ आहे. लोक म्हणाले, तो न्हावी समाजाचा देव आहे. शिवाय सातारकर महाराजांचंही देऊळ आहे. पण विसोबा मात्र दिसत नाहीत.

दर्शन घेऊन नरसीतून निघालो. ज्यांचं नाव घेतल्याशिवाय वारकर्‍यांचा दिवस उगवत-मावळत नाही, अशा संत नामदेवांच्या त्या जन्मगावातून बाहेर पडत असताना गळ्यात स्फटिकांच्या माळा, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, शर्टाच्या खिशावर बिल्ला आणि ‘जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय’ म्हणत एक जथ्था येत होता. नामदेवांच्या या भूमीत आता काय रुजू लागलंय याची ती मला चुणूक वाटली.

मी विसोबांच्या शोधात त्यांच्या गावात भटकलो. त्यांच्याबद्दल काही नवीन माहिती मिळेल, काही आशादायक चित्र दिसेल याची अपेक्षा नव्हतीच. सनातन वैदिक व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी -ज्यांनी आवाज उठवला, व्यवस्थेनं त्यांचा बळी घेतला. ही यादी बुध्द-बसव-कबीरापासून गोविंद पानसरे-मडिवाळप्पा कलबुर्गी यांच्यापर्यंत पोचेल. एक तर त्यांना देवत्व दिलं गेलं नाही तर मूर्तीभंजन करून, चक्रम ठरवून, दुर्लक्ष करून, प्रसंगी जीव घेऊन त्यांना बाजूला केलं गेलं. सनातन्यांच्या या कटाला विसोबाही अपवाद ठरले नाहीत. विसोबा माणूस आणि माणुसकी केंद्रबिंदू मानून समष्टीचा विचार सांगत होते. विसोबांच्या चरित्रातील नागनाथाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपण्याचा प्रसंग माझ्या मनात नेहमी अनंत तरंग उठवतो. स्थावर लिंग नाकारत ‘स्थावर नाशवंत आहे, शरीर हेच मंदिर’ असं सांगणार्‍या बसवादी शरणांची कल्याणक्रांती समोर येते. देवाला देऊळ नाही आणि देवळात देव नाही, हे शरण संप्रदायाचं सूत्र होतं. ‘देव माणसांत-माणुसकीत आहे. सकल जीवात्मांच्या कल्याणाचा, उध्दाराचा विचार करण्याचा आग्रह शरण संप्रदाय धरतो. या संप्रदायाची नाळ विसोबांशी जोडली असावी. समष्टीचा विचार ऐकताना नव्या पिढीला त्याचाही नीट शोध घ्यावा लागेल.’

औंढ्यापासून जवळच असलेलं नांदेड जिल्ह्यातील कंधार. हे गाव बसवकालीन शरण उरिलिंग पेद्दी आणि त्यांची पत्नी काळव्वे आणि त्यांचे गुरू उरिलिंग देव यांच्या रूपानं कल्याणपर्वाची साक्ष सांगणारं आहे़. उरिलिंग देव हे स्वामी म्हणजे गुरू परंपरेतील होते. तर उरिलिंग पेद्दी हे शूद्र होते. या दोघांच्या वचन नामांकितामध्ये ‘विश्वनाथ’ हे नाम आहे. दोघांच्या वचनांत गुरू परंपरेचं महत्त्व सांगितलं जातं. विसोबांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर उरिलिंगाच्या वचनांतील विश्वनाथ हे विसोबा असावेत, अशी शक्यता वाटते. वारकरी संप्रदायाच्या आणि वचन साहित्याच्या अभ्यासकांनी याचा शोध घेण्याची गरज आहे. संशोधकांनी यावर प्रकाश टाकल्यास शरण संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण ऐवज सापडेल. शरणांची समग्र क्रांती नंतरच्या काळात थोडी मवाळ होऊन वारकरी संप्रदायात रूपांतरित झाली. मात्र व्यवस्थेनं वारकर्‍यांना केवळ वारकरी न ठेवता ‘वैष्णवांचा मेळा’ करून टाकला. जो विठोबा आपल्या डोक्यावर शिवलिंग धारण करतो, ज्या पुंडलिकासाठी विठोबा युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहतो, त्याच्या भक्तांमध्ये, वारकर्‍यांमध्ये संतांच्या विचारांपेक्षा सनातन वैदिक कर्मकांडांचं स्तोम रुजविण्यात व्यवस्था यशस्वी होते, याचा मोठा विषाद वाटतो.

गालिब म्हणतो,

जाहिद शराब पिने दे मुझे मस्जीद मे बैठकर्|
वरना वो जगह बता दे जहाँ खुदा न हो|

ईश्वर मशिदीत आहे, मशिदी बाहेरही आहे. चराचरात तो आहेच. तो नसल्याची कोणती जागा आहे, की जिथं बसून मी दारू पिऊ शकतो? गालिबच्या या प्रश्नाचं उत्तर जाहिदप्रमाणं कुणाकडंही नाही. हेच तर विसोबा कृतीतून नामदेवांना सांगतात. सांग मी कुठं पाय ठेवू, जिथं देव नाही? उत्तर नसल्यानंच नामदेवांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. वैदिक व्यवस्थेचं भूत मानगुटीवर बसवून आपण मात्र विसोबाचा धर्म आणि जात शोधण्यात धन्यता मानली. माणूस आणि माणुसकीची भाषा बोलणार्‍या, समष्टीचा ध्यास घेत देवाला पायाखाली घेणार्‍याला वेडपट ठरवून त्याचा चक्रमपणा शोधत बसलो, हीच खरी शोकांतिका आहे. म्हणूनच मला तर विसोबा आजही पिंडीवरच पाय ठेवून झोपलेले दिसतात.

0 Shares
इठुराया बघे मांड्यांची गं वाट काय माहीत नाय