अभंग टेस्टिमोनियल

प्रशांत जाधव

सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात ऑर्कूटपासून टेस्टिमोनियलना मोठा भाव आहे. टेस्टिमोनियलचा आजचा अर्थ आहे, सोशल मीडियावर मित्रांचं केलेलं कौतुक. सातशे वर्षांपूर्वी सोशल इंजिनिअरिंगच्या काळात सहकारी संतांनी संत गोरा कुंभारांविषयी लिहून ठेवलेलं टेस्टिमोनियल अभंग आजही लाईक्स मिळवत आहे

सध्याच्या साशेल मीडियाच्या जमान्यात फेसबुकवर किंवा एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वाढदिवसानिमित्त, जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर, गुणगौरव करणारे टेस्टिमोनियल लिहिण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झालीय. पण ही पद्धत आताची नाही, तर याला खूप मोठी परंपरा आहे. परंपरा म्हटलं की विमानाचा शोध रामायण काळात लागला तर महाभारत काळात संजयला रणांगणातील बित्तंमबातमी ही इंटरनेट वापरून केलेलं ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’ होतं, असं काहीतरी म्हणायची पद्धत आहे. तिथवर जायला नको. कारण आपल्या संतांच्या अभंगांमध्ये एकमेकांचं अपरंपार महात्म्य सांगणारे शेकडो टेस्टिमोनियल वाचता येतात.

अर्थातच संत गोरा कुंभारांविषयी असे टेस्टिमोनियल नामदेव ते निळोबा या अखंड परंपरेत आढळून येतात. गोरोबा काका संत परंपरेतील सर्वांत वरिष्ठ मानले जायचे. ते सर्व संतांमध्ये वडीलधारी होते. त्यामुळं इतर संतांनी त्यांच्याबद्दल आपल्या अभंगातून आदरयुक्त भावना व्यक्त केल्या आहेत.

#संत नामदेव @गोरा कुंभार. गोरोबा नामदेवांपेक्षा मोठे होते. गोरोबाच्या वैराग्याबद्दल, त्यांच्या विठ्ठल भक्तीबद्दल, त्यागाबद्दल नामदेवांनी अभंगांतून  लिहून ठेवलंय. वैराग्याचा मेरू’ अशी उपमा त्यांना नामदेवांनी दिली आहे. तसंच ते ‘लाडका डिंगरू’ म्हणजे विठ्ठलाचे सर्वांत लाडके भक्त आहेत, असंही नामदेव नोंदवतात. गोरोबांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग नामदेवांनी अभंगांतून मांडले आहेत.हे प्रसंग नामदेवांमुळंच आपल्याला माहीत झाले. त्यामुळं त्याचं मोल मोठं आहे. याशिवाय गोरोबांनी नामदेवांना कच्चं मडकं म्हणाल्याचा प्रसंगही नामदेवांनी अभंगांतून मांडलाय.

#संत मुक्ताबाई @गोरा कुंभार. संत मुक्ताबाईंना गोरोबांविषयी काय वाटतं हेदेखील नामदेवांच्या अभंगामधूनच आपल्याला कळतं. नामदेवांनी अभंगांमध्ये मांडलेल्या आत्मचरित्रात मुक्ताईंच्या तोंडी असलेल्या अभंगात गोरोबांचं व्यक्तिमत्त्व उभं राहिलंय. शिवाय गोरोबांविषयी इतर संतांना वाटणारा आदरही स्पष्टपणे व्यक्त होतो.

संत हा गोरा जुनाट पै जुने ।
हाती थापटणे अनुभवाचे ॥
परब्रम्ह म्हातारा निवाला अंतरी ।
वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥
सोहं शब्द विरक्ती डवरली अंतरी ।
पाहता अंबरी अनुभव ॥
म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण ।
जाऊ द्या शरण अव्यक्ताशी ॥

#संत जनाबाई @गोरा कुंभार. संत जनाबाईंनी त्यांच्या ‘विठू माझा लेकूरवाळा’ या प्रसिद्ध अभंगात गोरोबांचं वर्णन केलंय,

गोरा कुंभार मांडिवरी ।
चोखा जीवा बरोबरी ॥

संतांच्या या मेळ्यात अठरापगड जातीचे संतजात-पात विसरून एकत्र आले. त्यात जनाबाईंनी गोराबांना विठ्ठलाच्या मांडीवर बसवलंय. जणू ते विठाईचं आवडतं बाळ आहेत.

गोरोबांच्या दोन पत्नी त्यांच्या शेजारी जाऊन झोपतात आणि त्यांना हात न लावण्याची विठ्ठलाची शपथ मोडण्याचा प्रयत्न करतात, ही कहाणी जनाबाईंनी एका अभंगात सांगितलीय.

दोन्हीकडे दोन्ही जाया ।
मधे गोरोबाची शय्या ॥
गोरा निद्रिस्त असता ।
कपट करिती त्याच्या कांता ॥

#संत बंका @गोरा कुंभार. संत बंका हे तेराव्या शतकातील म्हणजे गोरा कुंभारांचे समकालीन संत. ते संत चोखामेळा यांचे मेहुणे आणि भावोजीही होते. चोखोबांच्या सोबत राहून बंका यांनीही गोरोबा काकांवर अभंग रचले. ‘पहा हो नवल गौरियाचे घरी ।’ या अभंगात बंकोबा म्हणतात. गोरोबांच्या घरी देवाला काम करताना बघून वेदांचीही वाचा बसली, अशी मखलाशी त्यांनी केलीय.

गोणी भरोनिया स्वये आणि हरी ।
त्याचे साहित्य करी रखुमाई ॥
बंका म्हणे ऐशी आवडी भक्ताची ।
बोलता वेदांची वाचा मौन्य ॥

#संत चोखामेळा @गोरा कुंभार. चोखोबांच्या उपलब्ध अभंगांमध्ये तब्बल सहावेळा गोरोबांचा उल्लेख आहे. त्यात एकही संपूर्ण अभंग नसला. तरी गोरोबांची महती ते वारंवार गाताना आढळतात. त्यापैकी एक उदाहरण,
माळी कुंभाराचे नि:संतान केले ।
आपणाची उठविले मूल त्याचे ॥
चोखा म्हणे ऐसा विपरीत खेळ ।
वासुरे पाजित आवडीने ॥

#संत एकनाथ @गोरा कुंभार. गोरोबा काका हे तेराव्या शतकातील तर एकनाथ महाराज हे सोळाव्या शतकातील संत. पण असं असतानाही या संताचा महिमा आपल्यापर्यंत येण्यात संत एकनाथांचं फार मोठं कार्य आहे. तसंच गोरोबाकाकांच्या आयुष्यातील प्रसंगांना एकनाथांनी तीस अभंगांतून मांडलंय.

विठ्ठलानं संतांच्या मदतीला धावून जाणं जवळपास प्रत्येक संतांच्या अभंगांचा विषय आहे. त्यात गोरोबाकाकांचा उल्लेखही मस्ट आहे. ‘उच्चनिच काही नेणे भगवंत’ या प्रसिद्ध अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,

घडी माती वाहे गोर्‍या कुंभाराची ।

हुंडी त्या मेहत्याची अंगी भरी ॥

इतरही दोन अभंगांमध्ये ते गोरोबांचा उल्लेख अत्यंत आदरानं करतात. तुकोबारायांचे जवळचे मित्र संत संताजी जगनाडे यांनीही दोनदा गोरोबांना आपल्या अभंगांमध्ये गुंफलंय.

आणिक हे तेल घेतले कोणी ।
गोर्‍या कुंभारानी चोख्या महारानी ॥

याशिवाय नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार असाही संतांजींचा अभंग आहे. तुकारामशिष्या संत बहिणाबाईदेखील संत नामावळीत ‘कबीर कान्होपात्रा गोरा कुंभार सावतां नरहरी सोनार’ असा गोरोबांचा उल्लेख करतात.

#संत निळोबा @गोरा कुंभार. संत तुकारामांचा स्वप्नात दुष्टांत मिळालेले शिष्य संत निळोबाराय पारनेरकर यांनी गोरोबांवर एक स्वतंत्र अभंग लिहिलाय. त्यात गोरोबा काकांच्या वैराग्याचा सन्मान केलाय.

वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार ।
तोडीयले कर आणेसाठी ॥
महाद्वारी कथा श्रवण करिता ।
टाळी वाजविता निघती नवे ॥
तुम्ही देवा कृपादृष्टी अवलोकिला ।
हृदयी तो धरिला प्रिती करी ॥
निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान ।
अवतार म्हणवून धरणे लागे ॥

#मोरोपंत @गोरा कुंभार. फक्त संतच नाही तर पंतांच्या परंपरेतही गोरोबांची थोरवी लिहिलेली सापडते. पंतकवींपैकी सर्वात महत्त्वाचे कवी मोरोपंतांनी गोरोबांविषयी आर्या लिहिलीय. ती अशी,

गोरा ज्या म्हणती त्या स्मरूनि

सुखी तू मना कुलाला हो ।

घे भक्तीचा जपाची सति संसारी,

अनाकुला लाहो ॥

स्वतःच्या मनाला उपदेश करताना मोरोपंत म्हणतात, गोरा कुंभारांनी आपल्या भक्तीनं आपल्या कुळाचा उद्धार केला. या सर्वश्रेष्ठ भक्ताची आपण आठवण काढली पाहिजे.

अगदी विसाव्या शतकातील संतकवी तुकडोजी महाराज आणि स्वामी स्वरूपानंददेखील आपल्या काव्यांमध्ये गोरोबांचा उल्लेख आदराने करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधुनिक संदर्भात गोरोबा काकांना फक्त भक्तांचा आदर्श मानत नाहीत. तर त्यांना ते कष्टकर्‍यांचा आदर्श मानतात. त्यांचा आदर्श मानून श्रीमंतांनीही कष्ट करावेत, असा आदेश ते प्रसिद्ध ग्रामगीतेत देतात,

श्रीसंत गोरा राबे अंगे ।
देवही माती तुडवू लागे ॥
तेथे श्रीमंत आळसे वागे ।
हे महापाप ॥

0 Shares
ऊर्जा वाटणारा चरित्रवेध संतांचा सर्वंकषवाद