संतांचा सर्वंकषवाद

नंदन रहाणे

संत गोरा कुंभारांसह सर्व संत मंडळी गावगाड्यातल्या कारूनारूंपैकी होती. सांसारिकही होतीच. त्यांनी धाडस करून पुरोहितशाहीशी थेट टक्कर घेतली. तिनं उभारलेल्या तथाकथित पावित्र्यदुर्गालाच सुरुंग लावला.

वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी लोकधारक समाजप्रणाली आहे. तिचा प्रभाव वारकरी संप्रदायापुरता मर्यादित नाही. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, लोकनृत्य, शिल्पकला, चित्रकला, तत्त्वज्ञान अशा नानाविध क्षेत्रांमधल्या घडामोडींवर हा प्रभाव सतत जाणवत राहतो. विचारधन, आचारपद्धती आणि प्रचारतंत्र यांची व्यापकता पाहू जाता, वारकरी संप्रदाय इतर सर्वांपेक्षा फारच बृहत्तर ठरतो आणि वारकरी परंपरा ही तर त्या संप्रदायापेक्षाही आणखी मोठी असल्याचं निःशंकपणे म्हणता येतं.

हा प्रभाव एखाद्या वर्षात निर्माण होत नाही. त्यामागं अनेक पिढ्यांच्या पुण्याईचं संचित उभं असतं. संप्रदायाच्या अध्वर्यूंचा विचार, त्याला अनुसरून अनुयायांचं वर्तन आणि त्याचा समग्र समाजावर झालेला परिणाम, यातून हा प्रभाव आकाराला येतो. नामदेव (१२७०-१३५०), ज्ञानेश्वर (१२७५-१२९६), एकनाथ (१५३३-१५९९), तुकाराम (१५९८-१६४९) हे चार महासंत आणि त्यांच्या भोवताली उभे असलेले दुसर्‍या, तिसर्‍या, चवथ्या फळीतले किमान १०० संत. त्यांच्या मागोमाग येणारे दर पिढीतले हजारो निरूपणकार, प्रवचनकार, गायक, वादक यांनी गेली ७०० वर्ष हा प्रभाव निर्माण केला आणि टिकवून ठेवला आहे. त्यातूनच महाराष्ट्राचं व्यक्तिमत्त्व जगापुढं ठसठशीत उभं राहिलंय.

मात्र आपल्या संप्रदायाच्या समग्रतेची आणि सर्व व्यापकतेची जाणीव सांप्रदायिकानांच पुरेशी आहे, असं म्हणवत नाही. मराठी समाजाचे सर्व स्तर, सर्व वर्ग आणि सर्व जाती यांच्यापर्यंत पोचलेला, शेकडो वर्ष बांधून घेणारा असा दुसरा संप्रदाय महाराष्ट्रात नाहीच. वैचारिक औदार्य, अवडंबररहित आचार आणि नैतिक सहजता याचबरोबरच भूमिकांमधला धाडसीपणा यातून वारकरी संप्रदायाची बैठक दृढ झाली. त्यातून वारकरी परंपरा उभी राहिली. मात्र भाबड्या अनुयायांच्या गतानुगतिकेच्या परिघाबाहेर पडून काळाला साजेशी तर्काधिष्ठित, सत्याधारित मांडणी वारकरी परंपरा मानणार्‍यांनी आता केली पाहिजे. एकविसाव्या शतकाची तीच निकडीची मागणी आहे.

साधी गोष्ट घ्या, सध्या वारकरी संप्रदायाच्या चिंतन-मननाचा झोत फक्त ‘ज्ञानदेव-तुकाराम’ यावरच केंद्रित झालाय. त्याला अर्थातच प्रछन्न जातीयवादाचा संदर्भही लगडलेला आहेच. महाराष्ट्राच्या सुविख्यात संत मंडळातल्या इतर संतांचे अभंग, त्यातले विचार यावर निरूपण होताना कुठल्याच कीर्तन सप्ताहात आढळत नाही. नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, जनाबाई, सोयरा, निर्मळा यांचे अभंगही भजनात गायले जात नाहीत. एकेका संताला एकेका जातीपुरतंच सीमित करून ठेवलंय. त्या त्या जातीनं वर्षातून एकदा त्यांचं स्मरण करावं आणि मोकळं व्हावं. क्वचित कधी एखाद्या संतांच्या जीवनातली एखादी कथा एखाद्या निसटत्या पुसटशा संदर्भापुरती ऐकवायची आणि पुढं निघायचं, हेच आता सर्वत्र सुरू असल्याचं दिसतं. संप्रदायातलं चित्र असं असलं तरी वारकरी परंपरेनं यापुढं जाऊन गंभीरपणे नव्या वळणवाटांचा विचार करायला हवा.

गेली ५० वर्ष मी वारकरी कीर्तनांमधून नामदेवांच्या कच्च्या मडक्याची गोष्ट ऐकत आलोय. तथाकथित हभप मंडळी अतिशय चवचवीनं ती गंमत श्रोत्यांना सांगतात. नामदेवांच्या अभंगगाथेत तो प्रसंग आलाय, असं सकृतदर्शनी दिसतं. पण एकाही कीर्तनकाराला त्या घटनेचे पदर तपासून बघण्याची इच्छा आजतागायत झालेली नाही. नामदेव गाथेत प्रक्षिप्त अभंग खूपच आहेत. शुद्ध-अशुद्धही फार आहेत. वारकरी संप्रदायाचे ‘चतुर्वेद’ म्हणण्याऐवजी ‘प्रस्थानत्रयी’ ही संकल्पना जाणीवपूर्वक रूढ केली आहे. त्यामुळं नामदेव आणि त्यांची गाथा आपोआप वगळली गेली. नंतर नंतर फक्त ‘ग्यानबातुकाराम’चाच घोष उरला. इतर सगळेच संत छाटून, काटून खूप लहान करण्यात आले. वस्तुतः ज्ञानदेव आणि बंधूभगिनींचं मोठेपण जगाला पहिल्यांदा गर्जून सांगितलं, ते नामदेवरायांनीच. पण त्यांचंच प्रतिमाहनन व्हावं यासाठी कच्च्या मडक्याच्या कथेचा व्यूह रचण्यात आला.

त्या कथेत अनेक पात्रं आहेत; पण मुख्य व्यक्तिरेखा आहेत दोन. पहिली मुक्ताबाई आणि दुसरे गोरोबा. या दोघांचे अभंग तपासले असते, तरी सत्य शोधणं सोपं झालं असतं. पण तो मार्ग पत्करण्यात कोणालाही रस नव्हता. एक चवदार गोष्ट गमावणं कोणालाच परवडणारं नव्हतं. काही विद्वानांनी गोरोबांऐवजी गोरक्षनाथ या महनीय व्यक्तिरेखेचं उपायोजन करून स्वतःचं समाधान करून घेतलं. सर्वसाधारण वारकरी गोरा कुंभारांचं थापटणंच खरं मानत राहिला. गोरा कुंभारांचे सध्या उपलब्ध असलेले अभंग २३ ते ४२ या संख्येत आहेत. त्यातले साधारण २० अभंग अस्सल असल्याचं मानलं जातं. तेच ‘श्री सकल संतगाथे’त उपलब्ध आहेत. मात्र त्यात कुठंही मडकं थापटण्याचा प्रसंग येत नाही. त्या अभंगांमध्ये दिसणारे गोरोबाकाका आणि नामदेवराय यांचं नातं अतिशय हृद्य आणि गहिरं आहे. त्यातला एकही अभंग मी आजवर कीर्तनात ऐकलेला नाही.

ते सर्व आणि इतरही संतांचे दुर्लक्षित अभंग वाचले, तरी वारकरी परंपरेचं उज्ज्वल, उदात्त, उन्नत स्वरूप उत्तमरीतीनं समजून येतं. फक्त तशी इच्छा पाहिजे आणि महाराष्ट्रात सध्या तिचीच वानवा आहे. नामदेवरायांनी पंढरपूरला चंद्रभागा नदीच्या वाळवंटात एका मुक्त अध्यात्म विद्यापीठाची अनौपचारिक स्थापना केली. तो काळ चातुर्वर्ण्याच्या ऐन भरभराटीचा होता. क्षत्रियांच्या आधारानं ब्राह्मण मंडळींनी ऐहिक प्रशासन आणि पारलौकिक जीवन यावरची आपली पकड अतिशय घट्ट केली होती. जन्मजात उच्चनीचत्व, ब्राह्मणांचे केंद्रवर्तित्व, संन्यासवादाचा पुरस्कार, संस्कृतचा बडीवार, सोवळ्याओवळ्याचा अतिरेक आणि कर्मकांडाचा न संपणारा पसारा हे त्यांच्या वर्चस्वाचे प्रमुख घटक होते. अन्य सर्व श्रमिक समाजसमूहांच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाविषयीचा न्यूनगंड पेरण्यात अन् रूजवून वाढवण्यात ते यशस्वी झाले होते. देशातल्या सर्वसमान्यांच्या श्रद्धाकेंद्रावर ताबा मिळवून आपली पुरोहितशाही उभी करणंदेखील त्यांना जमलं होतं. अशा विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी अठरापगड समाजामधून जी माणसं त्या सहस्रकात जिवाच्या करारानं उभी राहिली, त्यांचे अग्रणी नामदेवराय आहेत आणि त्यांच्या या बंडात जे जे सहकारी सामील झाले, त्यात गोरोबाकाका अग्रणी आहेत.

ही सर्व मंडळी गावगाड्यातल्या कारूनारूंपैकी होती. सांसारिकही होतीच. अध्यात्माची तीव्र ओढ आणि ऐहिकाचा काच त्यांना जाणवत होता. त्यांनी धाडस करून पुरोहितशाहीशी थेट टक्कर घेतली. तिनं उभारलेल्या तथाकथित पावित्र्यदुर्गालाच सुरुंग लावला. देवाची गाभार्‍यातून मुक्तता आणि मंदिरातून सुटका, त्याची भक्तांसाठी २४ तास उपलब्धता, मध्यस्थ वगळून त्याच्याशी लोकभाषेत संवाद, कर्मकांडविरहित भावभक्ती, स्नेहसमता सुसंवादावर आधारलेलं सहजीवन हेच त्यांचे मार्ग होते. त्यामुळं ब्राह्मणशाहीच्या सापळ्यात अडकलेल्या सर्वसामान्यांना एकदम स्वातंत्र्य मिळालं. त्याची द्वाही नामदेवांच्या बरोबरीनं ज्यांनी ज्यांनी फिरवली, त्यात तेर गावचे गोरा कुंभार आघाडीवर आहेत.

तेर हे गाव म्हणजेच प्राचीन तगरपूर ही राजधानी. त्याचं आणखी एक नाव आहे त्रयोदया. हे नाव कशावरून आलं? तर या गावी शिवाची १३ मंदिरं होती आणि ती सर्वत्र प्रसिद्ध होती. म्हणजेच तेर हे गाव शैवक्षेत्रही होतं. नाथसंप्रदायाचा प्रभाव त्या परिसरावर होता. गोरोबाकाका अशा शैव पर्यावरणात वाढले. शिव हा खास भारतीय भूमिपुत्रांचा आदिम देव. वैदिक कर्मकांडवाद्यांनी त्याच्यापुढं विष्णूला मोठा करत करत स्थानिकांवर वर्चस्व मिळवण्याची प्रचंड मोहीम पहिल्या सहस्त्रकात राबवली. दुसर्‍या सहस्त्रकात मग हेच चक्र परत फिरलं. मूळचे शैव असलेले नामदेव, निवृत्ती, विसोबा, गोरोबा हे वैष्णव म्हणून उभे ठाकले आणि त्यांनी वैष्णव संप्रदायालाच लोकधर्माचं रूप देऊन समाजाच्या ब्राह्मण केंद्रीकरणाचा डाव उधळून लावला!

हे सर्व समजून घेणं, त्याचे धागेदोरे जुळवणं म्हणजेच वारकरी परंपरा आत्मसात करणं होय. माणसांनी ऐहिकाचे व्यापताप मागं टाकून समतेच्या अंगणात गोळा होणं आणि अधिकाराचा बाऊ न करता आनंदाची देवाणघेवाण करणं हेच वारकरी परंपरा शिकवते. त्याचे सर्वात सुंदर पडसाद गोरोबा काकांच्या अभंगात ऐकू येतात. नामदेवांशी त्यांची जी भेट झाली आहे, त्याविषयीची कृतज्ञता ते ठायीठायी व्यक्त करताना दिसतात. अध्यात्माची ही हवीहवीशी वाट नामदेवांनी त्यांना दाखवल्याचा आनंद त्यांच्या शब्दाशब्दांतून निथळतो.

गोरोबाकाकांसह अन्य सर्व संतांना नामदेवांनीच हा मुक्त अध्यात्माचा मार्ग दाखवला आहे. पण त्यांनी ‘गुरूबाजी’ माजवलेली नाही. स्वतःला मखरात बसवून घेणं त्यांना मंजूरच नाही. किंबहुना ती वारकरी परंपरेचीच भूमिका नाही. ‘गुरूबाजी’ हा ब्राह्मणी भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. ‘वर्णानाम ब्राह्मणो गुरू’ हा सिद्धांत त्यामागं आहे. तो वारकरी संप्रदायावर लादण्याच्या अट्टहासातून कच्च्या मडक्याची कच्ची कहाणी नंतर उभी करण्यात आली. नामदेव आणि त्यांचे संतमित्र हे एकमेकांचे सहप्रवासी होते. तिथं पालख्या, दिंड्या, रथ, घोडे यांचं कामच नव्हतं. आपापली कामंधामं सांभाळून, तापल्या भुईवरून चालत ही मंडळी पंढरपूरला पोचून समतेचा मंत्र आणि ममतेचं तंत्र महाराष्ट्राला शिकवत.

अल्बेर काम्यू (१९१३-१९६०) हा क्रियाशील फ्रेंच विचारवंत आणि लेखक होता. त्यानं रशियन साम्राज्यवाद आणि अमेरिकन साम्राज्यवाद या दोहोंना विरोध केला. सर्वंकषवादाच्या प्रतिकूल भूमिकेवर तो उभा होता. सहिष्णुता आणि सहअस्तित्व हाच त्याच्या विचारांचा गाभा. एके ठिकाणी तो संपर्कात आलेल्याला सांगतो, ‘तू माझ्या मागे येऊ नकोस, मी कुणाचाही नेता नाही, यायचंच असेल, तर माझ्यासोबत, बरोबरीने ही वाट चालू लाग! आपण मित्र होऊन पुढ जात राहू या!’ गोरोबाकाकांनी आयुष्यभर जी माती तुडवली, ती याच ध्यासातून तुडवली. हा रस्ता त्यांना नामदेवरायांनी दाखवला. गोरोबांचं मोठेपण हे की त्या मातीखालचा कठीण खडकही त्यांनी फोडून दाखवला. सध्याच्या वारकरी सांप्रदायिकांना या अठरापगड संतांच्या कामाचं मोल कधी समजेल?

0 Shares
अभंग टेस्टिमोनियल वारकऱ्यांचे गोरोबा काका