ऊर्जा वाटणारा चरित्रवेध

संदीप जगदाळे

संतएकनाथांनी संतगोरा कुंभारांविषयी आत्मीयतेनं लिहिलंय. डॉक्युमेंटेशनम्हणून हे मोलाचं आहेचं. पण त्यातला जिव्हाळाही तितकाच महत्त्वाचा आहे.गोरोबांचा चरित्रवेधघेताना एकनाथ समतेची दृष्टीही आपल्या हाती सोपवतात.

मानवाच्या अस्तिवाचं सत्य हे आत्मा असून, त्याचा विकास हा जीवनाचा विकास आहे. जीवनाचा विकास हा आत्म्याच्या विकास आणि वाढीसोबत जोडलेला आहे, असं भारतीय दर्शन मानतं. आपल्या दर्शनशास्त्राचा मार्ग हा माणसाला भौतिक सुखांच्या, वस्तूंच्या लोभापासून दूर नेतो. माणसाला मोहातून निरंक करत आध्यात्मिक जाणिवेतून निर्गुण शाश्वताकडं घेऊन जाणारा हा मार्ग आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायानं स्वीकारलेला ‘भक्तीमार्ग’ विकसित होत गेल्याचं दिसून येतं. सनातनी धर्मातून आलेल्या कर्मकांडाला पर्याय म्हणून वारकरी संप्रदायानं समाजातील सर्व स्त्री-पुरुषांसाठी भक्तीमार्ग सांगितला. यामुळं समाजातील सर्व स्तरातील माणसं या संप्रदायात संत पदापर्यंत पोचले, अशा संतामधलेच एक म्हणजे संत गोरा कुंभार.

गोरोबांच्या आयुष्यात ‘विठ्ठला’च्या नामस्मरणाइतकं काहीच पवित्र नव्हतं. नामस्मरणाचा भक्तीमार्गच आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणारा आहे, याची त्यांना जाणीव झाली होती. सांसारिक आयुष्य जगताना वैराग्याच्या मार्गावरून चालणं तितकंसं सोपं नाहीये. यासाठी लौकिक अर्थानं अनेक त्याग करावे लागतात. आर्थिक पातळीवर भणंगपणा स्वीकारावा लागतो. ही सगळी ‘किंमत’ गोरोबांनी दिली. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर,

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणे केले देशोधडी आपणासी ॥

आवडत्या निर्गुणाचा संग धरण्यासाठी प्रसंगी देशोधडीला लागणंही स्वीकारणार्‍या गोरोबाकाकांच्या जीवनाचा प्रभाव त्यांच्या नंतरच्या संतपरंपरेवर खोलवर पडलेला आहे. अगदी गोरोबांनंतर दोन शतकांनी जन्मलेल्या संत एकनाथांना त्यांच्या जगण्यानं प्रभावित केलं. म्हणूनच एकनाथांनी गोरोबांचं चरित्र अभंगातून रचलं आहे.

संत एकनाथांनी गोरोबा काकांवर चरित्रात्मक तीस अभंग (अभंग क्र. ३६३६ ते ३६६६, श्री एकनाथ महाराजांची गाथा, संग्राहक – वै. श्री. नाना महाराज साखरे, धार्मिक प्रकाशन संस्था मुंबई, आवृत्ती. ३० सप्टेंबर २०१७) रचले आहेत. या अभंगांमध्ये गोरोबा काकांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन आहे. त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. गोरोबांचं जन्मगाव तेर असून ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांचा प्रपंच व्यापारावर अवलंबून असून ते दाम्पत्य सुखी आयुष्य जगत असल्याचं एकनाथ वर्णन करतात.

गोरोबांची विठ्ठल भक्तीतील तल्लीनता रेखाटताना एकनाथांनी एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला आहे. या प्रसंगानंतर गोरोबांचं सुखी आयुष्य एका अवघड वळणावर येऊन ठेपलं. तसंच त्यांचं ‘एक श्रेष्ठ वारकरी’ असणंही या प्रसंगावरून सिद्ध झालं. तो प्रसंग म्हणजे नामस्मरणात दंग होऊन माती तुडवत असताना स्वतःच्या मुलालाही तुडवणं.

नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका ।
मन गुंतलेसे देखा पांडुरंगी ॥
मृत्तिकेलम जाहला असे गोळा ।
बाळ मिसळला मृत्तिकेत ॥

त्यानंतर गोरोबांच्या पत्नीनं त्यांना स्पर्श न करण्यासाठी विठ्ठलाचीच शपथ घातली. गोरोबांचा वंश पुढं टिकावा म्हणून त्यांच्या पत्नीनं आपल्या बहिणीचा विवाह गोरोबांशी करून दिला. आधी विठ्ठलाची शपथ आणि नंतर सासरेबुवांना दिलेल्या वचनामुळं दोघींही गोरोबांच्या स्पर्शाला पारख्या झाल्या. यामुळं सर्व विषयांपासून दूर राहता आलं, याचं समाधान गोरोबांना झालं. असं एकनाथांनी म्हटलंय. ‘लिगाड’ आपोआप मावळलं, असा उल्लेख त्यांनी केलाय.

गोरियाने केला मनासी विचार ।
आणि एक निर्धार बरा जाहला ॥
लिगाड ते आपोआप मावळले ।
विषयांचे झाले तोंड काळे ॥

पत्नींच्या कटामुळं गोरोबांच्या हातांचा पत्नींना स्पर्श झाला. त्यामुळं त्यांनी हातांना शिक्षा करण्याचं ठरवलं.एकनाथांनी त्याचं वर्णन केलंय,

चोरासी खंडन करावे हाचि धर्म ।
आणीक नाही वर्म दुजे काही ॥
माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली ।
शपथ पाळिली नाही दुष्टे ॥

गोरोबानं माझ्यासाठी हात तोडले. त्याच्या कुटुंबाला हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. तो माझा श्रेष्ठ भक्त असल्यानं मी त्याची लाज राखली पाहिजे, असं पांडुरंगानं रुक्माईला सांगितलं.

रुक्माईसी सांगे एकांतासी गोष्टी ।
गोयाची कसवटी पांडुरंग ॥
माझिया कारणे कर तोडियेले ।
सांकडे पडले मज त्यांचे ॥
माझिया भक्ताची मज राखणे लाज ।
म्हणुनियसा गुज तुज सांगितले ॥

त्यानंतर पांडुरंग कष्ट करून गोरोबांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू लागला. गोरोबाचं दैन्य दूर झालं. त्यानंतर संतमेळ्याचं तेरला आगमन आणि पंढरपूरचा कुंभार म्हणजे पांडुरंगच असल्याचं ज्ञानदेवांनी ओळखणं. त्यानंतर नामदेव महाराजांच्या कीर्तनात गोरोबांना हात फुटले. तुडवलं गेलेलं मूलही गर्दीतून रांगत त्यांच्याजवळ आलं. अशा गोरोबांच्या आयुष्यातील विविध घटना एकनाथांनी अभंगांमधून मांडल्या आहेत.

कुल्लाळ वंशात गोरा तो कुंभार ।
किर्ती चराचर भरियाने ॥

प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी ।
भाजनेही घडवी श्री विठ्ठल ॥
नाम निरंतर वदतसे वाचे ।
प्रेम मी तयाचे काय वानूं ॥
एका जनार्दनी भक्तांचा कैवारी ।
भाजणे ती करी घरी त्याच्या ॥

एकनाथांना पूर्व परंपरेची तीव्र जाणीव होती. त्याबद्दल प्रचंड आदरही होता. तो त्यांच्या मनात खोलवर रुजलेला होता. हे संत एकनाथांनी रचलेलं ‘संत गोरा कुंभार चरित्र’ वाचताना जाणवतं. म्हणूनच गोरा कुंभार चरित्रासोबतच त्यांनी निवृत्तीनाथ स्तुती, ज्ञानदेव स्तुती, सोपानदेव स्तुती, मुक्ताई स्तुती, नामदेव चरित्र, सावता माळी चरित्र, चोखामेळा चरित्र हेही रचलं. एकनाथांच्या एकूणच साहित्याची भाषा प्रासादिक, साधी सरळ आहे. यात पारमार्थिक शब्द वारंवार येत असले तरी काव्य क्लिष्ट होत नाही. एकनाथ हे कधीही विसरत नाहीत की, ते ज्या लोकांसाठी लिहीत आहेत, तो वाचक, श्रोता अतिशय सामान्य माणूस आहे. त्याला त्याच्याच भाषेत सांगितलं पाहिजे. या भाषेतून एकनाथांचं सामान्यांसाठी कळवळणारं मन दिसून येतं.

एकनाथांनी त्यांचे अनुभव अनेकविध भूमिकेतून, शैलीतून मांडले. सगळं जीवन उघड्या डोळ्यांनी पाहून ते अस्वस्थ व्हायचे. या अस्वस्थतेचं मूळ कशात आहे, हे त्यांना माहीत होतं. ते सर्व समाजाला प्रामाणिकपणे सांगण्याची तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसून येते. जनसामान्यांच्या आकलनाच्या कक्षा एकनाथांना माहीत असल्यानंच ते इतक्या सोप्या भाषेत लिहू शकले. एकनाथांच्या भाषा, मांडणीचा मोठा प्रभाव त्याच्या नंतरच्या संत परंपरेवरच नाही तर एकूणच मराठी समाजावर झालेला आहे.

एकनाथांनी रचलेल्या गोरा कुंभार चरित्रातील बर्‍याच घटना एखाद्या चमत्कारासारख्या वाटतात. त्या बौद्धिक पातळीवर पटतही नाहीत. मुलगा चिखलात तुडवत असताना त्याची जाणीव न होणं, गरुडानं गाढवाचं रूप घेणं, भांड्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येणं, गोरोबांचे हात पुन्हा उगवणं, मेलेला मुलगा कीर्तनात रांगतपरत येणं या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक पातळीवर ताडल्या असता अविश्वसनीय वाटतात. असे अनेक चमत्कार जगातल्या सर्वच संतांविषयी प्रचलित आहेत. त्याचा उपयोग करून संतांवरील श्रद्धा अधिक दृढ करण्याचा प्रयत्नही करण्यात येतो. पण वारकरी संप्रदायाच्या बाबतीत वेगळेपण दिसून येतं. ते म्हणजे संतांविषयी प्रचलित चमत्कारांचा वारकर्‍यांवर प्रभाव नाही. सामान्य वारकरी चमत्कारांऐवजी संतांच्या शिकवणुकीला अधिक महत्त्व देतो.

गोरोबांनी माती तुडवताना मूल तुडवल्याचा अर्थ गोरोबांचं विठ्ठलभक्तीत विदेही होणं, पांडुरंगानं वेषांतर करून घरी काम करण्याचा अर्थ देव ही संकटाच्या काळात उभा राहतो, वारकरी संप्रदायात सर्व समान असल्यानं कनिष्ठ जातीत जन्मलेल्या गोरोबांच्या इथं पांडुरंग काम करून वर्णाभिमानाला फटका देत आहे, असा होतो. यामुळं आजचा वारकरी हा संतांच्या बाबतीत श्रद्धाळू असला तरी अंधश्रद्धाळू होत नाही. संतांच्या चमत्कारांमधून नेमकं वैचारिक सूत्र आणि बौद्धिक सूत्र सांगण्यात येतं. ते समजून घेण्याची विलक्षण समज वारकर्‍यांमध्ये आहे. त्यांची ही तार्किक समज अधिकाधिक दृढ करण्याचं काम कीर्तन परंपरेनं शेकडो वर्षांपासून केलं आहे. करत आहे. यामुळंच ज्या ठिकाणी संतांनी चमत्कार घडवले त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी न करता, जिथं संतांची समाधी आहे, जिथं संतांचा वावर होता तिथं दर्शनासाठी गर्दी करतात. उदाहरण द्यायचं झालं तर पैठणमध्ये संत ज्ञानदेवांनी ज्या नागघाटांवर रेड्यामुखी वेद बोलवले, अशी आख्यायिका आहे. तिथं दर्शनाला वारकरी गर्दी करताना दिसत नाहीत. पण संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी लाखोच्या संख्येनं जमतात.

गोरोबांनंतर २०० वर्षांनी जन्मलेले एकनाथ गोरोबांच्या जीवनावर चरित्रात्मक अभंग लिहितात. म्हणजेच ते फक्त काव्य रचत नाहीत तर या माध्यमातून जगण्याचं एक सत्य आपल्यासमोर ठेवतात. एकनाथ गोरोबांच्या नामस्मरणातून विठ्ठलाच्या भक्तीनं तल्लीन होण्याचा वारंवार उल्लेख करतात, तेव्हा ते आपल्याला सर्व कर्मकांडांना नाकारून भक्तीच्या मार्गाचा पर्याय देतात.

मनुस्मृतीनं कनिष्ठ ठरवलं होतं, अशा जातीत जन्मलेल्या गोरोबांचा महिमा ब्राह्मण जातीत जन्मलेले एकनाथ गातात तेव्हा ते वारकरी संप्रदायात भेदभाव अमंगळ असून, हा संप्रदाय सर्वांच्या अस्तित्वाला सारखंच महत्त्व देत असल्याचं सांगतात. नामदेव चरित्र, सावता माळी चरित्र, गोरा कुंभार चरित्र, चोखामेळा चरित्र या कर्मठ परंपरेत कनिष्ठ समजण्यात येणार्‍या जातीत जन्मलेल्या संताचे चरित्र आपल्या शब्दात रेखाटूनएकनाथांनी वैदिक संस्कृतीला एक पर्याय म्हणून ही प्रतिमा उभारणी केली आहे. एकूणच सर्व संतांनी मोठ्या प्रमाणात वाङमय निर्मिती करून सर्वसामान्यांचं शोषण करणार्‍या पुराणांना नवीन पर्याय दिला आहे. याआधी म्हटल्याप्रमाणं एकनाथांना त्यांच्या परंपरेची तीव्र जाणीव होती. यामुळंच त्यांना शे-दोनशे वर्ष मागे जाऊन तिथून जगण्याची ऊर्जा स्वत:ला घ्यावी वाटली-इतरांना द्यावी वाटली.

एकनाथांचं हे इतकं पाठीमागं जाणं, तिथं आदर्श शोधणं आणि आजचं आपलं जगणं कितपत समांतर आहे? आजच्या भवतालात वावरत असताना आधीच्या विचार परंपरा आपल्या रोजच्या जगण्यातून कितपत दिसून येतात? आपल्या आधी आठशे वर्ष जन्मलेले गोरोबाकाका आणि पाचशे वर्ष आधी जन्मलेले एकनाथ हे आपल्याला आयडॉल वाटतात का? की आपण आपलं ‘करिअरिस्ट’ गणित जुळवत असताना सगळ्या विवेकी परंपरासोबत फारकत घेतलीय?

गोरोबा, एकनाथ आणि आपण असा विचार करत असताना अशा अनेक प्रश्नांचं मोहळ डोक्यात उठतं. या प्रश्नांची उत्तरं फारशी उत्साहित करणारी नाहीत. वर्तमानाविषयी आपण कमालीचे नाराज असलो तरी त्याची नेमकी चिकित्सा करून आपल्या आधीच्या विचार परंपरांशी जोडून घेत निर्लेप मानवतेच्या दिशेनं जाण्याचा प्रामाणित प्रयत्न होताना दिसत नाही. अधिक स्पष्ट बोलायचं झालं तर, आपल्या मागच्या विचारी पिढ्यांशी आपण कसलंही नातं टिकवून ठेवलेलं नाही. पुन्हा त्यात माझ्या तिशी, पस्तिशीत असणार्‍या पिढीतील बहुतेक तरुणांना, आपल्या भूमीत संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी बर्‍याच लोकांना खस्ता खाल्याची जाणीव तर जाऊ द्या साधी धड माहितीही नाही. आणि हे माहीत करून घेण्याची आवश्यकताही त्यांना वाटत नाही.

प्रामाणिक माणूस म्हणून जगण्याला ऊर्जा देणारं सगळं सोयीस्कररित्या विसरून जायच्या आपल्या समकाळात आपल्याआधी आठशे वर्ष जन्मलेल्या गोरोबांपर्यंत जाणं कदाचित अनेकांना ‘आऊटडेटेड’ वाटत असेल; पण एकनाथांनी गोरोबांचा घेतलेला हा शोध आपल्याला ‘कसं पाहावं, काय पाहावं?’ ही दृष्टी देणारा आहे. आपण या दिशेनं गेलं पाहिजे.

0 Shares
जीवलग जोडगोळी अभंग टेस्टिमोनियल