जीवलग जोडगोळी

डॉ.श्यामसुंदर मिरजकर

गोरोबा आणि नामदेव फक्त एकत्रच नाही, तर एकजीव होते. नामदेवांनीगोरोबांकडूननिर्गुणोपासनेतला अनभुव घेतला. गोरोबांनीनामदेवांकडूनवैराग्यालाला सगुण विठ्ठलभक्तीची जोड द्यायचा धडा घेतला. एकमेकांचं थोडं थोडं देत घेत या दोनजीवालगांनी स्वतःसोबत वारकरी विचारही समृद्ध केला.

वारकरी संत मध्ययुगीन महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी भक्ती चळवळीचे अध्वर्यू, दिग्दर्शक आणि तत्त्वज्ञ. त्यांनी स्वयंप्रज्ञेनं आणि स्वानुभवानं वारकरी भक्ती परंपरेचे आचार, विचार निश्चित केले. सनातनी परंपरेशी बंड करत सगळ्यांना सुलभ भक्तिमार्ग अंत्यजांपासून ब्राह्मणांपर्यंत सर्वांसाठी खुला केला. अल्पावधीतच वारकरी हा महाराष्ट्राचा आचार धर्म बनला. इस्लामी राजवटीतही हा पंथ टिकून राहिला. हे महामन्वंतर कसं घडलं असावं, याचं आश्चर्य वाटत राहतं.

या संतमंडळातील सर्वात चळवळ्या संत म्हणजे नामदेव. पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिरातया त्यांची भक्तीची धारा सुरू झाली. तत्कालीन ब्राह्मण पंडित, शास्त्री, वेदज्ञ, पुराणिक, हरिदास अशा सगळ्यांनी नामदेवांच्या आध्यात्मिक तळमळीची उपेक्षा केली. इतकंच नव्हे तर वेळोवळी यथेच्छ टिंगलटवाळी करत शूद्रांची जागा पायांपाशी असल्याचं हिणवलं. या पार्श्वभूमीवर, ‘नामदेवांनी विठ्ठलाला बसवंत करून नवा खेळ सुरू केला. सतंतर फड निर्मिला. अनेक खेळगडी जमवले. तो कुठंही चुकला नाही. त्यामुळं अनेक संतजनांनी हा खेळ स्वीकारला. त्यात सक्रिय सहभाग घेतला’, असं जगद्गुरू तुकारामांनी टिपरीच्या अभंगात सांगितलंय.

ब्रह्मवृंदाकडून भ्रमनिरास झाल्यानंतर नामदेवांनी समाजाच्या विविध स्तरात, जातीत असणार्‍या अधिकारी व्यक्तींची, प्रज्ञावंतांची भेट घेतली. त्यांना आपल्या संप्रदायात संत म्हणून सन्मानपूर्वक गौरवलं. त्यांच्याशी चर्चा, प्रसंगी वादविवाद केले. सर्वांना लिहितं केलं. त्यातूनच वारकर्‍यांचा आचारधर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान सिद्ध होत गेलं. त्यातले एक संत गोरा कुंभार.

‘वैराग्याचा मेरू’ म्हणून नामदेवांनी गोरा कुंभारांचा गौरव केलाय. गोरोबांचा जन्म १२६७चा, तर नामदेवांचा १२७०चा. त्यामुळं वडीलकीचा मान गोरोबा काकांचा. कारण ते संतमंडळात सर्वात ज्येष्ठ, विरक्त भावनेनं संसार करणारे आणि योगमार्गानं निर्गुण निराकाराची उपासना करणारे अधिकारी पुरुष. ज्ञानदेवादी भावंडं ही सुद्धा मूळची योगमार्गी. त्यामुळं या भावंडांचं आणि गोरोबांचं सख्य. याउलट नामदेव सगुण साकार विठ्ठलाचे उपासक. योगमार्ग हा कठीण आणि व्यक्तीला समाजापासून तोडणारा. फक्त साधकालाच लाभ मिळवून देणारा म्हणून नामदेवांना तो अमान्य. समाजातील सगळ्या स्तरातील स्त्रीपुरुषांना उन्नत करणार्‍या भक्तिमार्गाचे ते कट्टर पुरस्कर्ते. अशा विभिन्न विचारधारेचे संत एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या विचारविश्वाला एक कलाटणी मिळाली.

नामदेवचरित्रात नामदेवांना उणेपणा आणणारी एक घटना स्वतः नामदेवांनीच अभंगाद्वारे नोंदवून ठेवली आहे. तिचा गोरोबांशी थेट संबंध आहे. ती घटना म्हणजे नामदेवांचं मडकं कच्चं ठरवणारा प्रसंग होय. शासकीय ‘श्री नामदेव गाथा’ मध्ये अभंग क्र. १३२६ ते १३३६ मध्ये ही मिथक कथा आली आहे.

या कथेचं मूळ संत नामदेव आणि ज्ञानदेवांच्या पहिल्यावहिल्या भेटीत आहे. संन्याशाची मुलं असणार्‍या ज्ञानदेवादी भांवडांना ब्रह्मवृंदानं बहिष्कृत केलं आहे. ही निराधार मुलं आळंदीत ब्रह्मवृंदाकडून शुद्धीपत्र मिळवण्याच्या खटपटीत आहेत. ही वार्ता पंढरपुरात नामदेवांच्या कानी गेली. तेव्हा ते या भांवंडांच्या भेटीस गेले. नामदेव वयानं ज्येष्ठ. पंढरपुरात नावलौकिक असलेले. स्वतः अभंग रचून भजन गाणारे. पंढरपूरचे संत स्वतःहून घरी आल्यानं आनंदित झालेले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान त्यांच्या चरणी लागले. परंतु नामदेवांनी प्रतिनमस्कार केला नाही. मुक्ताबाईंना हा अहंकार आवडला नाही. ‘नामदेवाला आतली सोय माहीत नाही, त्याची दृष्टी आत्मतत्त्वी लागलेली नाही. त्यानं स्वतःचं स्वरूप ओळखलं नाही.’, असं तिला वाटलं. या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे, असंही त्या म्हणाल्या. अर्थातच नामदेवांना ते मान्य नव्हतं. आपण अपूर्ण आहोत किंवा आपला भक्तिमार्ग अपूर्ण आहे, असं नामदेवांना वाटतच नव्हतं. अशावेळी नामदेवांचं मडकं कच्चं ठरवण्याची माव रचण्यात आली. त्यासाठी वयानं, अनभुवानं ज्येष्ठ असलेल्यागोरोबाकाकांची मदत घेण्यात आली.
गोरोबाकाका अनुभवी आहेत, हे खरंच. परंतु या भावंडांनी आळंदीतून त्यांना बोलवावं आणि काका लगेच यावेत हे कसं शक्य आहे? कारण आळंदी ते तेर हे अंतर ३०० किलोमीटर आहे. मग मुक्ताबाई योगसमाधीद्वारे तेरला गेल्या किंवा गोरोबा योगसमाधीद्वारे आळंदीत पोचले, असं म्हणावं लागेल.

नामदेवांसारखा प्रभावी संत योगमार्गात नाही म्हणून निवृत्तीनाथांना खंत वाटत आहे. अशावेळी नामदेवांचं मडकं कच्चं असून त्यांना गुरुंची आवश्यकता आहे, असं ठरवलं जातं. परंतु नामदेव ते मानत नाहीत. ते त्वरित पंढरपुरास जातात. पुढं औंढ्या नागनाथांच्या मंदिरात विसोबा खेचरांकडून नामदेवास निर्गुणोपासना करण्यासंबंधी मार्गदर्शन मिळतं.

संत नामदेव श्रीविठ्ठलाचे परमभक्त, सगुणोपासक आहेत. परंतु सगुण-साकाराचे मूळ हे निर्गुण-निराकार आहे. देव बाहेर वस्तूंमध्ये, प्रतिमेमध्ये आहे, असं मानणं अपुरेपणाचं, अज्ञानाचं आहे. ही नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वामधील उणीव जाणीवपूर्वक, ठरवून दूर करण्याचं काम ज्ञानेश्वरादी भांवडांनी गोरोबांच्या मदतीनं केलं असावं. गोरोबांचा वडीलकीचा मान आणि अनुभवी असणं इथं कामी आलेलं दिसतं.

असं असलं तरी, या घटनाप्रसंगाचा अर्थ असा होत नाही की ज्ञानदेवादी भावंडं आणि गोरोबा हेच परिपूर्ण संत आहेत आणि नामदेवांसारख्या वेड्याबागड्या संताला त्यांनी घडवलंय, असा निष्कर्ष काढणं अन्यायाचं ठरेल. कारण ज्ञानदेवादी संतमंडळी प्रभावी आहेत आणि त्यांनी नामदेवांचे डोळे उघडले, त्यांना शहाणपण दिलं, असं घडलं असेल. तर नामदेवांनी या संताचं शिष्यत्व पत्करून या संताचा योगमार्ग स्वीकारायला हवा होता. परंतु तसं घडलेलं नाही. आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा नामदेव योगमार्गी नाथपंथी झालेले नाहीत. उलट नाथपंथी असणारी ज्ञानदेवादी भावंडं, शैव असणारे विसोबा खेचर, निर्गुण उपासक गोरोबा कुंभार तसंच शैव नरहरी सोनार ही सगळी मंडळी सगुण-साकाराची उपासना करणार्‍या वारकरी संप्रदायात नंतर दाखल झाली आहेत. नामदेवांच्या प्रभावी वाणीचं आणि तर्कशुद्ध मांडणीचं हे फलित आहे.

नामदेव हे मराठीतील पहिले अभंगकर्ते आहेत. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायात प्रवेश करण्यापूर्वी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. परंतु नंतर नामदेवांच्या प्रभावातून सगुण-साकाराची उपासना सांगणारे अभंग रचले. असाच प्रकार गोरोबांच्या बाबतीत झाला. त्यांनीही नामदेवांच्या प्रभावातून अभंगरचना केल्या. आज त्यांचे एकवीस अभंग उपलब्ध आहेत, त्यातील पंधरा अभंगातून ते नामदेवांशी संवाद आहेत.

नामदेवांनीअनेकसंतांची स्फूट चरित्रंलिहिली; परंतुत्यांनी गोरोबांचं चरित्र लिहिलेलं नाही. आज जेचरित्रात्मक अभंग नामदेवांनी लिहिल्याचं सांगितलं जातं, ते मुळात नामदेवांचे नाहीत. तेप्रक्षिप्त म्हणजे दुसर्‍याचकुणीतरी नामदेवांच्या नावावर घुसडलेले आहेत. नामदेवांनी लिहिलेलंगोरोबा चरित्र मूळ‘नामदेव गाथा’मध्येसापडत नाही.

संतांना सर्वसामान्य लोकांत प्रतिष्ठा, आदर वाढावा, या हेतूनं नामदेवांनी जाणीवपूर्वक संत गौरवांचे अभंग लिहिले आहेत. वस्तुतः माणसांची सहज प्रवृत्ती परनिंदा करण्याची असताना परस्तुती करणारे संत अलौकिक म्हटले पाहिजेत. पंथ प्रवर्तक नामदेवांनी हे आधिक जाणीवपूर्वक केलं, असं म्हणता येतं.

गोरा जुनाट पैं जुनें ।
हातीं थापटणे अनुभवाचें ॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी ।
वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥
सोहं शब्द विरक्ती डवरली आंतरी ।
वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥
म्हणे मुक्ताबाई घालूं द्या लोटांगण ।
जाऊं द्या शरण अव्यक्तासी ॥

संत गोरोबांचा नेमका गौरव या अभंगात झाला आहे. त्यात ‘म्हणे मुक्ताबाई’ अशी नाममुद्रा असली तरी हा अभंग नामदेवांचा आहे. एका प्रदीर्घ नाट्यमालिकेत नामदेवांनी मुक्ताबाईंच्या तोंडून हा गौरव व्यक्त केला आहे.

गोरा जुनाट म्हणजे ज्येष्ठ आहे. त्याच्या हाती असणारे जुने थापटणे लाकडाचे नाही तर अनुभवाचे आहे. परब्रह्मरूपी म्हातारा त्याच्या अंतरंगात सामावला आहे. गोरोबांच्या वैराग्यवृत्तीतून त्याचं दर्शन घडतं. सोहं म्हणजे ‘परमेश्वर मीच आहे’ याची जाणीव झाल्यानं अंतरंगात विरक्ती डवरून आली आहे. संपूर्ण विश्वात तो याचा अनुभव घेऊ शकतो. अशा अव्यक्ताचं प्रतिरूप असणा-या गोरोबांना लोटांगण घालू द्या, असं इथं मुक्ताबाई म्हणतात.

नामदेवांनी अनेक सूचक, सांकेतिक अर्थ व्यक्त करणारी ही अभंगमालिका का लिहिली असावी, असा प्रश्न मनाला पडतो. हा प्रसंग घडला त्यावेळी ज्ञानदेव साधारणतः १५ वर्षांचे, नामदेव २० वर्षांचे तर गोरोबा २३ वर्षांचे आहेत. अत्यंत तरुण वय. परंतु असामान्य अशा अध्यात्मातील मोठा अधिकार या सर्वांच्या ठायी आहे. नामदेवांनी घडलेल्या मूळ घटना जशाच्या तशा न सांगता नाट्यात्मक बदल करून भावनेचे अनेक रंग पेरून सांगितल्या आहेत. कथा-कीर्तनात उपयोगी पडावा यासाठीचा हा कथाभाग आहेच. परंतु हे सर्व संत सहजासहजी संतत्वाला पोचलेले नाहीत. त्यांनाही काही परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे. स्वतःची पात्रता, योग्यता सिद्ध करावी लागली आहे, याचा वस्तुपाठ सामान्य भक्तजनांसमोर रहावा, असाही एक उद्देश आहे.

अशा घटना घडण्याचा काळ हा त्यांच्या जडणघडणीचा काळ होता. सर्वसंतांचं घडणं(बिकमिंग) चालू होतं. त्यासाठी ते परस्परांना मदतही करत होते. वयाचं ज्येष्ठत्व आणि निर्गुणोपासनतेला गोरोबांचाअनुभव नामदेवांच्या जडणघडणीत जाणीवपूर्वक वापरला गेला आहे, असंइथं स्पष्टपणेदिसतं.पुढं गोरोबांनीनामदेवांच्या प्रभावातूनसगुण साकार विठ्ठलाची भक्ती केली, अभंग लिहिलेआणि संसारातील वैराग्य भावनेचा त्याग केला, असंआपल्याला दिसतं.

म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा ।
आलिंगण देगा मायबापा ॥

गोरोबाकाकांचे २१ अभंग उपलब्ध आहेत. त्यापैकी १५ अभंगांत नामदेवांशी संवाद आहे. यावरून गोरोबांवरील नामदेवांच्या प्रभावाची कल्पना येऊ शकते. त्यामध्ये १२ अभंगांतून निर्गुण निराकाराबद्दल तर ३ अभंगांत सगुण साकाराबद्दल मांडणी आहे. नामदेवानं निर्गुणोपासना अनुभवावी, यासाठीचा उपदेश किंवा त्यासाठीची चर्चा १२ अभंगांमधून गोरोबांनी घडवली आहे.

परमेश्वराचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार असं आहे. त्या निर्गुणाचा संग धरताच सर्व प्राणिमात्रात त्याचा आविष्कार दिसू लागतो. अनेकत्व म्हणजे द्वैत संपतं. तुम्ही कोण? तुमचं नाव काय? असे प्रश्नही अनाठायी वाटू लागतात. या निर्गुण निराकाराचा अनुभव घ्यायचा तर स्वतःच्या शरीर मनात डोकावावं लागतं त्यासाठीच विसोबा नामदेवांना ‘सत्रावीचे नीर निरंतर सेवा’ असं सांगू लागतात.

नदी सागराला मिळाली की सागरच होते, त्याप्रमाणं निर्गुण-निराकाराचा विलास म्हणजे हे विश्व आहे, याची जाणीव झाली की विश्रांतीचा ठेवा सापडतो. हे मौन्य सुख घ्यावं, असं वाटू लागतं.

म्हणे गोरा कुंभार नाही रूपरेख ।
तेचि तुझे सुख नामदेवा ॥

अशा शब्दात गोराबा निर्गुणाकडे जाण्यास सांगतात. नामदेव हा अवघा चिद्रूप आहे, असं त्यांना जाणवू लागतं.

त्याचबरोबर गोराबा सामान्यांना सगुण साकार विठ्ठलाच्या भक्तीचा उपदेश करतात, असंही दिसतं. विठ्ठलाच्या भेटीचं वेड लागल्यामुळं अवघं देहभान विसरलं आहे, असा अनुभवही ते घेतात. असा भक्तिसुखाचा अनुभव घेणारे नामदेव त्यांना जीवनमुक्त, सुखरूप आणि अद्वैत वाटू लागतात.

एका अभंगात गोरोबा म्हणतात, निर्गुणानं सगुण रूपाचं आवरण घेतलं आहे. त्यामुळंच विठ्ठल हा प्रवृत्तीत दिसतो आणि निवृत्तीतही दिसतो. म्हणजेच सगुणोपासना करणार्‍या सांसारिकांना आणि त्यापलीकडे गेलेल्या निवृत्तांनाही हा विठ्ठल उपास्य वाटू लागतो. एक पुंडलिकच हा पंथ जाणतो. तुम्हा आम्हाला भाग्ययोगानं हे चित्त लाभलं आहे. जे थोडे भाग्यवंत होते ते नामासाठी (नामदेवापाठी?) गेले, जे अभागी होते ते मौनजप करत राहिले. नामदेव हा या सुखाचा अनुभव घेणारा खरा भोक्ता आहे. उरलेल्यांनी उचित असं हे सुख सेवन करावं.

इथं स्पष्ट शब्दांत गोरोबांनी नामदेवांना अनुसरण्याचा, त्यांच्या मागे जाण्याचा उपदेश केला आहे. गोरोबांसाठी नामदेव अज्ञानी किंवा मूढ मुळीच नाही. तर तो ‘आत्मया’ आहे. अत्यंत जवळचा आत्मीय आहे. म्हणजे साक्षात परमेश्वराचं मूर्तिमंत अवतरण असावं तसा आहे. जीवनमुक्त आणि सुखरूप आहे. म्हणूनच या नामदेवावरून जीव ओवाळून टाकावा, असं त्यांना वाटतं. ते म्हणतात,

म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे ।
जीव ओवाळावे नामयासी ॥

अशा या अनुभवाचा ठेवा प्राप्त झालेल्या नामदेवाला गोरोबा‘नामदेवा जीवलगा, मायबापा मला आलिंगन दे!’,असंम्हणत असतील तर काय नवल! नामदेव जीवलग वाटावेत इतके जवळचेआणि मायबाप वाटावेत इतके आधारभूत आहेत, हा गोरोबाकाकांचा अभिप्राय बाकी संतमंडळानही कमी अधिक प्रमाणात अनभुवला होताच. म्हणूनचगोरोबांनीनामदेवांच्यासांगण्यावरून टोकाची विरक्ती संपवली आणि वर्जित केलेले हात पुन्हा वापरात आणले. या संतांच्या जीवलग जोडगोळीनंपरस्परांना समृद्ध आणि परिपूर्णकरण्यासाठी आपला अनभुवाचा अधिकार पणास लावला. वारकरी सप्रंदायास समृद्ध करणारा आदर्श आपल्यासमोरठेवला. अभंगांच्यामाध्यमातूनझालेलं हे दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) दंतकथांच्या पलीकडं काही सांगतं हाच संतांचा अनमोलठेवा आहे.

0 Shares
निर्गुणाचे रूपडे सगुणाचे ऊर्जा वाटणारा चरित्रवेध